'रब्बी'साठी आत्तापर्यंत 'एवढेच' पीककर्ज वाटप

rabbi sowing
rabbi sowing

पुणे : वाया गेलेला खरीप हंगाम रब्बी पिकांनी भरून काढण्यासाठी राज्यात सर्वत्र शिवारांमध्ये लगबग वाढली आहे. चांगला ओलावा आणि पुरेसे पाणीसाठी असल्याने यंदा रबी पीककर्ज वितरण गेल्या हंगामाच्या तुलनेत किमान तीन ते पाच हजार कोटीने वाढण्याची शक्यता असली, तरी आत्तापर्यंत केवळ ८ टक्केच कर्ज वितरण झाले आहे. 

राज्यस्तरीय बॅंकिंग समितीच्या म्हणण्यानुसार, बॅंकांनी रब्बीसाठी कर्ज वाटण्याची चांगली तयारी केलेली आहे. तथापि, शेतकऱ्यांकडून कर्ज उचलण्यासाठी पुढे येण्याचे प्रमाण गेल्या महिन्यात कमी होते. या महिन्यातील कर्जवाटपाची अंतिम माहिती गोळा झालेली नाही. रब्बीसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नगर जिल्ह्यात दहा हजार शेतकऱ्यांनी ११० कोटींपेक्षा जास्त पीककर्ज उचलले आहे. याशिवाय पुणे भागात ३० हजार शेतकऱ्यांनी २०५ कोटी, औरंगाबाद भागात साडेसात हजार शेतकऱ्यांनी पीककर्जापोटी ९८ कोटी रुपये घेतले आहेत. ‘हिंगोली, कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागांतील रब्बी कर्ज वितरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संथ गतीने सुरू होते. मात्र, पुढील महिन्यात कर्जवाटपाचा वेग पश्चिम महाराष्ट्रात वाढलेला असेल,’ असे सहकारी बॅंकिंग सूत्रांचे म्हणणे आहे. साधारणत: १६ हजार कोटी रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून, मार्चअखेरपर्यंत १५ हजार कोटी वितरणाची अपेक्षा बँकिंग क्षेत्राला आहे. 

सहकार विभागाला मात्र राज्यात यंदा विक्रमी कर्ज वितरण होण्याची आशा आहे. ‘आमच्या अंदाजाप्रमाणे रब्बीचा पेरा गेल्या हंगामाच्या तुलनेत किमान २५ टक्क्यांनी वाढू शकतो. अतिपावसामुळे पाण्याचे भरपूर साठे आणि लागवडी लायक जमिनींमध्ये असलेला ओलावा यामुळे रब्बी पिकांसाठी कधी नव्हे इतकी पोषक स्थिती राज्यात आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात रब्बीचे कर्ज वितरण ७-८ टक्के असले तरी डिसेंबरअखेरीस किमान ५० टक्के वाटप झालेले असेल,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात शेतकरी ५६ ते ५७ लाख हेक्टरच्या आसपास रब्बीचा पेरा करतात. यंदा रबीचा पेरा ७० लाख हेक्टरवर जाणार असून हरभरा क्षेत्रात २० टक्के वाढू शकतो, असे संकेत कृषी विभागाने देखील दिलेला होता. त्यामुळे रब्बीचा पेरा वाढून कर्ज वितरण वाढण्याची बॅंकिंग क्षेत्राच्या अंदाजाला आधार मिळत असल्याचे दिसून येते. 

राज्यातील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंका कर्ज वितरणात यंदाही आघाडीवर आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा बॅंकांमधून शेतकऱ्यांना रब्बी कर्ज मिळू शकेल. व्यापारी बॅंका मात्र ३१ मार्चपर्यंत कर्ज वितरण सुरू ठेवतात. “ सर्वसाधारणपणे एकूण पावसाळ्याच्या अंदाज घेत शेतकऱ्यांकडून दिवाळीनंतर रब्बीसाठी कर्ज उचलण्यास सुरुवात होते. डिसेंबरअखेर गेल्या हंगामात ६० टक्के कर्ज वितरण झाले होते. यंदा देखील ५० ते ६० टक्के कर्जवाटप डिसेंबरअखेर होईल. मात्र, एकूण कर्ज वितरण यंदा जादा राहण्याची दाट शक्यता आहे,” असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

राज्यात अतिपावसाने खरीप पिकांचे झालेले नुकसान, ठप्प असलेली कर्ज वसुली, राज्य सरकार स्थापनेचा सुरू असलेला गोंधळ, कर्जमाफी या सर्व बाबींचा रब्बी कर्जवाटपावर काहीही परिणाम होणार नाही, अशी माहिती बॅंकिंग सूत्रांनी दिली. ‘मुळात खरीप वाया गेल्याने आणि चांगले पाणीसाठी, ओलावा असल्याने शेतकऱ्यांना काहीही करून रब्बीत हंगामाचा फायदा उठवायचा आहे. पारंपरिक रब्बी पिकांचे गावे त्यामुळे विविध पिकांच्या जोरदार तयारीला लागलेली आहेत. त्यामुले गेल्या हंगामापेक्षा किमान ३-४ हजाराने कर्ज वितरण जादा होऊ शकते,’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

रब्बी हंगामाचे आर्थिक नियोजन 

  • १६ हजार कोटी रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट 
  • मार्चअखेरपर्यंत १५ हजार कोटी वितरणाची अपेक्षा 
  • आतापर्यंत झालेले वितरण १२०० कोटी रुपयांच्या पुढे 
  • गेल्या हंगामात रब्बीत १३ हजार कोटींची तरतूद; वितरण मात्र १० हजार कोटींचेच 
  • यवतमाळ, नंदूरबार, औरंगाबाद, पुणे भागांची कर्जवाटपात आघाडी 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com