मोबाईल ॲपद्वारे निर्यातक्षम फळे, भाजीपाल्यांची ऑनलाइन नोंदणी

सध्या मॅंगोनेट, अनारनेट, व्हेजनेट, सिस्ट्रसनेट आणि बिटलनेट या कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते. ही नोंदणी आता मोबाईल ॲपद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Online registration of exportable fruits and vegetables through mobile app
Online registration of exportable fruits and vegetables through mobile app

सध्या मॅंगोनेट, अनारनेट, व्हेजनेट, सिस्ट्रसनेट आणि बिटलनेट या कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते. ही नोंदणी आता मोबाईल ॲपद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निर्यातक्षम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या सुविधेचा फायदा घेतला पाहिजे.  गेल्या काही वर्षांपासून युरोप आणि इतर देशांना कीडनाशक उर्वरित अंशमुक्त आणि आरोग्याच्या सुरक्षिततेची हमी देण्याकरिता फळ बाग आणि भाजीपाला नोंदणी प्रमाणपत्रांची मागणी वाढत आहे. त्याकरिता मागील पंधरा वर्षांपासून द्राक्ष पिकासाठी ‘ग्रेपनेट' ही ऑनलाइन कार्यप्रणाली अपेडामार्फत विकसित करण्यात आली आहे. त्यांची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत करण्यात येते. या कार्यप्रणालीबाबत कृषी आयुक्तालयातील निर्यात विभागाचे सल्लागार गोविंद हांडे म्हणाले, की या कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून लेखी अर्ज घेऊन बागेची तपासणी केली जाते. त्यानंतर कृषी विभागामार्फत ‘अपेडा’च्या संकेतस्थळावर ‘ग्रेपनेट’ अंतर्गत नोंदणी करून प्रमाणपत्र संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येते. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष निर्यातीकरिता याचा वापर करणे निर्यातदारास बंधनकारक केले आहे. सध्या ग्रेपनेटअंतर्गत सुमारे ३४ हजार द्राक्ष बागायतदारांनी निर्यातीकरिता नोंदणी केली आहे. ‘ग्रेपनेट’च्या योग्य अंमलबजावणीमुळे आयातदार देशाच्या प्लँट कॉरंटाइन अटीची पूर्तता केल्यामुळे द्राक्ष निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या आंब्याकरिता मॅंगोनेट, डाळिंबाकरिता अनारनेट, भाजीपाल्यासाठी व्हेजनेट, संत्रा, मोसंबी व लिंबू यासाठी सिस्ट्रसनेट आणि विड्याच्या पानांसाठी बिटलनेट या कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते. ही नोंदणी आता मोबाईल अॅपद्वारे देखील करता येते. त्याचा निर्यातक्षम उत्पादक शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे.  मोबाईल ॲप चे महत्त्व  सध्या निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांकडून लेखी अर्ज घेऊन कृषी विभागामार्फत नोंदणीची प्रक्रिया करण्यात येते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शेतकऱ्यांची धावपळ होऊ नये आणि कामांमध्ये जास्त अडथळा येऊ नये म्हणून शेतकऱ्यांना स्वतः ऑनलाइनद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करता यावी यासाठी अपेडामार्फत ‘फार्म रजिस्ट्रेशन’ हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे.   ‘ॲप’ची उपयुक्तता 

  • अ) शेतकरी   :  राज्य आणि देशातील ज्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करून निर्यातदारास पुरवठा करावयाचा आहे, अशा शेतकऱ्यांसाठी बागेची नोंदणी करण्याकरिता हे ॲप अत्यंत उपयुक्त.    
  • ब) कृषी विभागाचे अधिकारी :   ऑनलाइन प्राप्त अर्जांची छाननी करून प्रमाणपत्र देण्यासाठी.
  • क) कीडनाशक उर्वरित अंश तपासणी : उर्वरित अंश तपासणी आणि प्रयोगशाळेसाठी नमुने घेण्याकरिता.
  • ॲपमध्ये पिकांचा समावेश  फार्म रजिस्ट्रेशन या मोबाईल अॅपमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याकरिता एकूण सहा पिकांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला (१४ पिके), संत्रा, मोसंबी व लिंबू आणि विड्याची पाने यांचा समावेश आहे.   ‘ॲप ' वापराकरिता या बाबींची आवश्यकता ॲप वापरण्यासाठी शेतकऱ्यांकडे अॅण्ड्राइड बेस मोबाईल तसेच इंटरनेटची सुविधा असावी. यामुळे अॅप वापरणे सहज शक्य होते. असे करा ॲप डाउनलोड  

  • संबंधित ॲप  हे अपेडाच्या संकेतस्थळावर (www.apeda.gov.in) उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर हॉर्टिनेटअंतर्गत `Farm Registration App` डाउनलोड करण्याची सुविधा आहेत. 
  • तसेच Google Play Store वरून Farm Registration App डाउनलोड करता येते. 
  • ॲपवर नोंदणीची पद्धत  मोबाईलवर अॅप डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्याने आपला आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाची माहिती भरल्यानंतर प्रत्येकाचा OTP नंबर तयार होतो. तो प्रत्येकाने स्वतःजवळ लिहून ठेवणे गरजेचे आहे. ॲपद्वारे अर्ज करण्याची पद्धत 

