कांदा खरेदीनंतर अवधीच्या निर्णयात गोंधळ : व्यापारी

बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी ३ दिवसांचा कालावधी दिला आहे. मात्र पूर्वीच्या साठ्याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे निर्णयात गोंधळ कायम आहे. केंद्राने उपलब्ध साठ्याबाबत भूमिका स्पष्ट करावी.
onion
onion

नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी ३ दिवसांचा कालावधी केंद्र सरकारने दिला आहे. मात्र पूर्वीच्या साठ्याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे निर्णयात गोंधळ कायम आहे. केंद्राने उपलब्ध साठ्याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने कांद्यावर साठा मर्यादा घातल्याने लिलाव प्रक्रिया अडचणीत सापडली होती. व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी ३ दिवसांचा कालावधी केंद्र सरकारने दिला आहे. याबाबत दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी माहिती दिली.  कांदा लिलाव प्रक्रियेत शेतकरी व व्यापारी यांची होत असलेली अडचण सोडविण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा केली. त्यानुसार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यावर विचार विनिमय करून हा निर्णय घेतला. त्यानुसार बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर पुढील तीन दिवस अवधी हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र ग्राहक संरक्षण विभागाचे सीता राम मीना यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे. त्यानुसार देशातील राज्य व संघ राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात याव्यात, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा कांदा लिलाव सुरू झाले असून कामकाजात गती येईल असे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया खरेदीसाठी २५ टन कांदा ही क्षमता कमी असल्याने ती वाढविण्यासाठी व्यापाऱ्यांची मागणी होती. त्यानुसार पर्याय म्हणून आता २५ टन कांदा खरेदी केल्यानंतर त्यास पुढील तीन दिवस हाताळणी व प्रतवारीसाठी अवधी दिला आहे. मात्र तिसऱ्या दिवशी खरेदी केलेल्या कांद्याची निकासी करावी लागणार आहे.  - डॉ. भारती पवार, खासदार

अगोदरचा साठा २५ टनांपेक्षा अधिक शिल्लक आहे. त्यात खरेदीसाठी उतरलो आहोत. मात्र केंद्राने २५ टन कांद्याला हाताळणी, प्रतवारीसाठी तीन दिवसांचा अवधी दिल्याचे सांगितले आहे. मात्र पूर्वीच्या साठ्याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे निर्णयात गोंधळ कायम आहे. केंद्राने उपलब्ध साठ्याबाबत भूमिका स्पष्ट करावी. - नंदकुमार डागा, उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com