चाळीतल्या कांद्याचे काय होणार?

चाळीतल्या कांद्याचे काय होणार?
चाळीतल्या कांद्याचे काय होणार?

कांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदार तेजी होती. पुढे रांगडा व आगाप उन्हाळी मालाचा पुरवठा वाढल्याने मार्च ते मे या तीन महिन्यांत बाजारभाव मंदीत होते. जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बाजारात सुधारणा झाली. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याअखेर लासलगाव बाजारातील सरासरी भाव १००० ते ११०० प्रतिक्विंटलच्या दरम्यान येईल. खरीप आवकेच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टमधील उरलेले दोन आठवडे, पुढील सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव सध्याच्या पातळीवर टिकेल की घसरेल, याबाबत बाजारात चर्चा सुरू आहे. यात दोन मतप्रवाह आहेत. त्यातील एकानुसार सप्टेंबरमध्ये बाजारभाव हजार रुपयाच्या खाली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आजवरचा उच्चांकी स्टॉक आणि आगाप खरीप आवक ही दोन कारणे पहिल्या मतप्रवाहानुसार पुढे येतात. दुसऱ्या मतप्रवाहानुसार सप्टेंबर व पुढे ऑक्टोबरमध्ये हजार ते अकराशेदरम्यान बाजारभाव टिकून राहतील. किंबहुना नोव्हेंबरनंतर स्टॉकमधील माल संपल्यानंतर बाजारात आणखी सुधारणाही शक्य आहे. पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरीप कांद्याच्या लागणी लांबणीवर पडणे हे प्रमुख कारण दुसऱ्या मतप्रवाहाकडून दिले जात आहे. सप्टेंबरमध्ये कांद्याचा बाजार एक हजार रु. प्रतिक्विंटलच्या खाली जाणार नाही, असे एनएचआरडीएफचे निवृत्त संचालक डॉ. सतीश भोंडे यांना वाटते. कर्नाटकातील आगाप खरीप कांदा सप्टेंबरअखेरपर्यंत संपून जातो. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील अर्ली खरीप सुरू होतो. मात्र, मधल्या महाराष्ट्रासह कर्नाटकात पावसाच्या मोठ्या खंडामुळे मुख्य खरीप लागणी लांबल्या आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत महाराष्ट्रातील माल येईल, पण त्याचे भवितव्य पाऊसमानावर आहे. या दोन महिन्यांत नाशिक-नगर जिल्हा हा देशातील प्रमुख पुरवठादार असतो. गुजरातमधील माल जानेवारीत येतो. मात्र, गुजरातेत पावसाचे प्रमाण घटले आहे. जानेवारीत होणारा गुजरातचा पुरवठा कमी कमी असेल. एकूणच नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यानचे चित्र उत्पादनाच्या दृष्टिने सर्वसाधारण आहे. खूप मोठी वाढ होईल, असे दिसत नाही. म्हणून महाराष्ट्रात चाळीत ठेवलेल्या मालास सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत किमान हजार रु. बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आहे, असे डॉ. भोंडे ठामपणे सांगतात. नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याकडील माहितीनुसार गेल्या वर्षी मेअखेर ४५ लाख टन कांदा स्टॉक झाला होता, तर या वर्षी ५५ लाख टन कांदा स्टॉक झाला आहे. स्टॉकमध्ये २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ सरासरी आहे. गाव व तालुकानिहाय स्थानिक पातळीवर त्यात वाढ-घट असू शकते. मुख्य मुद्दा आहे तो बाजारभावाचा. आजपर्यंत तर हजाराच्या आसपास बाजार टिकला आहे. दक्षिण भारतातून सध्या सुरू असलेली खरीप आवक आणि स्टॉकमधील उन्हाळ माल यांची गोळाबेरीज पाहता साधारणपणे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत देशांतर्गत आणि निर्यातीची गरज भागवेल एवढा कांदा पुरवठा उपलब्ध आहे. या वर्षी खरीप कांद्याखालील क्षेत्र वाढताना दिसते, मात्र पावसाच्या खंडामुळे महाराष्ट्रातील मुख्य खरिपाचा कालावधी लांबला आहे. स्टॉकमधील मालास थोडा अवधी मिळाला आहे. महाराष्ट्रातील ऑगस्टच्या लागणीची हार्वेस्टिंग नोव्हेंबरमध्ये होईल. त्यावेळी स्टॉकमधील माल संपलेला असेल. या दरम्यान परतीचा पावसाचा फटका जर सध्याच्या लागणींना मोठ्या प्रमाणावर बसला तर नोव्हेंबरमध्ये सध्याच्या तुलनेत भाव उंच राहू शकतात. वरील परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने व संयमाने स्टॉकमधील कांद्याची विक्री करावी, असे आवाहनही नानासाहेब यांनी केले आहे. खरीप कांदा बियाण्याची विक्री जवळपास दुपटीने वाढली असली तरी पावसाने दडी मारल्यामुळे त्यातील किती बियाणे प्रत्यक्षात रुजले हा खरा प्रश्न आहे. कोरडवाहू क्षेत्रात ऑगस्टमध्ये विहिरींना पाणी उतरण्यासाठी त्या आधी महिनाभर चांगला पाऊस झाला पाहिजे. मात्र, कोरडवाहू विभागातील अनेक गावांत १५ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान पाऊस नव्हता. विहिरींना पाणी उतरण्यास वेळ आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा निर्यातदार खंडू देवरे यांच्या मते महाराष्ट्रातील खरीप कांद्याच्या लागणी जवळपास महिना भर विलंबित होणे हे देशातील एकूण पुरवठ्याच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. यामुळे बाजारभाव खाली जाणार नाही. कांद्यास सध्या ५ टक्के निर्यात अनुदान आहे. शेजारी सार्क देशांसह आग्नेय आशियाई देशात निर्यात सुरळीत आहे. यामुळेच बाजार हजाराच्या खाली गेलेला नाही. साधारपणे महिनाभरात उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथील कांद्याचा स्टॉक संपून जाईल. त्यामुळे महाराष्ट्रातील मालास आपोआपच उठाव मिळेल. महाराष्ट्रातील मालाचा रेल्वेद्वारे वेगाने निपटारा होण्यासाठी प्रतिक्विंटल अनुदान मिळण्याची गरज आहे. मालाचा वेगाने निपटारा झाला, तर बाजारातही मरगळ राहत नाही, असे देवरे म्हणाले. हवामान, पाऊसमान हा एकमेव घटक कांदा बाजारावर हुकूमत गाजवतो. पंधरा दिवस- तीन आठवड्यातील पाऊसमान संपूर्ण वर्षातील बाजारभावाचा ट्रेंड बदलवते. जूनमध्ये असे बोलले जात होते की ऑगस्टमध्ये उच्चांकी खरीप कांदा लागणी होणार, प्रत्यक्षात आज तसे चित्र नाही. महिनाभर पावसाच्या खंडामुळे कोरडवाहू भागात पुनर्लागणींसाठी संरक्षित पाणी नाही. आजघडीला देशभरात ज्या काही लागणी होताहेत त्यांचे भवितव्यही पुढच्या दोन महिन्यांत पाऊसमानावर असेल. खरे तर स्टॉकमधील कांदा मंदीच्या खाईत सापडण्याची भीती होती, पण आजअखेरपर्यंत किमान हजार रुपयावर बाजार टिकला आहे आणि पुढील दीड महिन्यात बाजार टिकला तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती समाधानाची बाब असेल, इतकेच.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com