कांद्यातील तेजी-मंदीचे सूत्र

कांद्यातील तेजी-मंदीचे सूत्र
कांद्यातील तेजी-मंदीचे सूत्र

कांदा बाजाराच्या दृष्टीने नव्या वर्षाची सुरवात चांगली झाली आहे. सध्या रांगड्या कांद्याची आवक सुरू आहे. दिवाळीच्या आसपास पोळ कांदा बाजारात असतो, तर डिसेंबर- जानेवारी महिन्यात रांगडा कांदा बाजारात असतो. नावाप्रमाणेच रांगडा, म्हणजे एकरी उत्पादकता, आकार, चव अशा सर्वच बाबतीत हा कांदा सरस असतो. नाशिक जिल्ह्यातील गिरणा खोऱ्यात चांगले हवामान असल्यास एकरी १५ ते २० टन उत्पादन मिळते. गेल्या महिनाभरापासून कांद्यात सातत्यपूर्ण तेजी आहे. डिसेंबर २०१७ मध्ये चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा सरासरी विक्री दर विक्रमी २५०० रु. प्रतिक्विंटल राहिला. गेल्या वर्षी पावसाळी कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली. बियाणे कंपन्यांकडील निरीक्षणानुसार मे ते जुलैदरम्यान गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी विक्री झाली होती. अर्थात तसे होणे स्वाभाविक होते. कारण डिसेंबर २०१५ ते जून २०१७ अशी १९ महिने चाललेली अभूतपूर्व मंदी बाजाराने पाहिली. रांगडा कांद्याचे दोन हंगाम आणि एक पावसाळी व एक रब्बी असे चार हंगाम बाजाराच्या दृष्टीने फेल ठरले. या हंगामांतील सरासरी विक्री दर हा उत्पादन खर्चापेक्षा कमी होता. नाशिक-नगर-पुण्यातील कांदा उत्पादक गावे आर्थिकदृष्ट्या उजाड होण्याच्या मार्गावर होती. अर्थात, मंदीनंतर तेजी येणारच हा ठाम विश्वास असणाऱ्या व्यावसायिक कांदा उत्पादकांनी हार मानली नव्हती. उन्हाळ हंगामात दणकून कांदा लागवड झाली आणि नेहमीप्रमाणे तो व्यवस्थित साठवला गेला. जून २०१७ पासून कांदा बाजारात तेजी अपेक्षित होती; पण या महिन्यांतील शेतकरी संपामुळे १५ दिवस बाजार विस्कळित झाला. त्यामुळे तेजी सुरू होण्यासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागली. जुलै २०१७ पासून कांदा बाजाराच्या इतिहासातील सर्वांत दिमाखदार तेजीला प्रारंभ झाला आणि आजतागायत ती टिकून आहे. गिरणा-गोदावरी खोऱ्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा व्यवस्थित स्टॉक केला होता, त्यांना किफायती उत्पन्न मिळाले आहे. अनूकूल हवामानामुळे चाळीमधील कांदा शेवटपर्यंत म्हणजे नोव्हेंबर २०१७ च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत व्यवस्थित होता. २० ते ३० टकक्यापर्यंत प्रमाणित घट होऊनही अडीच हजार रु. प्रतिक्विंटलवर बाजार टिकून राहिल्याने चांगला पैसा झाला. सामान्य शेतकऱ्यांनी ५० ते २०० क्विंटल, मध्यम शेतकऱ्यांनी २०० ते ५०० क्विंटल तर काही मोठ्या शेतकऱ्यांनी ५०० ते ८०० क्विंटल माल या तेजीत काढला आहे. सुमारे ९० टक्के उन्हाळ कांदा तेजीत विकला, असे म्हणावे लागेल. शिवाय १५ नोव्हेंबरपासून नव्या मालासही किफायती बाजार मिळत आहे. परिणामी १९ महिन्यातील महामंदीमुळे गावागावांत आलेली आर्थिक मरगळ झटकली गेली आहे. ॲग्रोवनमधील १५ ऑगस्ट २०१६ रोजी याच सदरात 'दीर्घकालीन मंदीत तेजीची बीजे' या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला होता. २०१७ हे वर्ष कांद्यासाठी चांगले जाईल, शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड नियमित ठेवावी, असे आवाहन केले होते. त्यामागचे गृहीतक असे होते, की ऑगस्टपर्यंत मंदीला ८ महिने झाले होते आणि स्टॉकमधील उन्हाळ कांदा हा जून २०१७ पासून विक्रीला येणार होता. त्या वेळच्या दीर्घ मंदीमुळे पर राज्यातील उन्हाळ व त्यानंतरच्या पावसाळी अशा दोन्ही हंगामातील उत्पादन कमी होणार, हे स्पष्टच होते. नेमके तसेच झाले. ऑगस्ट २०१६ ते जून २०१७ पर्यंत मंदी सुरुच होती आणि याच मंदीत पिकवलेला कांदा पुढे जुलैपासून मोठ्या तेजीत आला, हे आपण पाहिलेच आहे...खरे तर या तेजीचे श्रेय द्यावे लागेल ते कांदा उत्पादनातील संशोधनाला. मार्चनंतर हार्वेस्ट झालेला कांदा आठ-आठ महिने साध्या पत्र्याच्या चाळीत सुरक्षित राहतो व चांगला मोबदला मिळवून देतोय, ही अत्यंत समाधानाची बाब होय. या तेजीच्या श्रेयात कांदा निर्यातीचा मोठा वाटा आहे. २०१६-१७ मध्ये ३० लाख टनाहून अधिक कांदा निर्यात झाल्यामुळे शिल्लक साठा वेगाने देशाबाहेर गेला आणि  पुढे मागणी-पुरवठ्यात शेतकऱ्याला परवडेल, अशी तफावत तयार झाली.  पूर्वी कांद्याचा एक हंगाम किंवा चार-सहा महिने मंदी टिकायची. आता अठरा-अठरा महिने आणि चार-चार हंगाम मंदीत जाताहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडील वाढलेली साठवण क्षमता होय. आजघडीला मार्चनंतर आपण सहा-सहा महिन्यांची इन्व्हेंटरी (साठा) घेवून चालतोय. यामुळे स्वाभाविकपणे पावसाळी कांद्याचे महत्त्व कमी झालेय. कारण हा कांदा ज्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात येतो, तोपर्यंत जून कांदा बाजारात शिल्लक असतो. यंदा तर हा कालावधी नोव्हेंबरपर्यंत लांबला आहे. आगाप लागवड विचारात घेता मार्च ते नोव्हेंबर या नऊ महिन्यांवर उन्हाळ कांद्याचा बाजारावर प्रभाव असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. उन्हाळ मालातील दीर्घ मंदीमुळे ज्या ज्या वेळी पावसाळी लागवड मोठ्या प्रमाणावर घटेल, त्यानंतर पुढे तेजी असेल, हे सूत्र पुढील काळात रूढ होईल, असे दिसते.

(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com