नाशिक : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांदा दरावरून घमासान

उद्योग व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची सोमवारी (ता. २) भेट घेतली. १५ मार्चपासून निर्यात खुली होणार असल्याबाबत त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांची मागणी पूर्ण होणार आहे. त्याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होईल. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा. — डॉ. भारती पवार, खासदार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
Onion
Onion

नाशिक : कांदा निर्यातबंदी उठविल्याची अधिकृत अधिसूचना वाणिज्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली नाही. परिणामी, गेल्या तीन दिवसांपासून बाजारात संभ्रम निर्माण होऊन कांदा दरात चढ-उतार सुरूच आहे. सोमवारी (ता. २) लासलगाव बाजार समितीत लिलावात कांद्याचे दर कमी जाहीर होताच, कांदा उत्पादक आणि शेतकरी संघटनांनी रोष व्यक्त करीत बाजार समितीतील लिलाव बंद पाडले. त्याचे पडसाद जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये दिसून आले. केंद्रीय मंत्री पासवान यांनी कांदा निर्यातबंदी उठविल्याचे ट्विट करून आता सहा दिवस झाले आहेत. मात्र, वाणिज्य मंत्रालयाकडून अधिकृत अधिसूचना काढण्यात आलेली नाही, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. परिणामी कांदा दर पुन्हा घसरले आहेत. जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी (ता. २) सकाळच्या सत्रात कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर लिलावाच्या बोलीत दर कमी झाल्याने शेतकरी संतप्त झाले. लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर कांदा आवक होऊन लिलावात प्रतिक्विंटल कमाल १६५२ रुपये, तर सरासरी १४०० रुपये दर जाहीर होताच हे लिलाव बंद पाडण्यात आले.  विंचूर बाजार समितीतही याचे पडसाद दिसून आले. प्रहार शेतकरी संघटनेचे गणेश निंबाळकर, प्रकाश चव्हाण,  जय किसान फार्मर्स फोरमचे निवृत्ती न्याहारकर यांनी रस्त्यावर कांदे फेकून लिलाव बंद पाडले. येवल्याला सकाळी शेतकऱ्यांनी नगर- मनमाड रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला. पोलिसांना पाचारण केल्यानंतर तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अंदरसूल (ता. येवला) येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी औरंगाबाद- नाशिक रस्त्यावर कांदा फेकून सरकारचा निषेध केला. कांदा निर्यातबंदी उठवून अधिसूचना जाहीर करण्याबाबत घोषणाबाजी केली.  सटाणा बाजार समितीतही कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडले. ४८ तासांच्या आत कांदा निर्यातबंदी उठविण्याची अधिसूचना काढा, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असे कांदा उत्पादक संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी सांगितले. देवळा येथे प्रहार शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या जयदीप भदाणे व विनोद पाटील यांसह कार्यकर्त्यांनी लिलाव बंद पाडले होते. केंद्रीय मंत्री पासवान यांनी ट्विट करून सहा दिवस झाले तरी केंद्र सरकार निर्णय का घेत नाही, त्यामुळे कांदा उत्पादक पट्ट्यातील लोकप्रतिनिधी खासदार डॉ. भारती पवार, सुभाष भामरे व हेमंत गोडसे हे केंद्राकडे मागणी का करत नाहीत, यावर तातडीने लक्ष घालण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. लासलगाव, विंचूर, येवला, देवळा, सटाणा, पिंपळगाव बसवंत, सटाणा, उमराणे येथेही लिलाव बंद पाडण्यात आले. मात्र यापैकी देवळा, येवला, उमराणे सटाणा, पिंपळगाव बसवंत या बाजारात दुपारच्या सत्रात कामकाज सुरळीत झाले. मात्र लासलगाव येथे लिलाव बंदच राहिले. शेतकरी कांदा निर्यातबंदी उठविण्याच्या व रास्त दर मिळण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले.  प्रतिक्रिया मंत्र्यांनी ट्विटद्वारे घोषणा केली; मात्र कार्यवाही का होत नाही? सरकारचे हे धरसोडीचे धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. सरकारने तातडीने अधिसूचना काढावी, नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.  - भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना सरकारने घोषणा केली, मात्र कार्यवाही होत नाही. त्यामुळे कांदा उत्पादकांना संघर्ष करावा लागत आहे. आता कांदा उत्पादकांना दिल्लीला सोबत घेऊन सरकारकडे मागण्या मांडणार आहोत. - निवृत्ती न्याहारकर, जय किसान फार्मर्स फोरम 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com