agriculture news in marathi opportunities in mushroom production | Agrowon

अळिंबी उत्पादनात मोठी संधी

डॉ. अनिल गायकवाड 
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक पूरक उद्योग आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा चांगला अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध होईल.
 

अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक पूरक उद्योग आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा चांगला अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध होईल.

मशरूम ...सर्व जगभर नावलौकिक असलेली आरोग्यदायी बुरशी. आपल्याकडे यास अळिंबी  म्हणतात. गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये अळिंबी खाण्याचे प्रमाण वाढले आहे. केंद्र सरकारने अलीकडे शालेय पोषण आहारांतर्गत मध्यान्य भोजनामध्ये अळिंबीचा सामावेश केला. त्यामुळे अळिंबीची मागणी वाढणार आहे. शेतकरी, छोटे-मोठे उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार तरुण, महिला बचत गटांना अळिंबी उत्पादनातून आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी आहे. यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत आहे. 

भारतामध्ये गरजेच्या तुलनेने अळिंबीचे उत्पादन फारच कमी आहे. सध्या लोकांमध्ये आजारांविषयी तसेच अळिंबीच्या औषधी गुणधर्मांविषयी बरीच जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आजारांना दूर ठेवण्यासाठी अळिंबी व त्यापासून तयार केलेले पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अजूनही या क्षेत्रात फारशी स्पर्धा नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कमी भांडवली व्यवसाय. घरातील कोणतीही व्यक्ती हा व्यवसाय सुरू करू शकते. एकदा प्रशिक्षण घेतल्यावर तज्ज्ञ माणसाची गरज भासत नाही. 

अळिंबीचे उत्पादन म्हणजे प्रदूषणविरहित व्यवसाय. माल विकला नाही तर दुय्यम पदार्थ करून विक्री करता येते. शेतातील टाकाऊ पदार्थ हेच भांडवल आहे. स्वतः: बरोबरच इतरांसाठी सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे हे क्षेत्र आहे.अळिंबी लागवडीसाठी बँका, केंद्र तसेच राज्य शासनाकडूनही अनुदान प्राप्त होते. त्यामुळे व्यावसायिक किंवा पारंपरिक शेती करणारे शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, कृषी तसेच इतर पदवीधरांना यामध्ये संधी आहे. 

ओळख अळिंबीची 

 • अळिंबी म्हणजे अगॅरिकस प्रवर्गातील हरितद्रव्य विरहित, आहारात अन्न म्हणून उपयोगी बुरशी.
 • बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात. या फळांस अळिंबी किंवा भूछत्र म्हणतात. इंग्रजीत अळिंबीस मशरूम या नावाने ओळखले जाते. 
 • मराठीत अळिंबीस कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी, सात्या, डुंबरसात्या, केकोळ्या, अळिंबी, कावळ्याची छत्री अशा अनेक नावांनी ओळखले जाते. 
 • विषारी अळिंबीस ‘टोडस्टूल’ या नावाने ओळखले जाते. 

काही समज- गैरसमज 

 • अळिंबीबाबत अनेक समज, गैरसमज प्रचलित आहेत. उदा.कुत्र्याची छत्री.  हा मोठा गैरसमज आहे. आपल्याकडे बहुतेक लोक अळिंबीला कुत्र्याची छत्री म्हणूनच संबोधतात. कुत्रा ज्या ठिकाणी लघवी करतो, तेथे अळिंबी येते, असा एक गैरसमज आहे. खरे तर ज्या ठिकाणी अळिंबीस अन्न (उदा. सेंद्रिय पदार्थ) मिळते त्या ठिकाणी ती वाढते. पावसाळ्याच्या दिवसात जमिनीवर कुजलेला पालापाचोळा तसेच खतांच्या ढिगावर वेगवेगळ्या रंगांची व आकारांची भूछत्रे आपण पाहतो. त्याचप्रमाणे विविध झाडांच्या खोडांवर व फांद्यांवर उंच ठिकाणी अनेक प्रकाराच्या अळिंबी वाढलेल्या दिसतात. त्यामुळे अळिंबी आणि कुत्रा यांचा दुरान्वयानेही काही संबंध नाही. 
 • दुसरा गैरसमज म्हणजे अळिंबी ही मांसाहारी भाजी आहे. अळिंबी एक बुरशी आहे, ती शुद्ध शाकाहारी भाजी आहे. अळिंबीच्या भाजीचा स्वाद, म्हणजेच चव ही इतर भाज्यांपेक्षा वेगळी असते. भाजी शिजवताना येणारा वास हा मटणासारखा असतो. त्यामुळे काही लोक त्यास मांसाहारी भाजी समजतात. वास्तविक अळिंबी ही पूर्ण शाकाहारी भाजी आहे.
 • अळिंबी विषारी असते, हा समज थोड्या फार प्रमाणात बरोबर असला, तरी बऱ्याच अळिंबी खाण्यायोग्य आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असणारी अळिंबी पूर्णपणे सुरक्षित आहे. पावसाळ्यात जंगलामध्ये येणाऱ्या बऱ्याच अळिंबी खाण्यायोग्य तसेच अतिशय चविष्ट असतात. त्याची योग्य ती माहिती असल्यास खाण्यास काही हरकत नाही. 

