चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी जागता पहारा

onion protection from thieves
onion protection from thieves

नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून कांद्याला समाधानकारक उंचाकी दर मिळू लागला. त्यामुळे कांद्यावर आता चोरट्यांची नजर पडू लागली आहे. संगमनेर तालुक्‍यातील हिवरगाव पावसा येथे चोरट्यांचा कांदाचोरीचा प्रयत्न असफल झाला असला, तरी चोरट्यांनी अन्य चोरीपेक्षा कांद्याकडे मोर्चा वळवला असल्याचे दिसत येत आहे. त्यामुळे डोळ्यांत तेल घालून शेतकऱ्यांना शेतातील कांदा राखावा लागत आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरापासून कांद्याला चांगला दर मिळत आहे. सहा-सात हजारांचा दर काल-परवा थेट सतरा हजारांच्या जवळपास गेला आहे. क्विंटलभर कांद्याला सतरा हजारांपर्यंतचा मिळणारा दर हा आतापर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी दर आहे. बाजारात गेले की सहज पैसे विक्री होऊन कांद्याचे भरमासाट पैसे मिळत असल्याने चोरट्यांनी नजर आता कांद्याकडे गेली असल्याचे दिसत आहे. 

संगमनेर तालुक्‍यातील तालुक्‍याच्या पठार भागातील हिवरगाव पावसा येथील संतोष दराडे यांच्या वस्तीवर कांदाचाळीतून चोरांनी मंगळवारी (ता. ३) पहाटे तब्बल ३० गोण्या कांदा पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दराडे यांना त्याची चाहूल लागल्याचे पाहून चोरांनी बांधावरच गोण्या टाकून पळ काढला. परतीच्या पावसाने दराडे यांनी घेतलेल्या लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले. अस्मानी संकटातून वाचलेल्या कांद्याची काढणी करून, तो विक्रीसाठी गोण्यांत भरून दराडे यांनी चाळीत ठेवला होता. 

मंगळवारी पहाटे चोरांनी चाळीतील सुमारे ३० कांदागोण्या काढून शेताच्या बांधावर ठेवल्या. दरम्यान, चोरांच्या आवाजाने दराडे यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करताच गोण्या सोडून चोरांनी पलायन केले आणि कांदा चोरुन नेण्याचा चोरांचा प्रयत्न फसला असला, तरी या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात विविध वस्तू चोरणाऱ्या चोरट्यांनाही आता अन्य बाबीपेक्षा कांदा सोने-चांदीच्या तुलनेत किमती वाटू लागला आहे.

राखणीसाठी राहावे लागतेय दक्ष  कांदा काढणीनंतर शेतकरी सहजपणे कांदा चाळीत कांदा साठवून ठेवतात. आता मात्र चाळीवर रात्री आणि दिवसाही लक्ष ठेवून पहारा करावा लागत आहे. नगर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने कांद्याचे नुकसान झाले. त्यातून वाचलेला कांदा आता काढला जात आहे. काढलेला कांदा किही दिवस शेतातच टाकला जातो. आता मात्र तशी परिस्थिती नाही. कांदा काढल्यानंतर त्याची राखण करण्यासाठी उत्पादकांना जागता पहारा देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com