नाशिक जिल्ह्यात कांदा रस्त्यावर, ठिकठिकाणी आंदोलने

आठ ट्रॅक्टर कांदा चाळीत पडून आहे. या कांद्याला प्रतिकिलो ९ रुपये खर्च आला आणि एक रुपया किलो भाव मिळत आहे. -चंद्रकांत शेवाळे, कांदा उत्पादक
नाशिक जिल्ह्यात कांदा रस्त्यावर, ठिकठिकाणी आंदोलने
नाशिक जिल्ह्यात कांदा रस्त्यावर, ठिकठिकाणी आंदोलने

नाशिक : कांद्याचे भाव कोसळत असताना केंद्र व राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषधार्थ कळवण, निफाड आणि देवळा येथील कांदा उत्पादकांनी रस्त्यावर कांदा ओतून निषेध व्यक्त केला. जिल्ह्यात बुधवारी (ता. २८) सलग दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी झालेल्या या आंदोलनांमुळे वाहतूक कोंडी झाली.

कळवणला चक्काजाम कळवण येथे बुधवारी आठवडे बाजार असतो. संतप्त कांदा उत्पादकांनी रास्ता रोको केला. त्यामुळे देवळा-कळवण, कळवण-नाशिक राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा, उर्वरित शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार उपस्थित होते.   कांद्याच्या हमीभावासाठी अखेरचा लढा उभाराचा आहे. त्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ यांनी केले. छावा संघटनाही आंदोलनात उतरणार, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार यांनी दिला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, विलास रौदळ, शिवसेनेचे संभाजी पवार, शीतकुमार आहिरे उपस्थित होते.

निफाडला कांदा एक रुपये किलो उन्हाळ कांद्याला कवडीमोल भाव आहे. बुधवारी निफाड उपबाजारात उन्हाळ कांदा अक्षरश: १०० रुपये क्विंटलने विकला गेला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलावासाठी आणलेला कांदा नाशिक-औरंगाबाद मार्गावर ओतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. त्याला काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला. मोर्चेकऱ्यांनी निफाड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सरकारविरोधी घोषणाबाजी केली. कांद्याला १७०० रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, अन्यथा या पुढे ''स्वाभिमानी'' आंदोलन करेल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल यांनी दिला. या वेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विनायक शिंदे, माधव निचित आदी उपस्थित होते. त्यानंतर शेतकरी थेट नाशिक-औरंगाबाद चौफुली येथे कांदा रस्त्यावर ओतला.

व्यापाऱ्यांची कानउघाडणी निफाड उपबाजार आवारातील कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात भाग न घेण्याची भूमिका घेतली. बाजार समिती प्रशासनाने त्यांची कानउघाडणी केल्याने लिलाव झाला. या वेळी ५० ट्रॅक्टर उन्हाळ कांद्याचा लिलाव झाला. यात किमान १०० रुपये, कमाल ४००, तर सरासरी २०० रुपये भाव मिळाला. दीड हजार रुपये दराने खरेदी केलेला कांदा अजून आमच्या खळ्यावर आहे. लाल कांदे मार्केटला आल्याने उन्हाळ कांद्याला मागणी नसल्याचे व्यापारी अजय सोनी यांनी सांगितले.

शनिवारी रास्ता रोको

कांद्याला भाव मिळत नसल्याने शनिवारी (ता. १) टेहरी चौफुलीवर सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलनाची हाक शेतकऱ्यांनी समाज माध्यमांद्वारे दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com