राज्यात कांदा १०० ते ११०० रुपये क्विंटल

पुणे : कांद्याला मागणी नसल्याने दर दहा किलोला ६० ते ९० रुपये आहे, अशी माहिती बाजार समितीमधील प्रमुख कांदा आडतदार विलास रायकर यांनी दिली.
 Onion in the state is Rs. 100 to 1100 per quintal
Onion in the state is Rs. 100 to 1100 per quintal

पुणे : कोरोनामुळे विस्कळीत झालेली शेतमालाची पुरवठा साखळी अद्यापही सावरलेली नाही. अनेक शहरांमध्ये अद्यापही हॉटेल, खानावळी, महाविद्यालयांच्या मेस बंद असल्याने कांद्याची मागणी थंडच आहे. यामुळे बाजारातील आवक देखील कमी आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सरासरी होणारी ३० ते ४० ट्रकची आवक ८ ते १० ट्रक एवढीच आहे. यामुळे कांद्याला मागणी नसल्याने दर दहा किलोला ६० ते ९० रुपये आहे, अशी माहिती बाजार समितीमधील प्रमुख कांदा आडतदार विलास रायकर यांनी दिली.

रायकर म्हणाले,‘‘ कोरोना संकटामुळे शहरांसह राज्यातील हॉटेल बंद आहेत. कांद्याची मोठ्या प्रमाणावर मागणी ही हॉटेल उद्योगांकडून असते. हॉटेलसह खानावळी बंद असल्याने कांद्याची मागणी घटली आहे. पुणे बाजार समितीमधून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. बाजार समितीमधील एकूण कांद्याच्या उलाढालीमधील सुमारे ७५ टक्के कांदा हा दक्षिण भारतात विक्री होतो. ही विक्री आता केवळ १० ते २० टक्के आहे.

दर कमी असल्याने देखील शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक करुन ठेवला असल्याने देखील कांद्याची आवक कमी आहे. सध्या भिजलेल्या कांद्यांची आवक मोठी असल्याने दर कमी आहे. बाजारपेठ दिवाळीमध्ये सुरळीत होण्याची आशा असल्याचे देखील रायकर यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये ३०० ते ७०० रुपये दर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२) कांद्यांची ९९७ क्‍विंटल आवक झाली. कांद्यांना ३०० ते ७०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २० जूनला १२४७ क्विंटल आवक झालेल्या कांद्यांचे दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २५ जूनला ११२८ क्विंटल आवक झालेल्या कांद्यांना २०० ते ६५० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. २७ जूनला १३०५ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर २०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २८ जून रोजी १०७५ क्विंटल आवक झालेल्या कांद्यांना ३०० ते ७०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. 

२९ जूनला ६८२ क्विंटल आवक झालेल्या कांद्यांचा दर १५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३० जूनला ५३७ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला ३०० ते ७०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. १ जुलैला कांद्यांची आवक ५७७ क्विंटल, तर दर २०० ते ७५० रुपये प्रति क्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

परभणीत ४०० ते ८०० रुपये दर

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२) कांद्यांचे दर प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये राहिले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

येथील मार्केटमध्ये आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी कांद्यांची आवक होते. सध्या स्थानिक परिसरातून कांद्यांची आवक येत आहे. गेल्या महिनाभरात ४०० ते १००० क्विंटल कांद्यांची आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटलला सरासरी ४०० ते ८०० रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता.२७) कांद्यांची १००० क्विंटल, तर मंगळवारी (ता.३०) ४०० क्विंटल आवक होती. त्यावेळी प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२) घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये होते. तर, किरकोळ विक्री १० ते २० रुपये प्रतिकिलो दराने सुरु होती, असे व्यापारी मो.आवैस यांनी सांगितले.

कोल्हापुरात ३०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल

कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील बाजार समितीत कांद्यांच्या आवकेत वाढ होत आहे. सप्ताहात कांद्याची दररोज तीन ते चार हजार पोती आवक झाली. कांद्यांस दहा किलोस ३० ते ११० रुपये दर मिळत आहे. 

शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत दहा दिवसांपासून कांद्याची आवक वाढली आहे. श्रींगोदा, लोणंद, दहिवडी, बारामती आदी भागातून कांद्याची आवक होत आहे. 

