राज्यात कांदा १०० ते २३०० रुपये क्विंटल

अकोला ः येथील बाजारात कांद्याची दररोज पाच ते सहा ट्रक आवक होत आहे. सध्या उच्चप्रतीचा कांदा २००० रुपये, तर दुय्यम प्रतीला हजार रुपयांपासून दर मिळत आहे.
Onion in the state is 100 to 2300 rupees per quintal
Onion in the state is 100 to 2300 rupees per quintal

अकोल्यात क्विंटलला १००० ते २००० रुपये

अकोला ः येथील बाजारात कांद्याची दररोज पाच ते सहा ट्रक आवक होत आहे. सध्या उच्चप्रतीचा कांदा २००० रुपये, तर दुय्यम प्रतीला हजार रुपयांपासून दर मिळत आहे. बाजारात कांद्याची मागणी चांगली आहे. सध्या सोलापूर भागातूनच अधिक आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.  

अकोला बाजारपेठेतून छोट्या बाजारात कांदा विक्रीसाठी नेला जातो. सध्या नवीन कांद्याची आवक होत आहे. असे असले तरी स्थानिक भागातील कांदा आवक तितकी वाढलेली नाही. सध्या आवक होत असलेला कांदा मध्यम स्वरूपाचा आहे. यातील उच्चप्रतीच्या कांद्याला २ हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. दुय्यम प्रतीचा कांदा हजार रुपयांपासून १५०० पर्यंत विकत आहे. किरकोळ बाजारात कांद्याची विक्री २५ ते ३० रुपये किलोने केली जात आहे.

जळगावात क्विंटलला ५०० ते १८०० रुपये  

जळगाव ः बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ३) लाल कांद्याची ५०० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ५०० ते १८०० व सरासरी १५०० रुपये, असा मिळाला. आवक यावल, चोपडा, भुसावळ, जामनेर, पाचोरा आदी भागातून होत आहे. दरात गेल्या तीन-चार दिवसांत काहीशी घसरण झाली आहे. मध्यंतरी दरात वाढ सुरू होती. आवक या आठवड्यात वाढली आहे.

औरंगाबादेत क्विंटलला ४०० ते १८०० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.३) कांद्याची ५३१ क्‍विंटल आवक झाली. त्यास ४०० ते १८०० रुपये तर सरासरी ११०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये गत काही दिवसांत कांद्याचे सरासरी दर घसरल्याचे चित्र आहे.

आठवडाभरात कांद्याचा किमान दर २०० रुपये प्रतिक्‍विंटल, तर कमाल दर ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २४ फेब्रुवारीला ३४६ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी १९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २६ फेब्रुवारीला कांद्याची आवक ४७४ क्‍विंटल, तर सरासरी दर २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २७ फेब्रुवारीला ८१० क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

२८ फेब्रुवारीला कांद्याची आवक ३०९ क्‍विंटल, तर सरासरी दर ११५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १ मार्चला २७१ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी ९५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २ मार्चला कांद्याची आवक ३१३ क्‍विंटल, तर सरासरी दर ८५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.

लासलगावात क्विंटलला ६०० ते २,०११  रुपये 

नाशिक : जिल्ह्यात खरीप लाल कांद्याची सर्वाधिक आवक होत असलेल्या लासलगाव बाजार समितीत बुधवारी (ता.२) १९,००० क्विंटल आवक झाली. त्यास किमान ६०० ते कमाल २,०११ असा दर मिळाला. तर सर्वसाधारण दर १,६५० रुपये राहिला. 

मंगळवारी (ता.१) कांद्याची आवक ११,०२२ क्विंटल झाली. त्यास किमान ५०० ते कमाल २,१०१ असा दर मिळाला तर सर्वसाधारण दर १,७७५ रुपये होते. फेब्रुवारी महिन्यात सोमवार (ता.२८) रोजी आवक २६,८११ क्विंटल झाली. त्यास ७०० ते २,१०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १,८७५ मिळाला.   

शुक्रवारी (ता.२५) आवक २१७५७ क्विंटल झाली. त्यास ७०१ ते २६४१  प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २,१७० मिळाला. गुरुवार (ता.२४) रोजी आवक १९९०६ क्विंटल झाली. त्यास ७५१  ते २,६८६ प्रतिक्विंटल दर मिळाला. 

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आवकेत वाढ झाल्याने मार्च महिन्याच्या सुरवातीस दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. बाजार समितीत उन्हाळ कांद्याची २५ फेब्रुवारीपासून तुरळक आवक सुरू झाली आहे. त्यास किमान ६०० कमाल २०११ व सरासरी १६५० दर मिळाला.

सांगलीत क्विंटलला ५०० ते २००० रुपये

सांगली ः येथील विष्णू पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात गुरुवारी (ता. ३) कांद्याची २८८२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २००० तर सरासरी १२५० रुपये दर मिळाला. 

बाजार समितीच्या आवारात सातारा, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांतून कांद्याची आवक होते. बुधवारी (ता. २) कांद्याची ९७७१ क्विंटल आवक झाली होती. कांद्यास प्रतिक्विंटल ५०० ते २०००, तर सरासरी १२५० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. २८) कांद्याची ५७०१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २२००, तर सरासरी १३५० रुपये असा दर मिळाला. बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. पुढील सप्ताहात कांद्याची आवक वाढून दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे.

परभणीत क्विंटलला ५०० ते २२०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.३) कांद्याचे दर प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल २२०० रुपये, तर सरासरी १३५० रुपये मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

येथील मार्केटमध्ये आठवड्यातील मंगळवारी आणि शनिवारी कांद्याची आवक होते. सध्या नगर, सोलापूर जिल्ह्यातून नव्या कांद्याची आवक होत आहे. शनिवारी (ता.२६) सुमारे ५०० क्विंटल, तर मंगळवारी (ता.१) १०० क्विंटल आवक झाली. गुरुवारी (ता. ३) कांद्याचे घाऊक दर प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ५०० ते २२०० रुपये होते. विविध ठिकाणच्या बाजारात किरकोळ विक्री २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी सुरेश गव्हाणे यांनी सांगितले.

सोलापुरात क्विंटलला १०० ते २३०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याला चांगला उठाव मिळाला. मागणीमुळे दरही पुन्हा टिकून राहिले. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २३०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज ३०० ते ४०० गाड्यांपर्यंत राहिली. गेल्या पंधरवड्यापासून कांद्याच्या आवकेत चढ-उतार होतो आहे. पण मागणीतील सातत्यामुळे दर टिकून आहेत. कांद्याची आवक सर्वाधिक स्थानिक भागातून झाली. बाहेरील जिल्ह्यातील आवक तुलनेने कमीच राहिली. बाहेरून मुख्यतः पुणे, नगर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड भागांतून आवक झाली. 

कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १२०० रुपये, सर्वाधिक २३०० रुपये इतका दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही कांद्याची २०० ते ३०० क्विंटलपर्यंत आवक झाली. तर दर प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये इतका दर मिळाला. प्रतिक्विंटलमागे  १०० ते २०० रुपयांच्या फरकाने  दरातील चढ-उतार वगळता कांद्याचे दर काहीसे स्थिर राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com