  • अॅप डाउनलोड केल्यानंतर प्राप्त झालेला OTP नंबर टाकून संबंधित अॅपवर कोणत्या पिकांसाठी अर्ज करावयाचा आहे, हे पाहावे. 
  • आपल्या पिकानुसार  ग्रेपनेट, मॅंगोनेट, अनारनेट, व्हेजनेट, सिस्ट्रसनेट आणि बिटलनेट यापैकी निवड करावी. त्याप्रमाणे नोंदणीचा ऑनलाइन अर्ज उपलब्ध होतो.  
  • संबंधित अॅप मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत उपलब्ध आहे. यापैकी आपल्या गरजेनुसार भाषेची निवड करावी.
  • ऑनलाइन अर्ज करताना ही माहिती आवश्यक 

  • अॅपमध्ये निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याकरिता ‘प्रपत्र-अ‘ मध्ये विहित करण्यात आलेला अर्ज आहे. 
  • त्यामध्ये प्रामुख्याने ज्याच्या नावाने सातबारा आहे, त्या शेतकऱ्याचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल (असेल तर) सातबारा क्रमांक, सर्व्हे क्रमांक, पिकाचे नाव, जात, लागवडीची तारीख, क्षेत्र, बहर धरल्याचा दिनांक, संभाव्य काढणीची तारीख, ग्लोबल गॅप प्रमाणपत्र असल्यास त्याचा नंबर, अंदाजे उत्पादन आणि इतर माहिती भरावी.
  • नवीन बागेची ऑनलाइन नोंदणी

  • नवीन बागेच्या नोंदणीकरिता पिकाप्रमाणे ‘नेट'ची निवड करून आपली आणि आपल्या बागेची सविस्तर माहिती भरावी. 
  • बाग ज्या जिल्ह्यात येते, तो जिल्हा निवडावा.
  • त्यानंतर बागेचा सात बारा स्कॅन कॉपी आणि बागेच्या नकाशाची स्कॅन प्रत ऑनलाइन जोडणे आवश्यक आहे.
  • बागेचे नूतनीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी 

  • निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याकरिता अॅपद्वारे माहिती देणे आवश्यक आहे. अर्जासोबत सातबारा आणि इतर माहिती देण्याची गरज नाही. 
  • पूर्वी सादर केलेल्या माहितीत बदल करावयाचा झाल्यास तशी ऑनलाइन माहिती अद्ययावत केल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून दिले जाते.
  • निर्यातक्षम बागांची नोंदणी 

  • निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात येते.
  • सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना ‘नोंदणी अधिकारी’ म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. 
  • सर्व सहा नेटची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्ह्यांकरिता राबविण्यात येत आहे. 
  • निर्यातक्षम बागांची नोंदणीकरिता तपासणी  निर्यातक्षम बागांची तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्ह्यातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी अधिकारी यांना तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी  प्रत्येक फळ आणि भाजीपाला पिकांकरिता नोंदणीचा कालावधी ठरविण्यात आला आहे, तो खालीलप्रमाणे...

    द्राक्ष ग्रेपनेट १ ऑक्टोबर ते २० डिसेंबर
    डाळिंब अनारनेट वर्षभर
    आंबा मॅंगोनेट १  डिसेंबर ते २१ मार्च
    भाजीपाला व्हेजनेट वर्षभर
    संत्रा, मोसंबी, लिंबू सिट्रसनेट वर्षभर
    खाण्याची पाने बिटलनेट   वर्षभर

    मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन प्राप्त अर्जावर कृषी विभागामार्फत होणारी कार्यवाही 

  • कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्यातक्षम बागांची ट्रेसिबिलिटी नेटद्वारे नोंदणी करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात अपेडामार्फत `Login Id` आणि Passward देण्यात आलेला आहे. 
  • कृषी विभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवर Farm Registration App डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर त्यांना दिलेला `Login Id` आणि Passward चा वापर करून मोबाईल अॅपद्वारे प्राप्त अर्जानुसार संबंधित निर्यातक्षम बागेची  पाहणी करून ऑनलाइनद्वारे अर्जावर कार्यवाही केली जाते.
  • ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार माहिती 

  • अॅपद्वारे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी त्यांना दिलेला ओटीपी नंबरद्वारे माहिती मिळते. 
  •  त्यांच्या अर्जावर कार्यवाही झाली असल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बागेची नोंदणी झाल्याचा संदेश व नोंदणी क्रमांक येतो.
  • निर्यातक्षम बागेस मिळतो नोंदणी क्रमांक 

  • निर्यातक्षम बागेकरिता ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे १२ डिजिट कायमचा नोंदणी क्रमांक दिला जातो. 
  • यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गाव, पीक इत्यादी तपशिलाचा कोड नंबरमध्ये समावेश असतो. नोंदणी प्रमाणपत्रात बारकोड दिला जातो.
  • नोंदणी प्रमाणपत्र महत्त्वाचे 

