शेतीप्रश्‍नांवर सरकार अपयशीः विरोधकांची टीका

शेतीप्रश्‍नांवर सरकार अपयशीः विरोधकांची टीका
शेतीप्रश्‍नांवर सरकार अपयशीः विरोधकांची टीका

मुंबई : राज्यात शेती आणि रोजगाराचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भाजपच्या काळातच सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे, जनावरांचे हाल सुरू आहेत. मात्र, दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही. आता मात्र आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून शेतकऱ्यांसाठी घोषणांचे चुनावी जुमले सुरू आहेत, असा आरोप करून शेतकऱ्यांना भीक नको, सरसकट कर्जमाफी द्या, दुष्काळी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी (ता.२४) केली.  आजपासून (ता.२५) सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनात राज्य सरकारला कोणत्या मुद्यांच्या आधारे घेरायचे, याची रणनीती ठरवण्यात आल्याचे समजते.  विखे पाटील यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. त्यानंतर त्याच ठिकाणी विखे आणि मुंडे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.  या वेळी राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेती व रोजगाराचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या आदी मुद्यांवरून या दोन्ही नेत्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. विखे-पाटील म्हणाले, की यंदा राज्यात दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार कोणत्याही उपाययोजना करीत नाही. शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळत नाही. आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी घोषणा करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांना भीक नको, सरसकट कर्जमाफी द्या. सरकारची पीकविमा योजना फसली आहे. राज्यात शेती आणि रोजगाराचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यातही राज्य सरकारला यश आलेले नाही. भाजपच्या काळातच राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या एकाच वर्षात २,७६१ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी.  आताही आगामी निवडणुकांच्या फसव्या जाहीरनाम्यासाठी अधिवेशनाचा सरकारकडून वापर केला जाणार असल्याचा आरोप विखे यांनी केला. फसलेल्या कर्जमाफीबद्दल सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे. मराठा-मुस्लिम आरक्षणातही सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. मराठा आरक्षणावर टांगली तलवार कायम आहे. निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून ७२ हजार पदांच्या मेगाभरतीची घोषणा करण्यात आली. वर्ष झाले, पण अजून भरती झालेली नाही, सरकार फक्त गाजर दाखवण्याचे काम करीत आहे, अशी टीकाही विखे-पाटील यांनी केली. तसेच, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार घालत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  धनंजय मुंडे म्हणाले, की राज्यात तीव्र दुष्काळ आहे. जनावरांच्या चाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, शासनाने छावण्यांचे अधिकार पालकमंत्र्यांना दिले आहेत. राज्य सरकार पक्ष पाहून जनावरांना चारा देणार आहे का, असा सवाल करून हा प्रकार म्हणजे मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा असल्याची टीका त्यांनी केली. आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेच्या मागणीप्रमाणे दोन्ही पक्षांची युती झाली असेल, तर आता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसुद्धा करावी, दुष्काळी शेतकऱ्यांना तातडीने ५० हजारांची मदत द्या, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात तीव्र पाणीटंचाई असताना जलयुक्त शिवार योजनेचे अपयश उघडे पडू नये म्हणून टँकर दिले जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.  कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करणार होता, तो तातडीने निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. युतीसाठी सेनेच्या मागण्या मान्य झाल्या आहेत, हे म्हणजे सेनेची जुमलेबाजी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. एमआयएमचे ओवेसी मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर बोलत नाहीत, सगळे सरकारच्या सोयीने सुरू आहे, पहिल्या दिवशी मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी मागणीही त्यांनी केली. राज्य सरकार असंवेदनशील असल्याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, की राज्यातील दोन जवान शहीद झाले आहेत, आजचे चहापान सरकारनेच टाळायला हवे होते. अंत्यसंस्काराला जाण्याऐवजी उद् घाटन करीत बसले होते, अशी टीका त्यांनी केली. ‘‘राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, राज्य शासनाने आर्थिक श्वेतपत्रिका काढावी, तसेच मुंबई डीपीआरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, राज्य सरकार भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे, सरकारमधील सोळा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांची चौकशी करा, लोकायुक्त आणि न्यायालयाने ठपका ठेवूनही सहकारमंत्री सुभाष देशमुख, अन्न पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवालही मुंडे यांनी केला. अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करणार आहे,’’ धनंजय मुंडे यांनी म्हटले. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, जोगेंद्र कवाडे, जितेंद्र आव्हाड, हेमंत टकले आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com