ऊसतोड सुरू झाल्याने चाराटंचाईचा प्रश्न सुटला

ऊसतोड सुरू झाल्याने चाराटंचाईचा प्रश्न सुटला
ऊसतोड सुरू झाल्याने चाराटंचाईचा प्रश्न सुटला

पुणे ः एक ते दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांना काही प्रमाणात चाराटंचाईचा प्रश्न भेडसावत होता. मात्र, गळीत हंगामात सहकारी, खासगी साखर कारखाने सुरू झाले आहे. ऊस तोडीमुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जनावरांसाठी लागणारा हिरवा म्हणून वाडे उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चाराटंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी खरिपात शेतकऱ्यांनी ३२ हजार ३८३ हेक्टरवर चारा पिकांची पेरणी केली होती. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसामुळे चारा पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले होते. त्यामुळे चाराटंचाई भेडसावण्यास सुरुवात झाली होती. जनावरासाठी चाऱ्याचा मोठा प्रश्न उपस्थित राहू लागला होता. त्यातच काही प्रमाणात हिरवा चाराही महाग झाल्याने तो मिळेनासा झाला होता. त्यामुळे दूध उत्पादकांना चारा उपलब्ध होण्यासाठी अडचणी येत होत्या. अनेक शेतकरी साखर कारखाने सुरू होण्याचे वाटप होते. गेल्या एक महिन्यांपासून कारखाने सुरू झाल्यामुळे चाऱ्यासाठी वाड्यांचा पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी निवडला आहे.  

जिल्ह्यात सुमारे १७ साखर कारखाने आहेत. त्यापैकी जवळपास १४ ते १५ साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेक ऊसतोड मजूर ऊस तोडून कारखान्यांना देतात. त्यातून चांगले पैसे मिळत असले तरी उसाचे वाडे ते शेतकऱ्यांना, दुग्धव्यवसाय करणाऱ्यांना विकतात. सध्या प्रती शेकडा २०० ते ३०० रुपये एवढा दराने ऊसतोड मजूर वाड्याची विक्री करत आहेत. 

रब्बीत शेतकऱ्यांनी १७ हजार ५९ हेक्टरवर चारा पिकांची पेरणी केली आहे. यामध्ये मका, कडवळ, लुसर्नग्रास, नेपिअरग्रास, बाजरी अशा विविध चारा पिकांचा समावेश आहे. लागवडीनंतर दोन ते तीन महिन्यांनंतर चाऱ्यांचे उत्पादन होते. त्यामुळे चाराटंचाई कमी होण्यास मदत झाली असली तरी रब्बीत पेरणी केलेल्या चारा पिकांच्या लागवडीतूनही मोठे उत्पादन होणार आहे. पुणे जिल्ह्यातही हवेली, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर चारा पिकांची लागवड झाली आहे. मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, पुरंदर तालुक्यांत बोटावर मोजण्याएवढ्या क्षेत्रावर लागवड झाली आहे.

रब्बी हंगामात पीकनिहाय चारा लागवड (हेक्टरमध्ये) 
पीक झालेली लागवड
मका ३१०२
कडवळ २२९३
बाजरी  ३१२
लुसर्नग्रास १२०
नेपिअर १११
इतर चारा पिके ११,१२१

पावसामुळे चारा पिकांचे नुकसान झाल्याने चाराटंचाई भेडसावण्यास सुरुवात झाली होती. मात्र, आता साखर कारखाने सुरू झाल्याने जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून वाड्याचा उपयोग करू लागलो आहे.  - तानाजी शिंगाडे, शेतकरी, कडबणवाडी, ता. इंदापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com