  • ज्यांनी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची नोंदणी केली आहे, त्यांना निर्यातक्षम उत्पादन शेतकरी म्हणून त्यांच्या नावाने नोंदणी प्रमाणपत्र मिळते.
  • युरोप आणि इतर देशांमध्ये निर्यातीकरिता द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला आणि इतर नोंदणीकृत पिकांकरिता नोंदणीप्राप्त शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करून निर्यात करणे आवश्यक केले आहे.
  • येथे पाहा बागेच्या नोंदणीचा तपशील    नोंदणी केलेल्या निर्यातक्षम शेतकऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि नोंदणी क्रमांक ‘अपेडा‘च्या  वेबसाइटवर हॉर्टिनेट अंतर्गत Directory मध्ये गावनिहाय, तालुकानिहाय, जिल्हानिहाय व राज्यनिहाय तपशील दिलेला आहे, तो सर्वांना पाहता येतो. निर्यातक्षम बाग नोंदणीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर... निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याकरिता अपेडाने सर्व राज्यांकरिता सुविधा उपलब्ध केलेली आहे. एकूण देशातील नोंदणीपैकी ८० टक्के काम महाराष्ट्रामध्ये करण्यात येते. म्हणून महाराष्ट्र राज्य हे फळे व भाजीपाला निर्यातीमध्ये आघाडीवर आहे. उर्वरित अंश तपासणीकरिता सुविधा 

  • निर्यातक्षम नोंदणीकृत बागेतील मालाच्या उर्वरित अंश तपासणीकरिता नमुने घेण्याचे अधिकार अपेडा प्राधिकृत उर्वरित अंश प्रयोगशाळांना दिलेले आहेत.
  • त्यांनाही या अॅपद्वारे नोंदणीकृत बागेतून प्रपत्र चार ब ची शिफारस कृषी विभागामार्फत ऑनलाइन आवश्यक केल्यानंतर घेण्यात येते.
  • उर्वरित अंश नमुन्याचा अहवाल

  • उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता नमुना घेतल्यानंतर त्यांची प्रपत्र पाच मध्ये नमूद केलेल्या यादीप्रमाणे तपासणी करून त्याचा शेतकरी, बागनिहाय अहवाल ऑनलाइन प्रसिद्ध केला जातो. 
  • हा अहवाल शेतकऱ्यांना स्वतः डाउनलोड करण्याच्या सुविधा अपेडाच्या वेबसाइटवर दिलेल्या आहेत. त्याकरिता शेतकऱ्यांनी त्यांच्या बागेचा नोंदणी क्रमांक आणि बागेचा प्रपत्र चार ब चा क्रमांक टाकल्यानंतर त्यांना त्यांच्या बागेचा उर्वरित अंश तपासणी अहवाल डाऊनलोड करून घेता येतो.  
  • नोंदणीकरिता अडचणी आल्यास संपर्क  

  • ऑनलाइन फॉर्म भरताना अडचणी आल्यास अपेडाच्या संकेतस्थळावर `Help Desk` ही सुविधा दिलेली आहे. तेथे तक्रार केल्यास मार्गदर्शन करण्यात येते. 
  • संबंधित जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी यांना समन्वय अधिकारी म्हणून निवडलेले आहे. त्यांच्याकडे किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, राज्य स्तरावर कृषी निर्यात कक्ष किंवा अपेडा, मुंबई यांच्यामार्फतही अडचणीचे निराकरण करण्यात येते.   
  • पाहा निर्यातक्षम नोंदणीकृत बागांची माहिती ग्रेपनेट, मॅंगोनेट, अनारनेट, व्हेजनेट, सिट्रसनेट आणि बिटलनेट अंतर्गत नोंदणी झालेल्या तालुकानिहाय, जिल्हानिहाय, राज्यनिहाय आणि पीकनिहाय नोंदणीचा अद्ययावत तपशील MIS Report द्वारे प्रत्येक ट्रेसिबिलिटी नेटद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तो सर्वांना पाहता येतो. नोंदणीचे काही लक्ष्यांक 

  • राज्यातील फळे व भाजीपाला पिकांखालील क्षेत्र लक्षात घेऊन निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांना चांगल्या दर्जाची, कीडनाशक उर्वरित अंशमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध होणे गरजेचे आहे.
  • येत्या २०२०-२१ मध्ये जिल्हानिहाय आणि पिकांची नेटनिहाय असे एकूण दोन लाख बागांच्या नोंदणीचा लक्षांक निर्धारित करण्यात आलेला आहे. 
  • हा लक्ष्यांक साध्य करण्याकरिता `फार्म रजिस्ट्रेशन अॅप`चा जास्तीत जास्त वापर करण्याकरिता चालू वर्षी कृषी विभागामार्फत खास मोहीम राबविण्यात येत आहे.
  • संपर्क: गोविंद हांडे, ९४२३५७५९५६ (सल्लागार, निर्यात विभाग, कृषी आयुक्तालय, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com