डिजिटल सातबारा आता १५ रुपयांत

८ अ आणि फेरफार उताऱ्याच्या नकलांसाठी शुल्क आकारणीबाबत संभ्रम होता. तो या निर्णयाने दूर झाला आहे. तसेच, या सर्वांसाठीचे शुल्क निश्‍चित झाल्यामुळे नागरिकांची होणारी फसवणूकदेखील थांबेल. - हेमंत नाईकवडी, अध्यक्ष, पुणे जिल्हा तलाठी संघ
डिजिटल सातबारा आता १५ रुपयांत
डिजिटल सातबारा आता १५ रुपयांत

पुणे : डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा ऑनलाइन काढण्यासाठी आता १५ रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, ऑनलाइन सातबारा उतारा पाहण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.   राज्य सरकारकडून ई-फेरफारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत नागरिकांना डिजिटल सातबारा उतारा उपलब्ध करून देण्याचे काम भूमी अभिलेख विभागाकडून सुरू आहे. राज्यात सुमारे अडीच कोटी सातबारा उतारे आहेत. आतापर्यंत सुमारे ५० लाखांहून अधिक सातबारा उताऱ्यांचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. डिजिटायझेशन पूर्ण झालेले आणि त्यावर डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे राज्य सरकारकडून ऑनलाइन माध्यमातून आतापर्यंत मोफत उपलब्ध करून दिले जात होते. सुमारे १४ ते १५ लाख नागरिकांना आतापर्यंत मोफत डिजिटल सातबारा उतारे राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, आता त्यासाठी पंधरा रुपयांचे शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लवकरच याची अंमलबाजवणी सुरू होणार आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून बॅंकांबरोबरच चर्चा सुरू असून, लवकरच करार करण्यात येणार आहे. या बॅंकांच्या माध्यमातून डिजिटल सातबारा उताऱ्यासाठी शुल्क भरण्यासाठीचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातील. पूर्वी तलाठ्यांकडून डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारा काढल्यानंतर त्यासाठी १५ रुपये भरावे लागत होते. ऑनलाइन डिजिटल सातबारा उतारा काढल्यास तो मोफत मिळत होता. आता तलाठ्यांकडून सातबारा काढल्यानंतर १५ रुपयांपैकी दहा रुपये तलाठी आणि पाच रुपये जमाबंदी विभागाला मिळतील. ऑनलाइन डिजिटल सातबारा उतारा काढल्यानंतर १५ रुपयांच्या शुल्कापैकी दहा रुपये शुल्क जमाबंदी विभागाला, तर पाच रुपये राज्य सरकारला मिळतील. राज्यात दररोज सरासरी आठ ते दहा हजार सातबारा, ८ अ, फेरफार यांच्या नकला काढल्या जातात. त्यामुळे या माध्यमातून मोठा निधी जमाबंदी विभागाला मिळणार आहे. त्या निधीतून उर्वरित दोन कोटी सातबारा उताऱ्यांचे डिजिटायझेशन करण्याच्या कामास, तसेच ई-फेरफारच्या कामासाठी आवश्‍यक ती यंत्रणा उभी करण्यास मदत होणार आहे. सर्वच तलाठ्यांना मिळणार १० रुपये यापूर्वी डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा तलाठ्याकडून काढल्यास १५ रुपये शुल्क भरावे लागत होते. स्वखर्चाने लॅपटॉप आणि प्रिंटर घेतला आहे, अशा तलाठ्यांना १५ रुपयांपैकी दहा रुपये मिळत होते. सरकारने लॅपटॉप आणि प्रिंटर उपलब्ध करून दिलेल्या तलाठ्यांना कोणतेही शुल्क मिळत नव्हते. आता सरसकट सर्वच तलाठ्यांना पंधरा रुपयांपैकी दहा रुपये शुल्क मिळेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com