कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ 

चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे मजूरटंचाई झाल्याने कांदा काढणी लांबणीवर जात आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढला असताना सरासरी ३० टक्के उत्पादन घटले आहे.
Onion harvesting cost increased by 25%
Onion harvesting cost increased by 25%

नाशिक : चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे मजूरटंचाई झाल्याने कांदा काढणी लांबणीवर जात आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढला असताना सरासरी ३० टक्के उत्पादन घटले आहे. आता कांदा काढणी सुरू आहे; मात्र स्थानिक मजुरांसह परराज्यांतील मजुरांची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे कांदा काढणीचे दर २५ टक्क्यांनी वाढून हा खर्च एकरी १० हजार रुपयांवर गेला आहे. 

खर्चात भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. तापमानात वाढ झाल्याने कांदापात सुकून लवकर कांदा काढणीवर येत असल्याने नुकसान टाळण्यासाठी शेतकरी मजुरांचा शोध घेत आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाळ कांदा काढणीला वेग आला. दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे मजुरांची विशेष काळजी घेऊन काढणी करावी लागत आहे. मजुरांमध्येही भीतीचे वातावरण असल्याने संसर्ग टाळून कामावर शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र, काढणीसाठी एकरी दीड ते दोन हजार रुपये अधिक मोजावे लागत आहे. 

जिल्ह्यात रोगांचा प्रादुर्भाव, अवकाळी व गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाल्याने सरासरी एकरी उत्पादन ३० टक्क्यांपर्यंत घटले आहे. मात्र, मजूर रोजंदारी ऐवजी थेट मक्ता पद्धतीने काढणीची कामे घेत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मजुरांकडून अडवून होत असल्याची स्थिती आहे. गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील शेतमजुरांनी होळीनिमित्त गावाची वाट धरल्याने मजुरांची संख्या कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक मजुरांच्या विनवण्या कराव्या लागत आहे. स्थानिक पातळीवरील कांद्याच्या टोळ्या शोधून सौदे देण्यात येत आहेत. मात्र कोरोनाने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण केल्याचे चित्र आहे. परंतु शेतकरी या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत कामाचे नियोजन करत आहे. 

प्रमुख अडचणी अशा 

  • कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक मजुरांची उपलब्धता कमी 
  • परराज्यांतील मजूर यंदा कामासाठी येऊन परतला 
  • ग्रामीण भागात दुसऱ्या गावातून मजूर वाहतुकीच्या समस्या 
  • रोजंदारी ऐवजी थेट मक्ता पद्धतीने एकरी काढणीवर मजूर ठाम 
  • शेतमजूर वाहतुकीत अडचणी  एकीकडे शेतीकामे सुरू राहतील, असे शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी शेतमजुरांना पोलिसांकडून ने-आण करण्यास मनाई केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

    या भागातून येतात शेतमजूर  मध्य प्रदेश...सेंधवा, बडबानी, नेवली  गुजरात...डांग 

    मजुरीची तुलनात्मक स्थिती (एकरी खर्च-हजार रुपयांत)
    तालुका २०२०(वर्ष) २०२१ (वर्ष)
    येवला ७ ते ७.५ ८ ते ८.५ 
    कळवण ७ ते ८ ९ ते ९.५
    मालेगाव ५ ते ५ ५ ते ७
    सटाणा ७ ते ८ ९ ते १०
    देवळा ७ ते ७.५. ९ ते १० 
    निफाड ७ हजार ९ हजार

    बियाणे, खते, औषधे, मजुरी यांची वाढ झाली. त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात मोठी घट आहे. सध्या कांदा काढणीस येऊन बियाण्यात फसवणूक वेगळी आहे. अशा परिस्थितीत काढणीचा खर्चही वाढला. त्यामुळे सर्व गणित बिघडले. खर्च वाढता असल्याने कसे उभे राहणार हा प्रश्‍न आहे.  - हरिसिंग ठोके, कांदा उत्पादक, सांगवी, ता. देवळा 

    कोरोनामुळे स्थानिक शेतमजुरांमध्ये भीती आहे. मात्र परराज्यांतील मजुरांमुळे काही अंशी दिलासा राहिला. मात्र सुरुवातीला अडचणी आल्या. मजूर नसल्याने काढणी दरात वाढ झाली आहे.  - संदीप कोकाटे, कांदा उत्पादक-साताळी, ता. येवला 

    एकरी उत्पादन ७ ट्रॉलींवरून या वर्षी ४ ट्रॉलींवर आले. उत्पादन घटून खर्च वाढताच आहे. त्यातच बाजारात उत्पादन खर्चाखाली दर असल्याने आर्थिक नियोजन कसे करावे या चिंतेत आहोत.  - विजय पगार, कांदा उत्पादक, कळवण, जि. नाशिक 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com