कांदेबाग केळीची आवक घटली; दर टिकून
कांदेबाग केळीची आवक घटली; दर टिकून

कांदेबाग केळीची आवक घटली; दर टिकून

जळगाव ः जिल्ह्यात चोपडा, जळगाव भागातील कांदेबाग केळीची कापणी अंतिम टप्प्यात आहे. केळीची आवक घटली आहे. मागणी कायम असून, दर ११०० रुपयांवर मागील नऊ - १० दिवसांपासून स्थिर आहेत. थंडी वाढताच केळी पक्व होण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. तसेच निसवणीवरही तापीकाठावरील गावांनजीक अधिक परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. केळी पक्व होण्याची प्रक्रिया लांबत असल्याने आवक कमी झाली आहे. तसेच केळीचा दर्जाही हवा तसा नाही. उत्तर भारतातील दिल्ली, काश्‍मीर व उत्तर प्रदेशातून मागणी कायम आहे; परंतु या भागात पाठविण्यासंबंधीची दर्जेदार केळी चोपडा व यावल भागात काही ठिकाणी उपलब्ध होत आहे.

केळीचा निर्यातक्षम दर्जा जळगाव, पाचोरा भागात मिळत नसल्याने या भागातून उत्तरेकडील पाठवणूक कमी झाली आहे. पाचोरा, जळगाव, चोपडा भागात रोज मिळून १५० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळी उपलब्ध होत आहे, तर रावेर व यावलमध्ये आगाप नवती बागांमध्ये केळी काही प्रमाणात उपलब्ध होत आहे. उत्तर भारतासह ठाणे, कल्याण, छत्तीसगड, राजस्थान येथून केळीला मागणी आहे. रावेर, यावलमधील केळीची पाठवणूक उत्तर भारतात अधिक होत आहे. या भागात जळगाव, चोपडाच्या तुलनेत कमी केळी उपलब्ध होत आहे.

रावेर, यावलप्रमाणे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर व नर्मदाकाठच्या भागात दर्जेदार केळीची काढणी सुरू झाली आहे. बऱ्हाणपूर येथील बाजारात बऱ्हाणपूरसह जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून केळीची पाठवणूक होत आहे. बऱ्हाणपूरच्या बाजारात केळीची आवक कायम असून, तेथे जाहीर लिलावात केळीला कमाल १३०० रुपयांपर्यंतचे दर मागील आठवड्यात मिळाले. बऱ्हाणपुरातून मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश व दिल्ली येथे केळीची पाठवणूक मोठे खरेदीदार करीत आहेत. बऱ्हाणपुरातील दर लक्षात घेता सावदा (ता. रावेर) व फैजपूर, साकळी (ता. यावल) येथील खरेदीदार जळगाव जिल्ह्यात दर देत आहेत.

नवती केळीला कमाल ११३० रुपये दर दिला जात आहे, तर कांदेबाग केळीला कमाल ११०० रुपये दर जिल्ह्यातील खरेदीदार खेडा खरेदीसंबंधी देत आहेत. कांदेबागांची काढणी पुढील १० ते १२ दिवसांत ९० टक्‍क्‍यांवर होईल. यानंतर जळगाव, चोपडा तालुक्‍यात केळीची उपलब्धता अत्यल्प राहील. यामुळे दर टिकून राहतील, असा अंदाज बाजारपेठेतील विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com