खानदेशात २५ टक्केच पीक कर्जवाटप

खानदेशात २५ टक्केच पीक कर्जवाटप
खानदेशात २५ टक्केच पीक कर्जवाटप

जळगाव : खानदेशात पीक कर्जवाटप २५ टक्केही पूर्ण झाले नसल्याची स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचा लक्ष्यांक सुमारे तीन हजार कोटी आहे. यातून ९०० कोटी कर्जही वितरित झालेले नाही. धुळे-नंदुरबारातही एकूण लक्ष्यांकापैकी ७५० कोटी पीक कर्ज वितरित झाले नसल्याची माहिती मिळाली.

जळगाव जिल्ह्यात जिल्हा बॅंकेला सुमारे १२०० कोटी पीककर्ज वितरित करायचे आहे. या बॅंकेची कामगिरी समाधानकारक आहे. कर्ज वितरण ग्रामीण भागात बऱ्यापैकी सुरू आहे. या बॅंकेला दिलेल्या लक्ष्यांकापैकी सुमारे २५ टक्के पीककर्ज वितरित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

बागायती पीक कर्ज देण्यासही राष्ट्रीयीकृत बॅंका हात आखडता घेत आहेत. यामुळे पीक कर्जवाटपाची गती संथ आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना हवे तेवढे, नियमानुसार देय असलेले पीक कर्ज देत नाहीत. अनेक शाखांमध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीसंबंधीचे दाखले दिलेले नाहीत. कर्जासाठी ग्रामीण भागातील शाखा शेतकऱ्यांना शहरातील मुख्यालयात पाठवित आहेत. काही बॅंका अपघात किंवा इतर विमा योजनेत सहभागासाठी आग्रह धरीत आहेत.

राष्ट्रीयीकृत बॅंका मात्र पीक कर्ज वितरणासंबंधी हात आखडता घेत असून, या बॅंकांना मिळून १७०० कोटी पीक कर्ज वितरित करायचे आहे. पैकी ५५० कोटी पीक कर्जही या बॅंकांनी वितरित केले नसल्याची स्थिती आहे. फक्त १४ टक्के पीक कर्ज वितरण राष्ट्रीयीकृत बॅंकांनी केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सुमारे १४०० कोटी, तर धुळ्यात सुमारे १३०० कोटी रुपये पीक कर्ज वितरण करायचे आहे. यातील धुळे-नंदुरबार जिल्हा बॅंकेला दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे ९०० कोटी पीक कर्ज वितरण करायचे असून, या बॅंकेने पीक कर्जवाटपासंबंधी बऱ्यापैकी कार्यवाही केली आहे. या बॅंकेने आतापर्यंत सुमारे २०० कोटींवर पीक कर्ज वितरित केले आहे. धुळ्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सुमारे २२५ कोटी आणि नंदुरबारात सुमारे २५० कोटी रुपये पीक कर्ज वितरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com