नगर जिल्ह्यात कांद्याला मिळाला वीस वर्षांतील उच्चांकी दर

Onion received highest rate in twenty years in city district
Onion received highest rate in twenty years in city district

नगर ः जिल्ह्यातील घोडेगाव (नेवासा), नगर, पारनेर बाजार समितीत बऱ्यापैकी कांद्याची आवक होत असते. सोमवारी (ता. २) घोडेगाव येथे १३, ५०० रुपये; तर नगर, पारनेर बाजार समितीत दहा हजार रुपये क्विंटल असा दर कांद्याला मिळाला. गेल्या वीस वर्षांत कांद्याला मिळालेला उच्चांकी दर असल्याचे नगर बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. कांदाटंचाई असल्याने गेल्या दोन महिन्यांत कांद्याची आवकही नेहमीच्या तुलनेत घटली आहे. 

जिल्ह्यात खरीप, लेट खरीप, रब्बी आणि उन्हाळी मिळून साधारण ७० ते ८० हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते. गेल्या वर्षी दुष्काळाचा तर यंदा खरिपात कमी पाऊस झाल्याचा परिणाम कांदा लागवडीवर झाला. शिवाय यंदा खरिपात ज्या लागवडी झाल्या, त्यातील बहुतांश कांद्याचे आॅक्टोबरमध्ये आलेल्या पावसाने नुकसान झाले. यामुळे बाजारात कांद्याची आवक आपसूक घटली आणि कांदाटंचाई निर्माण झाली. कांदा आवक कमी झाल्याने दरात वाढ होत गेली. 

सध्या जुन्या लाल व गावरान कांद्याला तुलनेत चांगला दर मिळत असून सोमवारी घोडेगाव बाजार समितीत १३ हजार ५०० रुपये; तर नगर बाजार समितीत सुमारे १० हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. हा गेल्या वीस वर्षांतील उच्चांकी दर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात येत आहे. पारनेर बाजार समितीतही साडेनऊ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. नगर बाजार समितीत नगर, सोलापूर, औरंगाबाद, बीड भागातून कांद्याची आवक होत असते. 

जिल्ह्यामध्ये राहाता, राहुरी, नगर, पारनेर, घोडेगाव, संगमनेर या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक होत असली, तरी सर्वाधिक आवक नगर बाजार समितीत होत असते. गेल्या पाच वर्षांत सव्वा दोन लाख टन कांद्याची नगर बाजार समितीत आवक झाली. याआधी आॅगस्ट २०१५ मध्ये कांद्याची आवक घटून ८५०० हजार रुपये क्विंटल दर मिळाला होता. त्यानंतर यंदा पहिल्यांदाच दहा हजार रुपये क्विंटलवर दर मिळाला आहे. 

नगर बाजार समितीत तीन लाख ते चार लाख साठ हजार क्विंटलच्या दरम्यान आवक होत असते. या वर्षात मार्चमध्ये (२०१९) ४ लाख ५५ हजार १०५ क्विटंल तर एप्रिलमध्ये ४ लाख ५० हजार क्विंटल कांदा आवक झाली होती. त्यावेळी १०० ते ११०० रुपये क्विंटल दर होता. आता मात्र आवक थेट पंचवीस टक्क्यांवर आली आहे. आॅक्टोबर महिन्यात १ लाख १२ हजार ९२२ क्विंटल आवक झाली; तर नोव्हेंबरमधील आवक एक लाख क्विंटलच्याही आत आली आहे. आॅक्टोबरमध्ये पाच हजारांपर्यंत; तर नोव्हेंबरमध्ये ८ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. आता २ डिसेंबरला हा दर १३ हजार ५०० रुपये क्विंटलपर्यंत गेला आहे. 

बाजारात जुन्या कांद्याची आवक कमी झाली आणि मागणी वाढल्याने कांद्याला चांगला दर मिळत आहे. मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता अजून काही दिवस तरी कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. - प्रशांत गायकवाड,  सभापती, बाजार समिती, पारनेर, जि. नगर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com