संकेश्‍वरी मिरचीचा ‘ठसका’ यंदा गायब

यंदा गडहिंग्लज तालुक्‍यात मिरचीचे क्षेत्र सुमारे शंभर हेक्‍टर इतके होते. पण, पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. - पोपट पाटील, तालुका कृषी अधिकारी गडहिंग्लज
ऑक्‍टोंबरच्या पावसाने मिरची प्लॉटमध्ये असे पाणी साचले
ऑक्‍टोंबरच्या पावसाने मिरची प्लॉटमध्ये असे पाणी साचले

कोल्हापूर : गेल्या महिन्यातील अतिवृष्टीने यंदा चवीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गडहिंग्लजच्या जवारी (संकेश्‍वरी) मिरचीचा ठसकाच गायब झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ पंचवीस टक्केच मिरची गडहिंग्लजच्या बाजारपेठेत येत आहे. यंदा या मिरचीची चणचण भासण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारणच कोसळले आहे. जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्‍याबरोबर कर्नाटक सीमाभागातील काही गावांत जवारी संकेश्‍वरी या स्थानिक जातीच्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. गडहिंग्लजच्या अनेक भागांत ऊस, भाताबरोबरच जवारी मिरची घेतली जाते. पारंपरिक पद्धतीने बियाणे वापरून हे पीक घेतले जात असल्याने खाण्याला चवदार व तिखटाला ठसकेदार असते. यामुळे ही मिरची राज्यात प्रसिद्ध आहे. साधारणत: जुलै-ऑगस्टच्या दरम्यान या मिरचीची लागवड होते. मिरचीला चांगली मागणी असल्याने याचे दर इतर मिरचीपेक्षा नेहमीच चढे असतात. वजनाला हलकी असली तरी लांब असल्याने मिरचीची आकर्षकता जास्त असते. यामुळे याचे दर इतर मिरच्यापेक्षा दुपटी तिपटीपर्यंत असतात.  गडहिंग्लज भागातील शेतकरी उसाबरोबर पाच दहा गुंठ्यापासून ते एक एकरापर्यंत मिरची लागवड करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जे अल्पभूधारक आहेत. त्यांनाही मिरचीतून चांगली रक्कम मिळते. या मिरचीची हेक्‍टरी उत्पादकता २० क्विंटल इतकी आहे. या भागातील जमीन निचरा होणारी असल्याने मिरचीला पोषक आहे. यंदा मात्र उत्पादकांचे पूर्ण गणितच बिघडून गेले. लागवडीवेळी पाऊस नव्हता. परंतु, ऑगस्टनंतर झालेल्या जोरदार पावसाने मिरची उत्पादकांचे गणित बिघडून गेले. 

पावसाने गणित बिघडले मिरची परिपक्व झाली त्या वेळी पाऊस सुरू झाल्याने मिरचीच्या प्लॉटमधून पाणी बाहेर काढणेच अशक्‍य झाले. सातत्याने पाणी साचून राहिल्याने प्लॉटच्या प्लॉट खराब झाले. यामुळे यंदा मिरची उत्पादकांचे पन्नास टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. अनेकांनी हजारो रुपये खर्च करून मिरची वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नसल्याने उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. प्रतिक्रिया... मी पंधरा गुंठे मिरची केली होती. जोरदार पावसामुळे यंदा शेतात पाणी साचले. आळवणी, फवारणीसाठी यासाठी तब्बल दहा हजार रुपये खर्च केला. पण आवश्‍यक तितके उत्पादन झाले नाही. उत्पादनच नसल्याने दर चांगला असूनही यंदा मिरचीतून नफा मिळणे दुरापास्त झाले आहे. - मारुती हुली,  निलजी, ता. गडहिंलज, जि. कोल्हापूर 

मिरचीला पावसाचे पाणी जादा होऊन चालत नाही. जादा पावसामुळे मिरचीची रोपे तर खराब झालीच परंतु, त्याची प्रतही बिघडल्याने यंदा दर्जेदार मिरचीचे उत्पादन करण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. पाणी साचून रोपेच खराब झाल्याने शेतकऱ्यांना काहीच करता आले नाही.  - उत्तम कदम,  कृषी विद्यावेत्ता, कृषी संशोधन केंद्र गडहिंग्लज  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com