महसूलमंत्र्यांविरोधात विरोधक आक्रमक

चंद्रकांतदादा पाटील
चंद्रकांतदादा पाटील

मुंबई ः पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय घेऊन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ३४२ कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून गेले दोन दिवस विधानसभेत विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. या मुद्यावर विरोधकांना बोलण्याची संधी न दिल्याने सरकारने लोकशाहीची थट्टा चालवली असल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर सभागृहातील गोंधळामुळे गुरुवारी (ता. २७) विधानसभेचे कामकाज तीनदा तहकूब झाले.  बालेवाडी आणि हवेली तालुक्यातील भूखंडाच्या प्रकरणात महसूलमंत्र्यांनी बिल्डरवर मेहरनजर दाखवत सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केला. या दोन्ही प्रकरणांत महसूलमंत्र्यांवर ठपका आला नाही तर मी विधानसभेत परत येणार नाही, असे आव्हान देत पाटील यांनी चंद्रकांत पाटील हे भूखंडाच्या प्रकरणात दोषी असल्याचे म्हटले. भूखंडाच्या प्रकरणातील पैसा सरकारच्या तिजोरीत न येता तो गेला कुठे? हा खरा प्रश्न असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. महसूलमंत्र्यांच्या आदेशात त्यांनी केलेल्या चुका स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे ते मंत्रिपदावर राहण्यास पात्र नाहीत. मंत्र्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने या प्रकरणांची चौकशी होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही पाटील यांनी केली. पुण्याच्या हवेली तालुक्यातील एका निर्णयातून राज्य सरकारचे ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर पुण्यातीलच बालेवाडी येथील दुसऱ्या प्रकरणात महसूलमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे मैदानाच्या आरक्षित जागेवर ३०० कोटींची इमारत उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल विभागाच्या मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना जयंत पाटील यांनी हा घोटाळा पुराव्यानिशी उघड करत सभागृहात बॉंबगोळा टाकला होता. शिवाय या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागणीदेखील केली. गुरुवारी कामकाज सुरू होण्यापूर्वी याच मुद्यावर विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भ्रष्टाचाराविरोधात फडणवीस सरकारने सत्ता मिळवली. मात्र, भाजपचे १६ मंत्रीच भ्रष्टाचार करायला लागले, तसेच राज्याचा कारभार चुकीच्या सरकारच्या हातात आहे. त्यामुळे अशा घोटाळेबाज सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध केला. चंद्रकांत पाटील यांच्यावरील या आरोपांचे पडसाद सभागृहातही पहायला मिळाले. मंत्री पाटील यांनी यासंदर्भात निवेदन सभागृहासमोर सादर केले. चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले. त्यांच्या निवेदनानंतर विरोधक आक्रमक झाले. या वेळी विरोधकांनी त्यांना नियमांच्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आपण केलेले वक्तव्य पटलावरून काढून टाकण्यात आले होते. असे असताना चंद्रकांत पाटील हे सभागृहात निवेदन कसे करू शकतात, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. तसेच जर ते निवेदन करू शकतात, तर आपण केलेले आरोपही पटलावर घेण्यात यावेत, असेही त्यांनी नमूद केले. यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com