कांदा निर्यातबंदी ट्विटरवरच उठवली का? 

देशांतर्गत कांदा उत्पादन भरपूर असून, निर्यातीसाठी अधिसूचना निघून कार्यवाही होणे आवश्यक आहे; तसेच निर्यात मूल्य शून्य झाले तरच कांदा दर स्थिर राहू शकतो; अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडू शकतात. राज्य शासनाने त्वरित लक्ष घालून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. - कुबेर जाधव, कांदा उत्पादक, विठेवाडी, जि. नाशिक
कांदा निर्यातबंदी ट्विटरवरच उठवली का? 
कांदा निर्यातबंदी ट्विटरवरच उठवली का? 

नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याची माहिती बुधवारी (ता.२६) ट्विटरवरून दिली. मात्र, याबाबतची स्पष्टता नसल्याने जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांदा दरात पुन्हा दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक संतप्त झाले. फक्त ट्विटरवरच कांदा निर्यातबंदी उठवली का, असा सवाल कांदा उत्पादक उपस्थित करत आहेत.  कांदा निर्यातबंदी उठविल्याबाबत ट्विटद्वारे मंत्र्यांनी जाहीर केले. मात्र त्यासंबंधी निर्यात प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी केंद्राच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने अद्यापपर्यंत थेट किंवा संकेतस्थळावर अधिकृत अधिसूचना जाहीर केलेली नाही. या अनुषंगाने कांदा बाजारात संभ्रम वाढला आहे. कांदा उत्पादकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक, व्यापारी व निर्यातदार लवकरच अधिसूचना जाहीर करावी, अशी मागणी करत आहेत.  दुसरीकडे कांदा उत्पादकांना आता दिलासा मिळण्याची अपेक्षा असताना फक्त समाजमाध्यमांवर निर्यात खुली झाल्याबाबत संदेश फिरत आहे. चालू वर्षीचा कांदा हंगाम तसा शेतकऱ्यांसाठी अडचणींचाच राहिला. एकीकडे उत्पादकता घटली; तर दुसरीकडे दर मिळत नसल्याने कांदा उत्पादकांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाल्याने केंद्राच्या निर्णयाकडे जिल्ह्यातील कांदा उत्पादक अपेक्षेने पाहात आहेत.  आता घोषणा नको; तर निर्यात प्रक्रिया स्पष्ट जाहीर व्हावी यावर कांदा उत्पादक व शेतकरी संघटना आग्रही आहेत. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस निर्णय जाहीर करून कार्यवाही करावी, असा सूर उमटत आहे. सरकारने निर्यातबंदी उठविल्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने स्पष्टता द्यावी आणि निर्यातीसाठी कोणत्याही नियम व अटी न टाकता कार्यवाही करावी, यासाठी आज (ता.१) शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने कांदा परिषद आयोजित केली आहे.  श्रेयवाद सुरू  केंद्रीय मंत्री पासवान यांनी कांदा निर्यातबंदी उठविल्याची घोषणा केल्यानंतर कांदा पट्ट्यात समाधान व्यक्त झाले. मात्र त्यानंतर बाजार स्थिर होण्याऐवजी पुन्हा चढउतार दिसून आला. अशा परिस्थितीत कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचे काम करण्याऐवजी येथील लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते निर्यात बंदी उठविल्याचे श्रेय घेण्यात पुढे येताना दिसत आहेत. 

प्रतिक्रिया कांदा निर्यातबंदीची घोषणा झाल्यानंतर अधिकृत अधिसूचना निघालेली नाही. अधिसूचना वाणिज्य मंत्रालयाकडून निघेल. याबाबत दिल्लीत गेल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न करणार आहे.  - डॉ. भारती पवार, खासदार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com