सिंधुदुर्गात तरुणांकडून ऑनलाइन भाजीविक्री

भाजीविक्री
भाजीविक्री

कणकवली ः जिल्ह्यातील १४ कृषी पदवीधर तरुणांनी कोकण ॲग्रो फेसबुक पेज आणि व्हॉटस्‌अॅपच्या माध्यमातून नैसर्गिक भाजीपाला पुरवठा करण्याबाबत प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्याच्या विविध भागांतून नियमित लागणाऱ्या भाजीपाल्याची मागणी ऑनलाइन नोंदविण्यात येत आहे. ताजा भाजीपाला घरपोच केला जाणार आहे. यासाठी येत्या उन्हाळी हंगामात जिल्ह्यातील काही भागांमध्ये नैसर्गिक भाजीपाला शेती केली जाणार आहे. या आगळ्या वेगळ्या धाडसी पावलातून नव्या पिढीला शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.  दिग्विजय राणे या तरुणाने ॲरॉनॉटिक सायन्स ही पदवी घेतली आहे. त्याच्यासोबत कृषीची डिग्री घेतलेले सहा तरुण अॅग्रिकल्चर डिप्लोमा तसेच ॲग्रिकल्चर मॅनेजमेंटमधील पदवीधरांनी एकत्र येऊन ही संकल्पना मांडली. त्यांचे कोकण ॲग्रो डॉट कॉम हे संकेतस्थळ एक महिन्यापूर्वी सुरू झाले. तसेच फेसबुक आणि व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून सेंद्रिय आणि नैसर्गिक भाजीपाला तयार करून पुरवठा केला जाईल, अशी नोंदणी सुरू केली. या नोंदणीत जवळपास ६० टक्के पुरुष आणि ३० टक्के महिलांनी सहभाग घेऊन रोजच्या आहारातील टोमॅटो, गावठी कांदा, हिरवी मिरची, आले, ग्रामीण भागातील पालेभाज्या यांची मागणी नोंदविली आहे. कणकवलीत साधारण ४१ टक्के, तर उर्वरित तालुक्‍यांत सरासरी १० टक्के नोंदणी या संकेतस्थळावरून झाली आहे. या पदवीधर तरुणांनी कणकवली तालुक्‍यातील कासरल, वाघेरी, हुंबरट येथे हा नैसर्गिक भाजीपाला तयार करण्याचे प्लॉट निश्‍चित केले आहेत. संकेत स्थळावर ई कॉमर्स स्टोअर्स असून, ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाणार आहे. सद्यःस्थितीत या पदवीधर तरुणांमधील काही जण शेती व्यवसायात आहेत. दुग्धजन्य पदार्थ विक्री आणि शेतीपूरक व्यवसायातही या तरुणांनी काम सुरू केले आहे.  सुशिक्षित तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न  जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा असेल तर शेती आणि शेतीपूरक व्यवसाय उभे केले पाहिजेत. यासाठी प्रत्येक गावातील तरुणांना सहभागी करून घेतले जाईल आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकांच्या मागणीचा पुरवठा तोही घरपोच करण्याचा आमचा संकल्प आहे, असे मत कृषी पदवीधर दिग्विजय राणे याने म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात भाजीपाला आणि नंतर शेतीपूरक उत्पादने ऑनलाइन पद्धतीने विक्रीचा प्रयत्न राहील. सध्या तर या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिग्विजयचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com