टोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधी

येत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी, सामुदायिक तत्त्वावरील टोमॅटो प्रक्रिया होणे गरजेचे आहे. आजही टोमॅटो साठवणूक आणि प्रक्रियेमध्ये सुधारणेला चांगला वाव आहे.
 opportunities in the  exports and processing industry of Tomato
opportunities in the exports and processing industry of Tomato

येत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी, सामुदायिक तत्त्वावरील टोमॅटो प्रक्रिया होणे गरजेचे आहे. आजही टोमॅटो साठवणूक आणि प्रक्रियेमध्ये सुधारणेला चांगला वाव आहे. दराच्या बाबतीत कांद्याइतकेच बेभरवशाचे पीक म्हणून टोमॅटोचा क्रमांक लागतो. टोमॅटोच्या देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ४.८५ टक्के आहे. नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नागपूर हे राज्यातील प्रमुख टोमॅटो उत्पादक जिल्हे आहेत. राज्यांतर्गत उत्पादनाच्या ३० टक्के उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. पुणे, सातारा परिसरातील टोमॅटो काढणी मे, जून, जुलै या महिन्यात केली जाते. या टोमॅटोची स्थानिक बाजारातच चढ्या दराने विक्री होते. प्रक्रिया उद्योजक या हंगामातील टोमॅटो खरेदी करत नाहीत. नाशिक परिसरामध्ये टोमॅटोची काढणी ऑगस्टनंतर केली जाते. बाजारात या काळात दर कमी मिळतो. हा टोमॅटो प्रक्रिया उद्योगांना किफायतशीर दरामध्ये मिळतो. भारतातून सन २०१८-१९ मध्ये अरब अमिराती, कतार, ओमान, पाकिस्तान, बांगलादेशामध्ये झालेल्या टोमॅटो निर्यातीमधून २६१.७९ कोटी रुपये मिळाले. आजही वाहतूक, शीतकक्ष, साठवणुकीच्या असुविधांमुळे शेतकरी दूर अंतरावरील बाजारपेठांचा फायदा घेऊ शकत नाही. पायाभूत सुविधा उपलब्धता आणि गरज  आपल्याकडे टोमॅटो पिकासाठी कोणतीही विशिष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध नाही. बाजार समित्यांद्वारे खरेदी विक्री, लिलाव सुविधा व्यापारी, शेतकऱ्यांना पुरविल्या जातात. प्रक्रिया उद्योग खासगी उद्योजकांचे आहेत. येत्या काळात उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी, सामुदायिक तत्त्वावरील टोमॅटो प्रक्रिया होणे गरजेचे आहे. आजही टोमॅटो साठवणूक आणि प्रक्रियेमध्ये सुधारणेला चांगला वाव आहे. शीतकक्ष आणि साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध झाल्यास टोमॅटोचा साठवण कालावधी एक महिन्याने वाढविता येऊ शकतो. शेतीमाल तारण पावती आणि शेतमाल तारण कर्ज या संकल्पना अजूनही टोमॅटो उत्पादकांमध्ये रुजलेल्या नाहीत. या सुविधांमुळे अतिरिक्त वित्तपुरवठा शेतकऱ्याला होऊ शकतो. टोमॅटो उत्पादकाला वित्त सहाय्याची मोठी समस्या कायम भेडसावत आली आहे, कारण लागवड मशागत खर्च मोठा आहे. उत्पादकांसमोरील आव्हाने  महाराष्ट्रात २०१५-१६ मधील आकडेवारीनुसार टोमॅटोची सरासरी उत्पादकता प्रति हेक्टरी २२ टन एवढी आहे. नाशिक परिसरातील उत्पादकता २५ टन आहे. दर हेक्टरी उत्पादकता वाढविण्याच्यादृष्टीने सखोल संशोधनाची गरज आहे. टोमॅटो लागवडीमध्ये दर्जेदार बियाणाची उपलब्धता ही एक प्रमुख समस्या आहे. माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, पीक संरक्षण,आच्छादन, सेंद्रिय निविष्ठांचा वापर तसेच सुधारित लागवड तंत्राचा अवलंब करण्यात उत्पादक अजून मागे आहेत. बाजार माहिती सेवांची गरज

  • टोमॅटो विक्रीसाठी शेतकरी विविध पारंपारिक माध्यमांचा वापर करतो. विक्रीमध्ये अनेक मध्यस्थांची साखळी अस्तित्वात आहे. बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोची उलाढाल होते. परंतु या सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे, तसेच अनेक छुपे खर्च देखील शेतकऱ्यांच्या माथी मारले जातात. शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही.
  • मागणी-पुरवठ्याच्या असमतोलामुळे मोठ्या प्रमाणावर चढउतार होतात. हे चित्र दुर्दैवाने देशातील सर्वच मोठ्या बाजारपेठांमध्ये दिसून येते. बाजापेठेतील दर दलालाकडून ठरविले जातात.
  • दूर अंतरावरील बाजारपेठेत ताजा टोमॅटो पाठविताना वाहतूक, साठवणुकीत सुमारे २० ते २२ टक्के टोमॅटो खराब होतो. पुरवठा साखळी देखील मोठी असते. याउलट टोमॅटो प्रक्रिया करून वाहतूक केल्यास पुरवठा साखळी कमी राहते. मालाची नासाडी ही पाच टक्‍क्‍यांपर्यंत सीमित राहाते.
  • संशोधन आणि विकास क्षेत्र  अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवीन तंत्रे विकसित केली आहेत. सरासरी उत्पादकतेपेक्षा जास्त उत्पादन घेण्यात अनेक शेतकरी यशस्वी झाले आहेत. शेतकऱ्यांनी स्वतःच्या आवश्यकतेनुसार विकसित केलेल्या या तंत्रांचा अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करण्याची गरज आहे. याचबरोबरीने संशोधनाची गरज आहे. साधारणपणे हेक्टरी ९५ टन इतकी उत्पादनक्षमता असणारा अर्का रक्षक ही सुधारित जात भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्थेने विकसित केली आहे. शेतकऱ्यांनी विकसित केलेले लागवड तंत्र आणि कृषी विद्यापिठातील संशोधन यांचा समन्वय साधून ही तंत्रे स्थानिक गरजेनुसार शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. प्रक्रिया उद्योगातील संधी

  • टोमॅटो प्रक्रिया उद्योगामध्ये ज्या जातींना मागणी आहे, या जातींचे उत्पादन फार कमी शेतकरी घेतात. परिणामी प्रक्रियेसाठीच्या मानकानुसार गुणवत्तापूर्ण टोमॅटोचा पुरेसा पुरवठा होत नाही ही मुख्य समस्या आहे. टोमॅटो उत्पादनामध्ये मजुरांची समस्या आणि सिंचनाच्या समस्यादेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
  • टोमॅटो विपणनामध्ये कोणतीही मोठी उत्पादक कंपनी सध्या कार्यरत नाही. काही मोजक्या कंपन्या प्रक्रिया उद्योगांना टोमॅटो पुरवठा करतात. त्यांना चांगला दर मिळतो. प्रक्रियेसाठी टोमॅटो पुरवठा करण्यात आणखी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे येण्याची गरज आहे. या क्षेत्रात सक्षमपणे उतरण्यासाठी पुरेसे खेळते भांडवल, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, प्रशिक्षित कुशल कर्मचाऱ्यांची गरज आहे.
  • संपर्क- विजयकुमार चोले, ९४२०४९६२६०,  (उपाध्यक्ष, सातारा मेगा फूड पार्क)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com