दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली : धनंजय मुंडे

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली : धनंजय मुंडे
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली : धनंजय मुंडे

मुंबई : दुष्काळाने होरपळलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार, फलोत्पादकांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदतीची मागणी आम्ही अधिवेशनात केली, पण सरकारने दमडीची मदत दिली नाही. दुष्काळग्रस्तांना वीजबिल माफी, शैक्षणिक शुल्कमाफीची आमची मागणी होती. तीही नाकारून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असली आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी (ता.३०) केला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यापूर्वीच सरकारने घाबरुन पळ काढला. सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव होऊ न देता तसेच, अधिवेशनाचा कालावधी आधीच कमी करून सरकारने राज्यासमोरील प्रश्नांपासून पळ काढला आहे, अशी टीकाही मुंडे यांनी केली.  विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर पत्रकारांशी परिषदेत ते म्हणाले, राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाही. दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर करून सरकारने अधिवेशनाची सुरवात करावी, अशी आमची मागणी होती, परंतु सरकार अडून राहिले आणि पहिल्या आठवड्यात कामकाज होऊ शकले नाही. मराठा आरक्षणासंदर्भातला कृती अहवाल सरकारला पहिल्याच आठवड्यात मांडता आला असता; परंतु सरकारने तो लांबवला. मराठा आरक्षणाचा जल्लोष करण्याचा अधिकार सरकारला नसून याचे सत्तारुढ किंवा विरोधी पक्षांचे नाही, तर ते केवळ मराठा समाजाला असल्याचा पुनरुच्चार श्री. मुंडे यांनी केला.  मराठा समाजाने दाखवलेली एकजूट, केलेला संघर्ष, चाळीस मराठा बांधवांच्या बलिदानाला या आरक्षणाचे श्रेय जाते, असे श्री. मुंडे म्हणाले. धनगर बांधवांना आरक्षणाबाबतचा ''टिस''चा अहवाल, त्यावरचा कार्यअहवाल सरकारने मांडला नाही. धनगर आरक्षणासंदर्भातला कोणताही प्रस्ताव अजून केंद्राकडे पाठवला नाही. सरकारने धनगर बांधवांची फसवणूक चालवली आहे. मुस्लिम बांधवांना आरक्षण नाकारुन त्यांच्या विकासाचा मार्ग बंद केला आहे, अशी टीकाही श्री. मुंडे यांनी केली.  जलयुक्त शिवार योजनेत साडे सात हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला, त्याचे त्रयस्थ लेखापरीक्षण करण्याची मागणी आम्ही केली. सरकारने तीही फेटाळली. अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही पुराव्यासह मांडले, परंतु सरकार त्यावरही चिडीचूप आहे. राज्यातले कोतवाल, पोलिस पाटील, बेलदार समाज, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, ओला-उबेरचे चालक, पत्रकार अशा अनेक समाजघटकांनी त्यांच्या मागण्यांसाठी अधिवेशन काळात मोर्चे काढले, आंदोलन केले. या सगळ्या समाजघटकांना मी भेटलो, ते सगळे सरकारवर नाराज असल्याने हीच मंडळी सरकार उलथवून टाकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ या सरकारने स्थापन होण्याआधीच गुंडाळले ही वेदनादायी गोष्ट असून ऊसतोड कामगारांशी केलेली प्रतारणा आहे. त्याचेही परिणाम सरकारला भोगावे लागतील. हे सरकार सत्तेत आले; परंतु चार वर्षांत कुठलाही प्रश्न ते मार्गी लावू शकले नाहीत. सरकारकडे सांगण्यासारखे काही नाही म्हणूच ते अधिवेशनापासून दूर पळत आहेत, असा आरोपही श्री. मुंडे यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com