मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
अॅग्रो विशेष
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवर
नाशवंत शेतमाल उतरविण्यासाठीच्या सुविधांचा तेथील बेनापोल स्थानकावर अभाव असल्यामुळे ही निर्यात अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे.
नागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये रेल्वेने होणारी प्रस्तावित संत्रा निर्यात अडचणीत आली आहे. नाशवंत शेतमाल उतरविण्यासाठीच्या सुविधांचा तेथील बेनापोल स्थानकावर अभाव असल्यामुळे ही निर्यात अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे.
रेल्वेच्या माध्यमातून स्वस्त आणि कमी वेळात शेतमाल वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्याच प्रयत्नामुळे शेतमाल वाहतुकीवरील ५० टक्के अनुदान आता थेट दिले जाणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च देखील निम्म्यावर आला आहे. शेतकऱ्यांनी देखील याला प्रतिसाद देत वीस पार्सल व्हॕनच्या माध्यमातून ४६० टन संत्रा बांगलादेशला निर्यात करण्याचा निर्णय घेतला. तब्बल अकरा वर्षांनंतर अमरावती जिल्ह्याच्या संत्रनगरी वरूड रेल्वेस्थानकावरून ही निर्यात होणार होती.
श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीसह वरुड भागातील अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांचा संत्रा रेल्वेने बांग्लादेशला पाठविण्यात येणार होता. मंगळवार (ता.२०) त्याकरता निश्चित करण्यात आला होता. परंतु वरुड रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेल्या तात्पुरता मालधक्का क्षतीग्रस्त झाला, त्यामुळे मंगळवारी ऐवजी शनिवारी (ता.२५) संत्रा स्पेशलगाडी मार्गस्थ करण्याचे ठरले.
मात्र, बांगलादेशमधील बेनापोल स्थानकावर एकावेळी चारच पार्सल व्हॕन रिकामी करता येतात अशी माहिती समोर आली. एक पार्सल व्हॕन खाली करण्यासाठी साधारणतः तीन तासांचा वेळ लागतो. त्यानुसार विस पार्सल व्हॅनमधील माल उतरविण्यास ६० तास लागतील. रेल्वेच्या नियमानुसार पार्सल व्हॅनमध्ये मारणे आणि उतरविणे याकरिता सात तासांचा कालावधी दिला जातो.
त्यापेक्षा जास्त वेळ लागल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाते. त्यातच संत्रा फळ नाशवंत असल्याने माल चढविणे आणि उतरविणे तसेच ३० तास वाहतूक असा बराच वेळ जातो. परिणामी संत्रा खराब होण्याची भिती आहे. या कारणामुळे संत्र्याची रेल्वेच्या माध्यमातून बांगलादेश पर्यंतची निर्यात अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे.
प्रतिक्रिया
सुरुवातीला मंगळवार (ता.२०) त्यानंतर शनिवारी (ता. २५) बांगलादेशला संत्रा पाठवविण्याचे ठरले होते. परंतु आता तांत्रिक अडचणीमुळे ही निर्यात लांबणीवर पडली आहे. किसान रेल्वेच्या माध्यमातून दर बुधवारी दिल्लीपर्यंत संत्रा नियमित पाठविला जात आहे.
- रमेश जिचकार, कार्यकारी संचालक, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी, वरुड, जि. अमरावती
- 1 of 653
- ››