पुणे जिल्ह्यात खरीप कांद्याची ३७७४ हेक्टरवर लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः यंदा पावसाला उशीरा सुरवात झाली. परिणामी, खरीप कांदा लागवडीसदेखील उशिराने सुरवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ७७४ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. येत्या काळात या लागवडीस आणखी वेग येण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्याचा पूर्व पट्टा, तर शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर या भागांत कांदा लागवड होते. जिल्ह्यात सर्वाधिक कांदा लागवड शिरूर तालुक्यात होते. शेतकरी जून महिन्यापासून कांदा लागवडीची तयारी करतात. त्यासाठी नांगरट, रोपवाटिका, बियाण्यांची खरेदी करणे आदी बाबी मे व जून महिन्यांत पूर्ण केल्या जातात. जून, जुलैमध्ये खरीप कांद्याची, लेट खरीप कांद्याची सप्टेंबर, आॅक्टोबर तर उन्हाळी कांद्याची जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात लागवड होते. बहुतांशी शेतकरी खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत कांद्याची लागवड करतात.

मात्र जून-जुलै महिन्यांत पाऊस झाल्यानंतर शेतकरी कांद्याची रोपवाटिका टाकतात. बियाणे टाकल्यानंतर साधारपणपणे एक ते सव्वा महिन्यात कांद्याची रोपे लागवडीस येतात. त्यानंतर बहुतांशी शेतकरी जुलै ते आॅगस्टदरम्यान कांदा लागवड करतात. लागवडीनंतर सुमारे साडेतीन ते चार महिन्यांनी कांद्याची काढणी केली जाते.

जिल्ह्यातील शेतकरी पूर्वी वाफे, सऱ्यांवर किवा सरीवर कांदा लागवड करत होते. परंतु अलीकडे शेतकऱ्यांनी लागवड तंत्रात बदल केला आहे. आता शेतकरी रुंद वरंबा सरी पद्धतीने कांदा लागवड करत असून त्याला ठिबक किंवा तुषार सिंचन केले जाते. त्यामुळे दर्जेदार उत्पादन घेणे शक्य होते.

 

तालुकानिहाय खरीप कांदा लागवड (हेक्टर)

तालुका लागवड क्षेत्र
पुरंदर २४८१
हवेली ७५
भोर ५८
बारामती  ७३३
इंदापूर   ३०५
दौंड १२२
एकूण ३७७४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com