संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे विभागात कांदा लागवड क्षेत्रात ४१ टक्क्यांनी घट

खरीप कांदा लागवडीची पुणे विभागात जी स्थिती आहे, अशीच स्थिती देशभरातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतील पारंपरिक आगाप खरीप कांदा लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय घट आहे. याचे मुख्य कारण गेल्या वर्षीच्या खरीप कांद्याला कमी दर मिळाला. या वर्षी पाणी टंचाई व उशिराने दाखल झालेला पाऊस यामुळे क्षेत्रात घट झाली, अशीच स्थिती महाराष्ट्रासह इतर राज्यांत आहे. याशिवाय शिल्लक कांद्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये देशभरात कांद्याचा मोठा तुटवडा भासणार असून, बाजारभाव उच्चांक गाठेल. - दीपक चव्हाण, शेती अभ्यासक, पुणे.

पुणे  ः कमी पावसामुळे शेतकरी मूग, उडीद अशा कमी कालावधीच्या पिकांकडे वळाले आहेत. यामुळे खरीप कांद्याच्या लागवडीच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. जून, जुलै महिन्यात पुणे विभागात खरीप कांद्याची अवघ्या २० हजार २४० हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्या वर्षी ३० आॅगस्टअखेरपर्यंत सुमारे ३४ हजार ८० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. त्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रात १३ हजार ८४० हेक्टर म्हणजेच सरासरी ४१ टक्क्यांनी घट झाल्याचे चित्र आहे. कांदा लागवडीची स्थिती बघता यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

चालू वर्षी पावसाला उशिरा सुरवात झाल्याने त्याचा परिणाम खरीप कांद्याच्या लागवडीवर झाला आहे. पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग व नगरमधील अकोले तालुका वगळता अजूनही विभागात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा लागवड क्षेत्रात सुमारे १३ हजार ८४० हेक्टरने घट झाली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील कांद्याच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक घट झाली आहे.

दरवर्षी शेतकरी जून महिन्यापासून कांदा लागवडीची तयारी करतात. त्यासाठी नांगरट, रोपवाटिका, बियाणांची खरेदी करणे आदी बाबी मे, जून महिन्यात पूर्ण केल्या जातात. जून, जुलैत खरीप कांद्याची, लेट खरीप कांद्याची सप्टेंबर, आॅक्टोबर तर उन्हाळी कांद्याची जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात लागवड केली जाते. बहुतांशी शेतकरी खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात कांद्याची लागवड करतात. खरीप कांद्यासाठी पाऊस झाल्यानंतर जून-जुलैमध्ये रोपवाटिकेत बियाणे टाकले जाते. बियाणे टाकल्यानंतर साधारपणपणे एक ते सव्वा महिन्यात कांद्याची रोपे लागवडीस येतात. त्यानंतर बहुतांशी शेतकरी जुलै-आॅगस्ट महिन्यात कांदा लागवड करतात. लागवडीनंतर सुमारे साडे तीन ते चार महिन्यांनी कांद्याची काढणी केली जाते.

यंदा पावसाला उशिराने सुरवात झाल्याने पुणे विभागातील बहुतांशी तालुक्यांत उशिराने कांदा लागवडी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप कांद्याऐवजी मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी यासारख्या कमी पाण्याच्या पिकांवर भर दिला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्याचा पूर्व पट्टा, शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर भागात कांदा लागवड होते. चालू वर्षी या तालुक्यात कमी प्रमाणात लागवड झाली आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर, नगर, श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत या तालुक्यांसह सर्वच तालुक्यांत लागवड क्षेत्रात मोठी घट झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यातही कमी कांदा लागवड झाली आहे.

जिल्हानिहाय झालेली खरीप कांदा लागवड (हेक्टर)
जिल्हा   गेल्या वर्षी झालेली लागवड यंदा झालेली लागवड झालेली घट
नगर २६,६६०  १२,१९३ १४,४६७ (घट)
पुणे  ३,९६० ५,८७१  १,९११ (वाढ)
सोलापूर ३,४६० २,१७६ १२८४ (घट)
एकूण ३४,०८० २०,२४० १३,८४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com