सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर करू ः मुख्यमंत्री ठाकरे 

‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे,’’ अशा शब्दात चिपळूण शहरातील व्यावसायिक आणि दुकानदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर दिला.
सर्वंकष आढावा घेऊनच  नुकसान भरपाई जाहीर करू ः मुख्यमंत्री ठाकरे  Only with a comprehensive review We will announce compensation: Chief Minister Thackeray
सर्वंकष आढावा घेऊनच  नुकसान भरपाई जाहीर करू ः मुख्यमंत्री ठाकरे  Only with a comprehensive review We will announce compensation: Chief Minister Thackeray

रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे,’’ अशा शब्दात चिपळूण शहरातील व्यावसायिक आणि दुकानदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर दिला. पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतर नुकसान भरपाई जाहीर करू, अशी ग्वाहीही ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी (ता. २५) दुपारी एक वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. या वेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही व्यापारी आणि स्थानिकांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री येणार म्हणून, या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. तत्पूर्वी बाधितांसह पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.  ठाकरे म्हणाले, ‘‘तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली आहे. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचे बघू, ते आमच्यावर सोडा,’’ या वेळी अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. 

आज पश्‍चिम महाराष्ट्रात  त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, ‘‘चिपळूणच्या पूरग्रस्त भागाची मी आज पाहणी केली आहे, नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून बोललो आहे. शनिवारी मी रायगड जिल्ह्यातील तळीये गावामध्ये देखील जाऊन आलो, आपत्तीची अंगावर काटा येईल, अशी दृश्ये आहेत. उद्या मी पश्चिम महाराष्ट्राचाही आढावा घेणार आहे, तेथे देखील पुराचे मोठे संकट आहे. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, तसेच केंद्राकडून देखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल. मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचना देखील मी प्रशासनाला केल्या आहेत.’’ 

केंद्राकडून चांगली मदत  केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे. माझे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणे झाले आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहेत. येथील नागरिकांना पाऊस, पूर, पाणी नवीन नाही. परंतु या वेळेला जे झाले ते अकल्पित होते आणि पाणी झपाट्याने वाढल्यामुळे त्यांना आपले सामान आणि वस्तू देखील वाचवता आल्या नाहीत. यापुढे अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत. दोन चार दिवसांमध्ये राज्यातील पूर परिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल. मात्र आता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषधे, कपडे व इतर आवश्यक त्या गोष्टी पूरग्रस्तांना तत्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. वारंवार संकटे येत आहेत, हे लक्षात घेऊन या सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच, पण ते अधिक सक्षम करू, असेही ठाकरे म्हणाले. 

नुकसानग्रस्त महिलने फोडला टाहो  मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला खूप रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेले होते, सर्वकाही गेले. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असे ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेशी बोलत तिला मदत करण्याची ग्वाही दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com