संत्रा तं गेला अन् घरच्या लक्षमीचं दागिनं बी

संत्रा नुकसान
संत्रा नुकसान

अमरावती ः घरच्या लोकायचे अन् सुनीचे दागीने गवाण ठेवले, पुतण्यानं त बहिणीचं दागीनं गवाण ठेवले अन् दोघा मिळून १२ लाखांची सोय केली. बैल इकून १५ हजार आले. त्या पैशातून पाइप अन् केबल आणला. चार दिवस कसबसं वललं अन् आता मणते धरणात पाणी नाई. ईज तोडली आता संत्रा बी गेला अन् घरच्या लक्षमीच्या आंगावरचं दागीनं बी गेले, जामगावचे शरद गावंडे खिन्न मनाने, हताशपणे सांगत होते.  अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका नागपुरी संत्र्यासाठी प्रसिद्ध. ड्रायझोनमध्ये असलेल्या या भागात मात्र नजीकच्या काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. त्याच तालुक्‍यातील जामगावच्या शरद गावंडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने या वर्षी बाग वाचविण्यासाठी पाण्याची सोय करताना पत्नी, दोन सुनांच्या अंगावरील दागीनं गहाण ठेवले. बाग वाचली त सोन पुढच्या वर्षी करता येईल, असा दिलासा शरद यांनी पत्नी आणि सुनांना दिला. परंतु नियतीने समोर काही वेगळेच वाढून ठेवल्याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यांच्या सव्वाचार एकर शिवारात ५०० संत्रा झाडे आहेत. पुतण्या कमलेश यांच्या शिवारात देखील ५५० झाड आहेत. कमलेशकडे देखील पाचनाला प्रकल्पावरून पाणी आण्यासाठी लागणाऱ्या पैशाची सोय नव्हती. कमलेशने आपल्या घुईखेड येथील विवाहित बहिणीचे दागिने गहाण ठेवले. भावाची अडचण ओळखून बहिणीने देखील त्याच्याकडे आपले स्त्रीधन सोपविले. अशा प्रकारे १२ लाख जुळल्यानंतर प्रकल्पापासून पाइपलाइन टाकायचे काम झाले. वीजजोडणीही मिळाली. शेतापर्यंत पाइपलाइन टाकणे आणि केबलसाठी परत पैशाची अडचण आल्याने शरद गावंडे यांनी २२ हजार रुपयांत बैल विकले. त्यातच देणीदार पैशासाठी तगादा लावू लागल्याने त्यांचे पैसे देण्यासाठी १५ हजारांत गाय देखील विकावी लागली. या साऱ्या प्रयत्नानंतर शेतीला पाणी पोचून चार दिवसच झाले असताना प्रकल्पाचे पाणी कमी झाले म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला अन् सारं होत्याच नव्हतं झालं. आता घरच्या लक्ष्मीचे गहाण कसं सोडवावेत, असा प्रश्‍न शरद गावंडे आगतिकपणे उपस्थित करतात. गेल्या वर्षी निसर्गानं धोका देला अन संत्रा बाग अवघी ७५ हजार रुपयांत इका लागली. 