आहारासाठी फायदेशीर  
व्यावसायिक उत्पादकांनी पिकवलेली अळिंबी ही बाजारपेठेत उपलब्ध असते.  ही अळिंबी खाण्यायोग्य असते, त्यामुळे अशी अळिंबी ग्राहकाने आवर्जून खरेदी करून तिचा आहारात वापर करावा. काही आदिवासी त्यांच्या अनुभवावरून खाण्यायोग्य अळिंबी शोधून खातात. त्याची विक्रीही करतात. काही भूछत्रे भूमिगत असल्यामुळे प्रशिक्षित कुत्र्याच्या मदतीने अशी भूछत्रे शोधून काढतात. जगभरात अळिंबीच्या वीस हजारांपेक्षा जास्त जाती आहेत. अळिंबीची प्रामुख्याने चीन, इटली, अमेरिका, नेदरलॅंड, पोलंड, स्पेन, फ्रान्स, कॅनडा, इंग्लंड, आयर्लंड, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, कोरिया, भारत इत्यादी देशात लागवड केली जाते. सर्वांत जास्त अळिंबी चीनमध्ये खाल्ली जाते.

व्यावसायिक संधी  

 • अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक पूरक उद्योग आहे. अदयावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा चांगला अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध होईल. 
 • इंग्लंड, नेदरलॅंड, अमेरिका, स्विझर्लंड, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन व इतर काही देशांमध्ये अळिंबीची निर्यात केली जाते. त्याला दरही चांगला मिळतो. 
 • घाऊक बाजारात आपल्याकडे बटण आणि दुधी अळिंबी १०० ते १३० रुपये प्रति किलो तसेच धिंगरी अळिंबी १५० ते २५० रुपये प्रति किलो या प्रमाणे विकली जाते. ऋतुमानाप्रमाणे यात कमी जास्त फरक पडतो. साधारणपणे उन्हाळ्यात जास्त दर मिळतो. 
 • ताज्या अळिंबीची विक्री न झाल्यास ती (बटण सोडून) वाळवून विकता येते. त्याची विक्री करणे अधिक सोपे आहे. वाळविलेली अळिंबी सीलबंद पॅकिंगमध्ये ठेवल्यास ती वर्षभर सहज टिकते. त्यास प्रतवारीनुसार सरासरी  ८०० ते १२०० रुपये प्रति किलो दर मिळतो. 
 • आपल्या देशात अळिंबीस मुंबई, बंगलूरू, पुणे, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, गोवा, चंदीगड इत्यादी ठिकाणी चांगली मागणी आहे.

आरोग्यदायी फायदे  

 • मधुमेह, कर्करोग, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी अळिंबी हे चांगले अन्न.
 • यापासून कमी कॅलरी,प्रथिने, खनिज पदार्थ, जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर मिळतात. 
 • अळिंबीमध्ये ‘अॅन्टी व्हायरस’ व ‘अॅन्टी कॅन्सर’चे विशेष गुणधर्म आहेत. 
 • अळिंबीचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते. त्यामुळे सद्यपरिस्थितीत अळिंबी हे उत्कृष्ट अन्न आहे. 

संपर्क ः डॉ.अनिल गायकवाड,९४२०४९८८११  
(लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत)


इतर कृषिपूरक
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर...मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग...
मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधीमत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची...जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  ...
शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रेशेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय...
जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजनासंकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले...
वासरांच्या आहारात काफ स्टार्टरचा वापरपशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम...
शेळी व्यवस्थापनाच्या पद्धतीशेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त...
कांदळवन संवर्धनातून रोजगारनिर्मितीकांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून,...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे....
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची...जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची...
गोचीडनाशकांबाबत प्रतिकारक्षमता...गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता...
फायदेशीर गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानगर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी...