टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान : कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल

चार जिल्ह्यात अवघे ५० हेक्‍टरचे नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान : कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान : कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल

नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला तरी दुसरा झुंड पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्याकडे सरकत असल्याने धानपट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. सध्या या भागात परिपक्‍व अवस्थेतील उन्हाळी धान आहे. दुसरीकडे चार जिल्ह्यात अवघे ५० हेक्‍टरचे नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टोळधाडीने अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील संत्रा फळबागांवर हल्ला केला. नागपूर, वर्धा, अमरावती या तीन जिल्ह्यात संत्र्यांची नवती तसेच भाजीपाला या किडीकडून फस्त करण्यात आला. रविवार (ता.२४) पासून या किडीचे अस्तित्व विदर्भात आहे. या काळात हजारो हेक्‍टरवरील पिकांचे नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे. काटोल, रामटेक, मौदा, एरोली, सावनेर या नागपूर जिल्ह्यातील गावशिवारात मोठे नुकसान या किडीने केले. परंतु कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात अवघ्या २५ हेक्‍टरवरील पिकाच्या नुकसानीचे म्हटले आहे. अमरावती जिल्ह्यात चिखलदरा तालुक्‍यात आदिवासी शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे २० हेक्‍टरवरील नुकसानीच प्राथमिक अंदाज आहे.

उन्हाळी धान परिपक्‍व अवस्थेत भंडारा जिल्ह्यात वनक्षेत्र अधिक आहे. बुधवारी (ता.२७) मध्यरात्री या किडीने जंगलातील अनेक झाडावर वास्तव्य करीत सागवान व इतर झाडांची पाने फस्त केली. भंडारा जिल्ह्यात २२ हजार ९९१ हेक्‍टरवर उन्हाळी धान असून त्यातील ७५ टक्‍के क्षेत्रावरील धानाची काढणी झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात देखील ४० हजार हेक्‍टरवरील उन्हाळी धानापैकी आता २५ टक्‍केच काढणीचे काम बाकी आहे.

२२०० लीटर कीडनाशकाचा पुरवठा नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा या जिल्ह्यात प्रत्येकी ५०० लीटर तर गोंदिया जिल्ह्यात ७०० लीटर क्‍लोरपायरीफॉस कीडनाशकाचा पुरवठा करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात कीड शिरकाव करेल, अशी भिती असल्याने जिल्ह्याचे प्रवेशव्दार असलेल्या तिरोडा तालुक्‍यात १०० लीटर औषधांचा पुरवठा करीत यंत्रणा अलर्टवर ठेवण्यात आली आहे. टोळधाड पर्यटनाला आली होती काय ? टोळधाडीमुळे संत्रा पिकाचे झालेले संभाव्य नुकसान आताच कळणार नाही, हे यंत्रणांनी समजून घेतले पाहिजे. विदर्भात अवघे ५० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आणि त्यातही संत्र्याचेच नुकसानच झाले नसल्याचा यंत्रणांचा दावा हास्यास्पद आहे. टोळधाडीने नुकसान केले नाही, असे मानले तर मग काय टोळधाड विदर्भात हवापालट आणि पर्यटनासाठीच आली होती काय? कोपरा, पाळ, भिवकुंडी सह अनेक गावातील नुकसान आणि शेतकऱ्यांची यादीच मी तयार केली. परंतु यंत्रणा भरपाईसाठी उदासीन आहे. त्यासोबतच कीड नियंत्रणासाठी तांत्रिक माहिती देणारी अकोला कृषी विद्यापीठाची यंत्रणा कोठेच दिसून आली नाही, हा प्रकार गंभीर आहे. - डॉ. अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री कोट्यवधीच्या संख्येत दोन दिवसात शेतात थांबलेल्या टोळधाडीने नुकसान केले नाही, असे म्हटले तर मग टोळधाड अन्नावाचून जगली कशी ? याचे उत्तर कृषी विभागाने द्यावे. जिल्ह्यात १५० हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील संत्र्याचे नुकसान आहे. नवती खाल्ल्याने वाढ खुंटते. - गिरधर मंत्री,  संत्रा उत्पादक, मोर्शी, अमरावती "टोळधाड नियंत्रणासाठी अग्निशमन दलाची मदत याकामी घेण्यात आली. त्यासोबतच शेतकऱ्यांकडील ट्रॅक्‍टरचलीत यंत्राचा वापर करण्यात आला. याशिवाय ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करता येईल का? याची चाचपणी केली जात आहे. दहा लीटरपेक्षा अधिक द्रावण वहन करण्याची क्षमता असलेले ड्रोनचा शोध याकरिता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र असे करताना मानवी आरोग्यावर परिणाम होणार नाही याबाबतही खबरदारी घ्यावी लागणार आहे. कीड नियंत्रणासाठी क्‍लोरपायरीफॉसचा शेतकऱ्यांना विनामूल्य पुरवठा केला जाईल. टोळधाडीमुळे संत्रा, मोसंबी आणि भाजीपाला उत्पादकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंचनाम्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टोळधाडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूर, अमरावती विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत आढावा घेत उपाययोजनांबाबत दिशानिर्देश दिले जात आहेत. - दादा भुसे,  कृषिमंत्री, महाराष्ट्र 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com