पावसाळा आल्याने ज्या शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सुविधा नाही. जोराचा पाऊस झाल्यास माल भिजून जाईल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी केली. तसेच लॉकाडाउनमध्ये साठविलेला कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात आणला आहे. दोन आठवड्यांपासून कांद्याची आवक वाढत आहे. यात दिवसाला ३० ते ४० गाड्या कांद्याची आवक होत आहे. केरळ, कर्नाटक, गोव्यामधून कांद्याला पुरेशा प्रमाणात मागणी नाही. त्यामुळे येथील घाऊक बाजारात कांद्याचे दर कमी झाल्याचे कांदा बाजाराच्या सूत्रांनी सांगितले.

नगरमध्ये कांद्यांना १०० ते एक हजार रुपये दर

नगर  ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीसह नेवासा, राहाता, राहुरी, पारनेर, श्रीरामपूर आदीसह सर्वच बाजार समितीत कांद्याला सरासरी १०० ते एक हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. नगर बाजार समितीत दर लिलावाला ३० ते ४० हजार गोण्यांची आवक होत आहे. 

कोरोना संसर्गामुळे बाजार समित्यात दोन ते आडीच महिने कांद्यांचे लिलाव बंद होते. आता लिलाव सुरु झाले आहेत. मात्र मागणी नसल्याने एक नंबरच्या कांद्याला सरासरी ८०० ते एक हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. दोन नंबरच्या कांद्याला ५०० ते ८००, तीन नंबरच्या कांद्याला तीनश ते पाचशे व चार नंबरच्या कांद्याला शंभर ते तीनशे रुपयांचा दर मिळत आहे.

नगर बाजार समितीत गुरूवारी (ता.२) ३२ हजार गोण्यांची आवक झाली. त्यांना १०० ते १०५० रुपयांचा दर मिळाला. शनिवारी (ता. २७) २७ हजार, तर गुरुवारी (ता. २५) रोजी ४१ हजार गोण्यांची आवक झाली. कांद्याला अजूनही परराज्यातून मागणी नसल्याने दर वाढत नसल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.

सांगलीत ३०० ते १ हजार रुपये दर

सांगली ः येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात गुरुवारी (ता.२) कांद्यांची ४३६५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३०० ते १०००, तर सरासरी ६५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीच्या आवारात सातारा, सोलापूर, नगर या जिल्ह्यातून कांद्याची आवक होते. मंगळवारी (ता.३०) कांद्यांची ९४२ क्विंटल आवक  झाली होती. कांद्यास प्रति क्विंटल ३०० ते ९००, तर सरासरी ६०० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. २९) कांद्याची १९५५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल २०० ते १००० तर सरासरी ७०० रुपये असा दर मिळाला.

शनिवारी (ता. २७) कांद्याची २८२८ क्विंटल आवक झाली होती. कांद्यास प्रति क्विंटल २०० ते १००० तर सरासरी ६५० रुपये असा दर होता. गतसप्ताहापेक्षा चालु सप्ताहात कांद्याच्या आवकेत वाढ झाली असून दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली.

सोलापुरात कांद्यांना सर्वाधिक ११०० रुपये 

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक कमी असली, तरी त्यांचे दरही स्थिर राहिले आहेत, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ११०० रुपये इतका दर मिळाला.  बाजार समितीच्या आवारात कांद्याचे लिलाव फक्त सोमवारी आणि गुरुवारी असे दोनच दिवस चालतात. या दोन्ही दिवशीच फक्त लिलाव होत असल्याने कांद्यांची आवक वाढेल, अशी शक्यता होती. पण, सध्या कांद्यांची आवक कमीच आहे. या सप्ताहात या दोन्ही दिवशी प्रत्येकी ४० ते ५० गाड्या पर्यंत आवक होती. दर प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक ११०० रुपये होता.

या आधीच्या सप्ताहातही आवक काहीशी अशीच ५० ते ७० गाड्यापर्यंत  राहिली. दर प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ४०० रुपये, तर सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला.  त्या आधीच्या सप्ताहातही आवक थोडीशी वाढली,  पण दर जैसे थे राहिले. किमान १०० रुपये, सरासरी ५५० रुपये, सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला.

जळगावात ३५० ते ७०० रुपये दर

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२) १७०० क्विंटल लाल कांद्यांची आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक पाचोरा, जळगाव, एरंडोल, चोपडा, यावल आदी भागातून होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. आवक कायम असली तरी दर अपेक्षित मिळत नसल्याची माहिती मिळाली. 

आवक, दर (प्रतिक्विंटल, रुपये)

तारीख आवक  किमान दर कमाल दर
२ जुलै  १७००  ३५० ७००
२५ जून  २५००  ३०० ५५०
१८ जून २६०० ३००  ५००
११ जून  २८५०  ३००  ५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com