पुणे बाजार समितीमध्ये कांद्याची उलाढाल ३५० कोटींवर

या बाजार समितीमधून देशाच्या विविध भागांत शेतीमाल पाठविला जातो. आवक कमी झाल्याने देशभरातून मागणी वाढली. दरदेखील १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत वाढले. बाजार समितीमधील सुविधांमुळे विविध राज्यांतील खरेदीदार, निर्यादार या समितीमधून कांदा खरेदी करतात. - बी. जे. देशमुख,प्रशासक, बाजार समिती, पुणे
Onion turnover in Pune Bazar Samiti at Rs 350 crore
Onion turnover in Pune Bazar Samiti at Rs 350 crore

पुणे : यंदा लांबलेला पाऊस, अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याच्या रोपवाटीकांचे नुकसान झाले. लांबलेला हंगामामुळे कांद्याचे उत्पादन घटले. गेल्या चार महिन्यांत कांद्याचे दर १५० पर्यंत वाढले होते. चाळींमध्ये साठवलेल्या कांद्याला चांगले दर मिळाले. परिणामी, पुणे बाजार समितीमध्ये गेल्या तीन-साडेतीन महिन्यात कांद्याची सुमारे ३४५ कोटी ८२ लाख १४ हजार रुपये इतकी उलाढाल झाली. या वाढलेल्या उलाढालीमुळे बाजार समितीला बाजार शुल्काद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. 

‘‘बाजार समितीमध्ये १ ऑक्टोबर ते २३ डिसेंबर या कालावधीत तब्बल ५ लाख ७६ हजार ३६९ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये ५ लाख ६८ हजार ३६८ क्विंटल महाराष्ट्रातून, तर तुर्कस्थान आणि इजिप्तमधून सुमारे ८ हजार क्विंटल आवक झाली. प्रतवारीनुसार क्विंटलला १ हजार ५०० ते सर्वाधिक १५ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. सरासरी ६ हजार रुपये दर मिळाला. यामधून गेल्या तीन महिन्यांत फक्त कांद्याची सुमारे ३४५ कोटी ८२ लाख १४ हजार रुपये इतकी उलाढाल झाली,’’ अशी माहिती बाजार समितीच्या फळे व कांदा बटाटा विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी दिली.

कांद्याच्या हंगामाबाबत ज्येष्ठ आडतदार विलास रायकर म्हणाले,‘‘ यंदा पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका कांद्याला बसला. कांदा शेतातच भिजून सडला. नवीन लागवडीसाठी करण्यात आलेल्या रोपवाटिकांमधील रोपे अवकाळी पावसाने सडली. यामुळे नवीन हंगाम देखील लांबला. परिणामी बाजारातील आवक कमालीची घटली होती. यामुळे कांद्याची मागणी देशभरातून वाढल्याने क्विंटलचे दर १५ हजार रुपयांपर्यंत वाढले होते.’’ 

सेसचे उत्पन्न वाढणार

‘‘बाजार समितीला गेल्या वर्षी (२०१८-१९) कांदा-बटाटा विभागातून ५ कोटी ४२ लाख ३६ हजार ८७१ रुपये सेसद्वारे उत्पन्न मिळाले. मागील तीन महिन्यांत फक्त कांद्याच्या उलाढालीतून सुमारे अडीच कोटी रुपयांचा सेस मिळाला आहे. अजुनही कांद्याचे भाव कमी झाले असले, तरी दर टिकून आहेत. आवक चांगली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा-बटाटा विभागाचा सेसमध्ये सुमारे ४० टक्क्यांपर्यंत वाढीचा अंदाज आहे,’’ असे बिबवे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com