पावसामुळे झालेल्या जीवितहानीचे विधानसभेत तीव्र पडसाद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत मुंबई आणि पुणे येथे विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या अपघातांमध्ये सुमारे ३० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. यात सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून, विधानसभेचे कामकाज बाजूला सारून या विषयावर चर्चा करा, असा आग्रह धरत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी स्थगनची सूचना मांडली. त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे मोहंमद आरिफ नसीम खान यांनी सभागृहात राज्यातील धोक्याच्या स्थितीची माहिती देत प्रश्नोत्तराचा तास बाजूला सारून यावर चर्चा सुरू करा, अशी मागणी केली.

लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यामुळे सरकार बेजबाबदारपणे वागत आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी या वेळी सरकारला धारेवर धरले. गेल्या चोवीस तासांत कोंढवा येथे १५, पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटजवळ सहा लोकांचा, कल्याणमध्ये तीन लोकांचा आणि मालाडमध्ये १६ लोकांचा मृत्यू झालेला आहे. बांधकाम व्यावसायिकांचा बेजबाबदारपणा आणि शासकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा या गोष्टीला कारणीभूत आहे. त्यामुळे मुसळधार पावसात रेल्वे बंद पडली आहे, मालगाडी घसरली आहे, याला केवळ पाऊस जबाबदार नाही, यापूर्वी मुंबईत असा पाऊस पडला नव्हता काय? असा सवाल करत श्री. पवार यांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी केली.

नौपाडा येथे धोकादायक इमारती आहेत, अनेक ठिकाणी आणखी अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बेजबाबदार विकसकांना आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना चाप बसणारा संदेश जाणे आवश्यक आहे, म्हणून या वेळी सभागृहात प्रश्नोत्तराचा तास स्थगित करावा आणि या विषयावर चर्चा सुरू करावी, अशी मागणी पवार यांनी केली.

पावसामुळे मुंबई अस्ताव्यस्त झाली आहे, झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे, अनेक वेळा फोन करूनही महापालिकेचे अधिकारी घटनास्थळावर पोचत नाहीत, चांदिवलीत १५ फूट रस्ता खचला आहे, असा मुद्दा काँग्रेसचे मोहंमद आरिफ नसीम खान यांनी उपस्थित केला. जवळपास साठ लोकांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे, महापालिकांच्या अधिकाऱ्यांचा बिल्डरांशी संगनमत करून केलेला करोडो रुपयांचा गैरव्यवहार या गोष्टीला कारणीभूत आहे.

आता मुंबईला लष्कराची मदत घेण्याची आवश्यकता वाटू लागली आहे, असे सांगत वडेट्टीवार यांनी या स्थगनला पाठिंबा दिला. या वेळी सभागृहात सत्ताधारी पक्षांच्या आमदारांचे लक्ष नव्हते, आपापसांतील चर्चेमुळे त्यांच्या भाषणात व्यत्यय येत होता, म्हणून त्यांनी त्यावरही कडक शब्दांत वक्तव्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळी भेट देऊन मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये बैठक घेत आहेत. ते सभागृहात पोचले की यावरील चर्चा सुरू करू, तोपर्यंत कामकाज होऊ द्या, अशी सूचना संसदीय कामकाजमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी केली. मात्र त्यांच्या या सूचनेला विरोध करत विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले, त्यामुळे सभागृहाचे कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com