हमीभावासाठी ऑनलाईन नोंदणी

आधारभूत किंमतीसाठी ऑनलाईन नोंदणी
आधारभूत किंमतीसाठी ऑनलाईन नोंदणी

नांदेड ः आधारभूत किंमत दराने मूग, उडिद, सोयाबीनची खरेदी करण्यासाठी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तूर्त १४ ठिकाणच्या शासकीय खरेदी केंद्रांवर आॅनलाईन नोंदणी करता येणार आहे. परिपपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्यानंतर खरेदी केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे. मूग, उडदाची नोंदणी सुरू झाली असून ९ आॅक्टोबर पर्यंत (१४ दिवस) करता येणार आहे. सोयाबीनची नोंदणी १ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर (एक महिना) या कालावधीत करता येईल, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात मूग, उडिद खरेदीसाठी नाफेडचे बिलोली, देगलूर, मुखेड आणि विदर्भ मार्केटींग फेडरेशनचे धर्माबाद येथे खरेदी केंद्र असेल. सोयाबीन खरेदीसाठी नाफेडचे नांदेड, भोकर, बिलोली, देगलूर, मुखेड या ठिकाणी तर विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनचे धर्माबाद येथे केंद्र असणार आहे. खरेदी केंद्रामध्ये वाढ प्रस्तावित आहे.

परभणी जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नाफेड (जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय) ची जिंतूर, सेलू, पालम, पूर्णा याठिकाणी विदर्भ को आॅपरेटिव्ह फेडरेशनची मानवत आणि गंगाखेड येथे खरेदी केंद्र सुरू होतील. परभणी तालुका खरेदी-विक्री संघाने असमर्थता दर्शविल्यामुळे परभणी येथे शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. पाथरी येथेही शेतकरी उत्पादक कंपनीकडून खरेदी प्रस्तावित आहे. सोनपेठ येथील प्रस्ताव परिपूर्ण नाही.

हिंगोली जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नाफेड (जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालया) ची जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ) आणि वसमत येथे खरेदी-विक्री संघामार्फत तर कळमनुरी आणि सेनगाव येथे शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत खरेदी केली जाणार आहे. २०१६ मधील उडीद खरेदीतील अनियमिततेमुळे यंदा हिंगोली येथील खरेदी-विक्री संघाची एजन्सी म्हणून नेमणूक केली जाणार नाही. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी (ता. २७) पासून आॅनलाइन नोंदणी सुरू होणार आहे.

तूर्त या तीन जिल्ह्यांतील १४ ठिकाणी आॅनलाइन नोंदणी करता येईल. प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर केंद्रांच्या संख्येत वाढ होईल, असे सूत्रांनी सांगितले. मूग, उडदासाठी ९ आॅक्टोबरपर्यंत तर सोयाबीनसाठी १ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत नोंदणी करता येईल. त्यानंतर नोंदणी होणार नाही. शेतकऱ्यांनी आधार कार्डची प्रत, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची नोंद असलेला ७-१२ उतारा सादर करावयाचा आहे. शेतकऱ्यांचा कार्यरत असलेला मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर द्यावयाचा आहे.

नोंदणीच्या क्रमवारीनुसार शेतमाल खरेदी केंद्रावर घेऊन येण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. एसएमएसशिवाय आणलेला माल परत पाठविण्यात येईल. एफएक्यू दर्जाचा (काडीकचरा विरहित, चाळणी करून तसेच सुकविलेला) १२ टक्केपेक्षा जास्त आर्द्रता नसलेला माल आणावा. संबंधित केंद्रावरील खरेदी संस्था शेतकऱ्यांची नोंदणी, माल घेऊन येण्यासाठी पाठविण्यात आलेला एसएमएस, शासनाने निश्चित केलेल्या उत्पादकतेनुसार, खरेदीच्या मर्यादेनुसार ७-१२ उताऱ्यावरील पीक पेऱ्याची नोंद, खरेदी करावयाच्या पिकाची नोंद, गुणवत्ता नियंत्रकाने (ग्रेडर) ने निश्चित केलेला शेतीमालाचा दर्जा, इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजणी झाल्यानंतर शेतीमालाची नोंद वजनासह करुरून काटापट्टी शेतकऱ्यांना देण्यात येईल. खरेदी केलेल्या मालाची एनईएमएल पोर्टलवर त्याचदिवशी नोंद करणे सबएजंट - खरेदी संस्थेवर बंधनकारक राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com