‘सरकारनं मदत केली तरच... नाहीतर अवघड हाय’

‘सरकारनं मदत केली तरच... नाहीतर अवघड हाय’
‘सरकारनं मदत केली तरच... नाहीतर अवघड हाय’

सातारा ः ‘खरिपात दीड एकरात आठ हजार खर्च करून पाऊस न झाल्यानं आठ पायल्या बाजरी झाली, पाऊस पडंल या आशेवर शाळू केला. पण पाऊस झाला नसल्यानं ज्वारी जळू लागली हाय, जितराबांची अवस्था वाईट हाय, आताच चारा विकत घेत परत ते बी होणार नाही. सरकारनं मदत नाय केली जनावरं विकावी लागणार आणि आमाला घर सोडाव लागणार’ अशी व्यथा शेनवडी (ता. माण) येथील हरी शंकर खिलारे यांनी दुष्काळाची पाहणी करायला आलेल्या केंद्राच्या पथकासमोर मांडली.

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा माण तालुका सोसत आहे. या तालुक्यातील शेनवडी येथे गुरुवारी (ता. ६) दुपारी तीनच्या सुमारास भेट दिली. या वेळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषेदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. कैलास शिंदे, उपजिल्हाधिकारी संजय पाटील, प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डाॅ. विनोद पवार तसेच या परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

केंद्रीय पथक सांगलीहून दुपारी तीनच्या सुमारास शेनवडी येथे दाखल झाले. त्यांनी हरी खिलारे यांच्या शेतातील शाळू (रब्बी ज्वारी) पाहणी केली. या वेळी सुनील बोरकर यांनी पथकातील अधिकाऱ्यांना माण तालुक्यात पाऊस, पिकांची अवस्था, मिळालेले उत्पादन, जमिनीतील पाणीपातळी या विषयी माहिती दिली. बाजरी किती होती, किती उत्पादन झाले त्याला किती खर्च आला आदी प्रश्न पथकातील अधिकाऱ्यांनी विचारले.

या वेळी श्री. खिलारे यांनी व्यथा मांडली. ते म्हणाले, ‘‘खरीप गेला आता रब्बी पण जायच्या मार्गावर हाय, पाण्यासाठी टँकर अवलंबून आहे. माझ्याकडे पाच मोठी जितारंब आणि पाच शेळ्या मेंढ्या आहे. त्यांना कसे जगवायचे आमी कसं, जगायचं हा प्रश्न आहे. शासनानं मदत केली तरच नाहीतर जनावरं सोडून देऊन कामधंद्यासाठी गावं सोडावी लागतील. एकूणच माण तालुक्यातील टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पोटासाठी अनेकांनी गाव सोडले आहे. शेनवडी येथील ६० जण ऊसतोडणीसाठी गेले आहेत. जनावरे जगवण्यासाठी स्थलांतर सुरू आहे. आमची परिस्थिती वाईट हाय, गावच्या वरच्या बाजून अर्धा किलोमीटर टेंभूचा कालवा गेलाय, तरीबी आम्हाला पाणी मिळत नसल्याचे शेनवडी ग्रामस्थ सांगत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com