ऑनलाइन सातबाऱ्यावर पीकपेरा नसल्याने खोळंबा

ऑनलाइन सातबाऱ्यावर पीकपेरा नसल्याने खोळंबा
ऑनलाइन सातबाऱ्यावर पीकपेरा नसल्याने खोळंबा

नगर ः हमीभावाने तूर खरेदीसाठी सुरू झालेल्या केंद्रावर आता हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू आहे. त्यासाठी ऑनलाइन सातबाऱ्यावर हरभऱ्याचा पीकपेरा असणे आवश्यक आहे. मात्र, ऑनलाइन सातबाऱ्यावर नोंद झालेली नसल्याने तलाठी सातबाऱ्यावर लिखित नोंद करून देत आहेत. 

मात्र हस्तलिखित ऐवजी सातबाऱ्यावर ऑनलाइन नोंदणी असल्याशिवाय हरभरा विक्रीसाठी नोंदणी करता येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. हस्तलिखित सातबारा ग्राह्य धरण्यासाठी तहसीदारांचे पत्र हवे आहे, असे सांगितले जात असताना महसूल प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळावा यासाठी नाफेडने जिल्ह्यात वांबोरी, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, नगर, कर्जत, खर्डा, जामखेड, श्रीगोंदा, मिरजगाव व नेवासा येथे तूर खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रावर तूर खरेदी सुरू आहे. मात्र, तूर खरेदीला अजूनही फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. 

यंदा नगर जिल्ह्यामध्ये सत्तर हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. गेल्यावर्षी दुष्काळाने हरभऱ्याचे पीक आले नाही. यंदा चांगले पीक आले असल्याने बाजारात पुन्हा हमी दराचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी तूर खरेदी सुरू आहे. त्याच अकरा केंद्रावर हरभरा खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली आहे.

बारदाना नसल्याने अनेक ठिकाणी तूर खरेदी बंद आहे. आता सातबाऱ्यावर ऑनलाइन नोंदणी करताना पीकपेऱ्याची ऑनलाइन नोंद नसल्याने हमी केंद्रावर नोंदणीला अडचणी येत आहे. म्हणजे सरकार शेतकऱ्यांसाठी चांगले काम करत असताना केवळ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचे दिसत असून याबाबत आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत.  - संदेश कार्ले, नेते, शिवसेना, नगर 

मी हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करायला गेलो होतो. मात्र, सातबाऱ्यावर ऑनलाइन पीकपेऱ्याची नोंद नसल्याने व हस्तलिखित नोंद ग्राह्य धरत नसल्याने हरभरा विक्रीसाठी हमी केंद्रावर नोंदणी करायला अडचणी येत आहेत. त्यामुळे आता अडचण निर्माण झाली असून नोंदणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - अमोल वाव्हळ, शेतकरी, सारोळा कासार, जि. नगर   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com