असा झाला खर्च परिसरातील ७० पाणीवापर संस्थांना सिंचनकामी पाणी उपलब्धतेची परवानगी देण्यात आली होती. खडका, बारगाव, जामगाव, आबा फाटा यासह यावर्षी प्रकल्पात पाणी अधिक असल्याने बेनोडा गावातील शेतकऱ्यांना देखील पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्यासोबतच मागणीनुसार हिवरखेड परिसरातील शेतकऱ्यांसाठी .३३ दलघमी पाणी सोडण्यात आले. काळ्या मातीतील या कालव्याच्या  मायनीगचे आणि पाटसऱ्यांचे काम झालेले नव्हते. कालव्याची दुरुस्ती आणि साफसफाई देखील करण्यात आली नव्हती. त्यामुळे पाणी शेतीपर्यंत पोचण्याआधीच ते जमीनीत मुरले परिणामी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत हे पाणी पोचलेच नाही.  प्रकल्पच नवा  पाचनाला प्रकल्प नव्याने बांधण्यात आला आहे. दोन वर्षांपासूनच या प्रकल्पात पाणी साठत आहे. त्यामुळे कालव्याऐवजी पाइपलाइनद्वारे सर्वांनाच पाणी मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु राजकीय दबावातून हिवरखेड परिसरातील शेतकऱ्यांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आले आणि पाण्याची नासाडी झाली. मार्च महिन्यात पाणी सोडण्यात आले. हा कालवा काळ्या मातीत असल्याने त्यात पाणी अधिक मुरले, असा आरोप शेतकरी करीत आहेत.   वीज कंपनीकडे घेतली धाव वीज वितरण कंपनीने पाचनाला धरणातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात वीज जोडण्या दिल्या होत्या. पाटबंधारे विभागाच्या सहायक अभियंत्यांनी वीज कंपनीला पत्र देत १६ मे पासून वीजपुरवठा खंडित केला. डिसेंबरपासून  २०१८ पासून संत्रा बागायतदारांना सिंचनकामी या प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.  संत्रा बागा जगविण्याचे आव्हान संत्रा रोप लागवडीनंतर पहिला बहार घेण्यासाठी पाच वर्षे लागतात आणि पाण्याअभावी जर ती एका झटक्‍यात वाळत असेल तर शेतकरी पाच वर्ष मागे जातो, असे बारगाव येथील श्रीधर सोलव यांनी सांगितले. आंबीया व मृग असे दोन्ही बहार ते घेतात. यावर्षी आंबीया बहार फुटला; पण वाढत्या तापमानामुळे तो किती टिकेल हे सांगता येत नाही. त्यातच पाणी नसल्याने बहाराऐवजी बाग जगविण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. श्रीधर यांच्या शेतापासून चार किलोमीटर अंतरावर पाचनाला धरण आहे. वीजजोडणी आणि पाइपलाइनवर त्यांचा ९ लाख रुपयांचा खर्च झाला. आता खरी पाण्याची गरज असताना मात्र त्यांना ते मिळत नसल्याने पुढे काय? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यांची साडेदहा एकरावर अडीच हजार झाडे आहेत. एक विहीर आणि एक बोअरवेल असे संरक्षित सिंचन पर्याय त्यांच्याकडे होते. संपूर्ण शिवार त्यांनी ठिबकखाली आणले. पण विहीर कोरडी पडली तर बोअरवेलमधून थोडेफार पाणी मिळते.  मॉन्सूनपर्यंतच होती पाण्याची गरज! वरुड तालुक्‍यातील जामगावचे तुषार यांच्याकडे वीस एकर शेती. यातील १५ एकरावर त्यांची दोन हजार संत्रा झाडे आहेत. पाचनाला प्रकल्पासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांची शेती. मॉन्सूनला अवघा पंधरवाडा उरला असल्याने तेवढ्यापूरतीच पाण्याची गरज होती. परंतु इतर शेतकऱ्यांसोबतच त्यांच्या पंपाचा देखील वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने प्रकल्पापासून शेतापर्यंत पाइपलाइनवर केलेला मोठा खर्च वाया गेल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.  ट्रान्स्फॉर्मरचे भरले पैसे  तुषारच्या माहितीनुसार, प्रकल्प ते शेतापर्यंत पाइपलाइन टाकण्यावर सरासरी पाच ते सहा लाख रुपयांचा खर्च झाला. वीज जोडणीच्या खर्चाचा समावेश यात केल्यास हा खर्च १० लाखांवर जातो. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाइपलाइन आणली त्यालाही पैसे द्यावे लागले. १० ते १५ हजार  रुपये आम्ही याकामासाठी देखील मोजले. वीज कंपनीच्या ट्रान्स्फॉर्मरकरिता पाच लाख रुपयांचा भरण करावा लागला. सात ते आठ शेतकऱ्यांनी एकत्रित येत हे पैसे जमविले. वीजपुरवठा खंडित झाला तर वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वाट न पाहता खासगी कर्मचाऱ्यांमार्फत दुरुस्ती करण्यात आली. पाइपलाइन फुटली तर रात्रीच दुरुस्ती करण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. प्रत्येक टप्प्यातील अडचणीवर सामूहिकरीत्या तर कधी वैयक्‍तिक स्तरावर मात केली आता मात्र लाल फितशाहीच्या चक्रव्यूहातून मात्र सुटका करता आली नाही, अशी खंत तुषार व्यक्‍त करतात.  खासगी कर्जातून टाकली पाइपलाइन अनेक वर्षाच्या उभ्या बागेचे सरपण होत असताना उघड्या डोळ्यांनी ते बघणे शक्‍य नव्हते. म्हणूनच काही शेतकऱ्यांकडे पैसे नसताना त्यांनी खासगी सावकारांकडून मोठ्या व्याजदरावर कर्जाची उचल केली. काही शेतकऱ्यांनी एकत्रित येत पाइपलाइन व वीजपुरवठ्यासाठी होणाऱ्या खर्चाचा भार निम्मा उचलला. हे शेतकरी आलटूनपालटून पाणी देत होते. वीजपुरवठा खंडित होत पाणी उपसा थांबल्याने खासगी कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत हे शेतकरी आहेत.  धरण उशाला कोरड घशाला वरुड तालुक्‍यातील पाचनाला धरणातून पाणी उपसा करण्याकरिता नजीकच्या परिसरातील संत्रा बागायतदारांनी पाणीवापर संस्था स्थापन केल्या. एका संस्थेत सरासरी ११ सदस्यांचा समावेश आहे. या संस्थाकडे  पाणी उपसा करण्याकरिता रीतसर परवानगीदेखील आहेत. ३१ मेपर्यंत परवानग्या असताना ऐनवेळी पाणीपातळी खालावल्याचे कारण देत वीजपंपाचा पुरवठा खंडित करण्यात आला. एका संस्थेकडून जानेवारी ते ३१ मेपर्यंत ३० हजार ते ४० हजार रुपये शुल्क आकारण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com