ईव्हीएमविरोधात सर्वपक्षीय एल्गार

विरोधक
विरोधक

मुंबई: ईव्हीएमविरोधात राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितरीत्या एल्गार पुकारला आहे. आगामी निवडणुका ईव्हीएमवर न घेता मतपत्रिकेवरच घ्याव्यात, अशी एकमुख मागणी करीत येत्या २१ ऑगस्टला मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे.  ईव्हीएमवर शंका उपस्थित होत असल्याने आगामी निवडणुका बॅलेटवर घेण्यात याव्यात यासाठी मुंबईत वांद्रे येथे शुक्रवारी (ता. २) विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील अनेक नेते उपस्थित होते.  देशात सध्या निवडणुकांबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून विरोधी पक्षाकडून आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. यात भाजपा-शिवसेनेनेही आंदोलनात यायला पाहिजे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.  राज ठाकरे पुढे म्हणाले की, पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी आम्ही एक फॉर्म काढून ते लोकांकडून भरून घेणार आहोत. निवडणुका बॅलेटपेपर घेण्यात याव्यात अशा मागण्यांचे फॉर्म सर्वपक्षीय कार्यकर्ते लोकांकडून भरून घेतील. २१ तारखेला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अमेरिकेत ईव्हीएम मशिनची चीप बनत असेल तर त्यावर भारतीयांनी विश्वास कसा ठेवायचा? ३७१ मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत घोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी १ लाख मतदान झाले आहे तिथे १ लाख १५ हजार मते दाखविली जात आहेत. राजू शेट्टी असे नेते आहेत ज्यांना लोकं पैसे गोळा करून निवडणुकीसाठी मतदान करतात, मग त्यांना मते मिळू शकत नाही का, असा सवाल करत विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्यास ही शंका दूर होण्यास मदत मिळेल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच मुंबईतील मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल असही त्यांनी स्पष्ट केले.  अजित पवार म्हणाले, की ईव्हीएममुळे शंकेला वाव मिळतो, मतदाराने केलेल्या मतदानाबाबत संशय आहे. आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्यात, ही आमची एकमुखी मागणी आहे. निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात, यासाठी सर्व पक्षीयांनी एक भूमिका घेतली आहे. तर पारदर्शक पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे, २१ तारखेचा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.  या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह, राष्ट्रवादी नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, शिक्षक आमदार कपिल पाटील आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com