‘कोरोना’चा कांदा निर्यातीवर प्रभाव 

Onion export
Onion export

नाशिक : केंद्र सरकारने लागू केलेली कांदा निर्यातबंदी रविवार (ता. १५) खुली झाल्यानंतर कांदा बाजारात सुधारणा होण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले होते. मात्र जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे या बाजार समित्यांमध्ये वाढलेली आवक तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली निर्यातही काही अंशी मंदावली आहे. परिणामी जिल्ह्यातील काही कांदा बाजारात ५० ते ४०० रुपयांदरम्यान चढ-उतार नोंदली गेली. 

दरम्यान, शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेऊनच कांदा बाजार समितीत आणावा. आवकेचा दबाव वाढू देऊ नये, यामुळे आहे त्या दरांवर प्रभाव पडतो, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. 

कांदा निर्यातबंदी मागे घेतल्याची घोषणा व त्यात साठवणूक मर्यादा मागे घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी निर्यातीची तयारी करून मालाची लोडिंग केली, तेव्हा दर स्थिर होते. मात्र आता कोरोनाचा प्रभाव निर्यात होणाऱ्या महत्त्वाच्या देशांत असल्याने काही मर्यादा आल्या आहेत. पाठवलेला माल उतरविला जाईल की नाही, अशी भीती व्यापाऱ्यांच्या मनात असून, यामुळेच काही प्रमाणात निर्यात रोडावली आहे. 

१३ दिवसांपूर्वी कांद्यावरील निर्यातबंदी उठणार असल्याने मोठ्या अपेक्षेने कांदा उत्पादक बाजारात आणल्याने आवक वाढत गेली. त्यात थोड्या फार प्रमाणात उन्हाळ कांद्याची आवक होऊ लागल्याने आवकेत वाढ होत आहे. लासलगाव बाजारात सोमवारी (ता.१६) सर्वसाधारण दर १३५० रुपयांपर्यंत होते, तर हेच दर मंगळवार(ता.१७) दुपारी लिलावाच्या सत्रात ११५० रुपयांपर्यंत आले आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सोमवार (ता.१६) सर्वसाधारण दर १६५१ रुपये होते, तर मंगळवार (ता.१७) १२०१ रुपये राहिले. 

कांद्याला आखाती देशांमधील दुबई, ओमान, मस्कतसह दक्षिण आशियामधील सिंगापूर, मलेशिया व श्रीलंका या देशातून मागणी होती व ती मंदावल्याने कांदा बाजारावर परिणाम होत आहे. त्यामुळे निर्यातप्रक्रिया सुरळीत असूनही खबरदारी घेऊन निर्यातीचे काम व खरेदीचा कामकाज मंदावले आहे, त्यामुळे दर कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

प्रतिक्रिया :  बाहेर मागणी असल्याने व्यापाऱ्यांनी प्रतिक्विंटल २३०० रुपयांपर्यंत मालाची खरेदी केली, मात्र आता कोरोनामुळे पाठवलेला माल उतरविला जाईल की नाही, याची भीती आहे. त्यामुळे खरेदी मर्यादित होत आहे. परिणामी दरात घट झाली आहे.  - नंदकुमार डागा, अध्यक्ष लासलगाव मर्चंट असोसिएशन 

निर्यातबंदी उठल्यावर आवकेत वाढ झाली. यासह गुजरात, राजस्थान व बंगालमधील माल स्थानिक बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने देशांतर्गत मागणी कमी आहे. याशिवाय कोरोनामुळे बाहेरील देशातून मागणी कमी असल्याने व्यापारी कमी खरेदी करत आहे.  - सोहनलाल भंडारी,अध्यक्ष-नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटना   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com