डॉलर वधारल्याने कापसात निर्यात संधी

- डॉलरने गाठली १४ महिन्यांमध्ये उच्चांकी पातळी - आयात थांबल्याने कापूस दरांवरील दबाव काहीसा दूर - आतापर्यंत ५८ लाख कापसांच्या गाठींची निर्यात - सरकीचे दर सटोडियांमुळे नीचांकी पातळीवर - सरकीच्या व्यवहारांच्या चौकशीची मागणी
डॉलर वधारल्याने कापसात निर्यात संधी
डॉलर वधारल्याने कापसात निर्यात संधी

जळगाव : रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरचे दर ६६ रुपये ७४ पैशांपर्यंत पोचल्याने २९ मिलिमीटर लांबीच्या कापसाच्या गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आयात देशांतर्गत आयातदारांना महागात पडू लागल्याने ती थांबली आहे. सुमारे पाच लाख गाठींचे सौदे यामुळे कोलमडले आहेत. परिणामी देशांतर्गत बाजारात रुईच्या दरांवरील दबाव काहीसा दूर झाला आहे.

दरम्यान, सरकीचे दर चार महिन्यांत ४०० रुपयांनी कमी झाले असून, वायदे बाजारातील सटोडियांनी सरकीच्या दरांबाबत कृत्रिम मंदी तयार केली आहे. या सटोडियांसह सरकीच्या व्यवहारांची चौकशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) करावी, अशी मागणी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने केली आहे.

१४ महिन्यांमध्ये डॉलरचे दर सर्वाधिक उच्चांकी पातळीवर पोचले आहे. यामुळे सुताचे दर किलोमागे १० रुपयांनी, तर रुईचे दरही स्थिरावले आहेत. मागील पंधरवड्यातच डॉलरचे दर ६५ रुपयांवर पोचले होते. तेव्हापासून गाठींची आयात कमी होत गेली. आजघडीला २९ मिलिमीटर लांबीच्या गाठीची आयात कुठल्याही स्थितीत परवडत नाही. डॉलर वधारल्याने अमेरिका, तुर्की किंवा ऑस्ट्रेलियाची खंडी (३५६ किलो रुई) भारतीय आयातदारांना वाहतूक खर्चासह ४८ हजारांत पडत आहे, तर हीच २९ मिलिमीटर लांबीची भारतीय जिनिंगमध्ये निर्मित खंडी देशातील खरेदीदारांना ४१ हजार रुपयांत पडत आहे. मागील महिन्यात भारतीय, अमेरिकी किंवा ऑस्ट्रेलियन २९ मिलिमीटर कापसाच्या गाठीच्या दरांमध्ये सुमारे दोन हजार रुपयांचा फरक होता. देशांतर्गत बाजारात हव्या तशा शुभ्रतेचा (८० टक्के व्हाइटनेस) व कमी ट्रॅशच्या (कचरा) गाठी बोंड अळीमुळे मिळत नसल्याने थोडे पैसे अधिक देऊन भारतीय वस्त्रोद्योगातील मंडळी गाठींची आयात करीत होती. ही आयात मात्र आता थांबली आहे.

रुई किंवा कापसाचे दर स्थिर असून, भारतीय कापसासंबंधीचा न्यूयॉर्क ट्रेड इंडेक्‍स ८४ सेंटवर स्थिर आहे. निर्यात देशातून सुरू असून, बांगलादेश, व्हीएतनाम, पाकिस्तान, चीन व इंडोनेशियामध्ये सुमारे ५८ लाख गाठींची निर्यात झाली आहे. रुपयाचे अवमूूल्यन झाल्याने निर्यातीला आणखी चालना मिळणार आहे; परंतु भारतात उत्पादन न होणाऱ्या ३५ मिलिमीटर लांबीच्या पिमा व गिझा कापसाची किंवा गाठींची आयात अमेरिका, ऑस्ट्रेलिया व तुर्की येथून सुरूच राहील, अशी माहिती मिळाली आहे.

सरकीत कृत्रिम मंदी देशात यंदा एक कोटी आठ लाख मेट्रिक टन सरकीचे उत्पादन अपेक्षित आहे. पाच क्विंटल कापसात तीन क्विंटल सरकी यंदा मिळाली. वायदेबाजारात एक लाख दोन हजार मेट्रिक टन एवढाच सरकीचा साठा असल्याचे दिसत असतानाही सरकीचे दर चार महिन्यांत १८५० रुपयांवरून १४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आणण्याचा प्रकार सटोडियांनी केला आहे. २०-२२ सटोडिये सरकीचे दर पाडण्यात सक्रिय असल्याने रुईच्या बाजारात दरांवर दबाव सतत असतो. याचा केंद्रीय तपास व इतर वित्तीय संस्थांनी शोध घ्यावा. कापसाच्या बाजारात त्यांच्यामुळे यंदा परिणाम झाला असून, त्यांच्या सरकीच्या व्यवहारांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जावी, अशी मागणी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अनिल सोमाणी यांनी ॲग्रोवनशी बोलताना केली.

सरकीचे दर मागील वर्षी ऑक्‍टोबरमध्ये २१०० रुपये प्रतिक्विंटल होते, ते आता १४५० पर्यंत खाली आले. सरकी ढेप १९७० रुपये होती. ती आता १२०० रुपये झाली आहे. यामुळे कापूस उत्पादकांना हवे तसे दर मिळाले नाहीत. वायदेबाजारातील सटोडियांनी कापूस बाजारात मंदी निर्माण केली आहे; परंतु डॉलर वधारल्याने २९ मिलिमीटर लांबीच्या गाठींची आयात थांबली असून, जवळपास पाच लाख गाठींचे सौदे कोलमडले. रुईची बाजारपेठ स्थिरावली आहे. - अनिल सोमाणी, संचालक, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

रुपयाचे अवमूल्यन मागील दोन तीन महिने सुरूच आहे. आजघडीला १४ महिन्यांतील उच्चांकी पातळी डॉलरने गाठली. दर्जेदार सुताचे दर किलोमागे सुमारे १० रुपयांनी वाढले आहेत. कापूस बाजारासंबंधीचा न्यूयॉर्क ट्रेड इंडेक्‍स ८४ सेंटरवर स्थिर आहे. - राजाराम पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, लोणखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com