खरीप पीक कर्जवाटपात शेतकऱ्यांची केवळ थट्टाच

खरीप पीक कर्जवाटपात शेतकऱ्यांची केवळ थट्टाच
खरीप पीक कर्जवाटपात शेतकऱ्यांची केवळ थट्टाच

मुंबई ः सप्टेंबर महिना संपला तरी राज्यात खरिपाचे पीक कर्जवाटप विदारक स्थितीत आहे. उद्दिष्टाच्या फक्त ४९ टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला हरताळ फासत राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँकांनी पीककर्जाकडे पाठ फिरवली आहे. दुष्काळी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत खूपच कमी पीककर्जाचे वाटप झाले आहे. दुर्दैव असे, की शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी रेटा लावला म्हणून स्टेट बँकेने यवतमाळ जिल्ह्यातील बँकेची पट्टणबोरी येथील शाखाच बंद केली आहे.  यंदाच्या खरिपात राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने ४३,८७३ कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. आतापर्यंत त्यापैकी फक्त २१,६८६ कोटींचेच कर्जवाटप झाले आहे. उद्दिष्टाच्या फक्त ४९ टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी वारंवार निर्देश देऊनही राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांची पीक कर्जवाटपात उदासीनताच दिसून येते. राष्ट्रीयीकृत बँकांना २४,२५३ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यापैकी फक्त ९,७८७ कोटींचेच पीक कर्जवाटप झाले आहे. 

उद्दिष्टाच्या तुलनेत ४० टक्केच कर्जवाटप झाले आहे. व्यापारी बँकांना दिलेल्या ३,५८७ कोटींपैकी फक्त १,५८४ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे, ते उद्दिष्टाच्या ४१ टक्के भरते. नेहमीप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. जिल्हा बँकांनी उद्दिष्टाच्या ६८ टक्के इतके पीककर्ज वितरित केले आहे.  पीक कर्जवाटपात मराठवाडा आणि अमरावती विभागातील आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील परिस्थिती भयंकर आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना फक्त ३० टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. 

बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचे लाभ मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. बँकांकडूनही पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकारांच्या दारात जावे लागते. नापिकीमुळे या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. गेल्या दहा महिन्यांत राज्यात सुमारे १,९०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सर्वाधिक औरंगाबाद आणि अमरावती विभागांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे, याकडे शेतीतज्ज्ञ लक्ष वेधत आहेत. 

शाखाच केली बंद राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांनी या भागातील कर्जवाटपाकडे संपूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसून येते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी रेटा लावल्याने स्टेट बँकेने पट्टणबोरी येथील शाखाच बंद केली आहे. कोणतेही कारण न देता बँकेने शाखा बंद केल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांनी सुमारे साठ टक्के शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्याची माहिती सहकार खात्यातील उच्चपदस्थांनी दिली.  विभागनिहाय उद्दिष्ट  आणि वाटप (कोटींमध्ये)

विभाग उद्दिष्ट वाटप टक्के
कोकण ९५१ ८१३ ८५
मराठवाडा १२,०९३ ४,२९९ ३६
विदर्भ १२,०६४ ४,९१२ ४१
पश्चिम महाराष्ट्र १८,७६४ ११,६६१ ६२

बँकनिहाय उद्दिष्ट आणि वाटप (कोटींमध्ये) 

बॅंक उद्दिष्ट वाटप टक्के
राष्ट्रीयीकृत बँका २४,२५३ ९,७८७ ४०
व्यापारी बँका ३,५८७ १,५८४ ४१
ग्रामीण बँका २,८३१ १,२९७ ४६
जिल्हा बँका १३,१९२ ९,०२७ ६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com