चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली महागात

अधिक दराने बियाणे विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्याची खातरजमा करून येवला येथील दोन विक्रेत्यांवर परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
Onion seeds sold at a higher rate
Onion seeds sold at a higher rate

नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यात पावसामुळे रोपववाटीकांचे नुकसान व कमी उगवण क्षमता यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी आहेत. या पार्श्वभूमीवर काही विक्रेते विक्री किमतीपेक्षा मनमानी करत अधिक दराने बियाणे विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्याची खातरजमा करून येवला येथील दोन विक्रेत्यांवर परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यात सध्या कांदा बियाण्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही विक्रेते चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर असे गैरप्रकार रोखण्याच्या सूचना विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार कृषी विभागाच्या पथकाने येवला येथील काही दुकानाची चौकशी केली. येवला येथील एका दुकानात दोन बनावट ग्राहक पाठवून चढ्या दराने प्रतिकिलो ६ हजार रुपये दराने विक्री होत असल्याची खात्री केली. विक्री होणारे बियाणे खुले असल्याने निकृष्ट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या व्यवहारापोटी संबंधित दुकानदार बनावट बिले दिली जात होती.

ग्राहकांची कोंडी करून पैसे उकळण्याचा हा प्रकार कृषी विभागाने हाणून पाडला आहे. कृषी विभागाने केलेल्या कारवाईत येथील नंदा सिड्स व महेश सिड्स यांच्यावर ही कारवाई केली आहे. निफाडचे उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ यांच्या पथकाने विक्री दरम्यान चौकशी केली. त्यामुळे अधिक दराने बियाणे विक्री केल्याचे तपासात समोर आल्याने ही कारवाई झाली आहे. त्यानुसार कृषी विभागाच्या सूचनांनुसार संबंधितांना विक्री बंद आदेश देत परवाने निलंबित केले आहे. संबंधितांना म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. या पथकात तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, तंत्र अधिकारी श्री. देशमुख होते.

निलंबन मागे घेण्यासाठी दबाव कृषी विभागाने कारवाई केली असल्याने काही विक्रेत्यांना चाप बसला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करून चढ्या दराने विक्रीचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने कृषी विभागाने निलंबित केले आहे. मात्र, आता निलंबन मागे घेण्यासाठी विक्रेते कृषी विभागासह मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करत आहे. ज्यांनी शेतकऱ्यांची लूट करून अधिक पैसे उकळले आहेत. या पार्श्वभूमीवर निलंबन ताजे असताना त्यांना पाठीशी घालून कृषी विभागावर दबाव टाकला जात असल्याचे समजते. त्यामुळे ‘चोर तर चोर पुन्हा शिरजोर’ अशाप्रकारे पुन्हा विक्री करायला परवानगी द्यावी, यासाठी घाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com