दुष्काळात होरपळणाऱ्या संत्र्याला दरातही फटका

अमरावती दुष्काळ
अमरावती दुष्काळ

उन्हाची तीव्रता वाढल्याने झाडावर असलेल्या संत्रा फळांचा रंग बदलत आहे. पिकाला पाणी दिल्यास फळे हिरवी राहतात. परिणामी, रंगात आलेली ही फळे परिपक्‍व होत असल्याने लवकरच त्यांच्या विक्रीचा निर्णय घ्यावा लागतो. शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या या अडचणीला व्यापाऱ्यांनी मात्र संधी मानत कमी दराने संत्रा खरेदीचा सपाटा लावल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे वरुड येथील शेतकरी शेषराव घोडेराव यांनी सांगितले.  जलयुक्‍त शिवारमुळे जलस्राेतांचे बळकटीकरण झाल्याचा दावा सरकारकडून होत असतानाच याच दाव्याची पोलखोल करण्याचे काम सरकारच्याच अधिपत्याखालील भूजल सर्व्हेक्षण यंत्रणेनेच केली आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमध्ये पाणी पातळी बारा फूट खाली गेल्याचे हा अहवाल सांगतो. त्या आधारे काही तालुक्‍यांत पाणी उपशावर बंदीची शिफारस करण्याची मागणी जीएसडीएने केल्याने येत्या काळात दुष्काळी जिल्ह्यात परिस्थिती आणखी भयावह होण्याची भीती वर्तविली जात आहे. 

ड्राय झोन म्हणून बोअरवेलला बंदी वरुड तालुक्‍यात १९९८-९९ साली मोठा दुष्काळ पडला होता. भूजल पातळी खालावल्याने त्या वेळी  १३०० फुटापर्यंत बोअरवेल खोदण्यात आले. साऱ्या तालुक्‍याची पाण्यासाठी चाळणी झाली होती. त्यानंतरही पाणी लागेल की नाही याची शाश्‍वती नव्हती. शासनाने याची गांभीर्याने दखल घेत वरुड तालुका ड्राय झोन घोषित करण्यात आला. त्यानंतर या भागात विहीर आणि बोअरवेल दोन्ही घेण्यास बंदी लादण्यात आली आहे. जुन्या बोअरवेल किंवा विहिरीचे नूतनीकरण करण्यासाठी यंत्र आणण्यासदेखील विविध परवानग्यांची गरज भासते. काही शेतकरी या परवानग्यांपासून पळवाट म्हणून अशाप्रकारची यंत्र लपून छपून आणतात आणि आपली पाण्याची गरज भागवितात. याच तालुक्‍याच्या १९९८ किंवा त्यापूर्वी शेतकऱ्यांनी काही बोअरवेल खोदले होते. या बोअरवेलला थोडेबहूत पाणी असल्याने शेषराव घोडेराव यांनी आपल्या शेतापर्यंत त्या बोअरवेलचे पाणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. पाच एकरावरील संत्रा बाग जगविण्यासाठी हे करावेच लागेल, असे ते सांगतात. त्याकरिता भेंबळी ते शेतापर्यंत १४ हजार फूट पाइपलाइन टाकण्यास त्यांनी सुरवात केली आहे. त्यावर सुमारे १३ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. अन्य एका शेतकऱ्याने देखील भेंबळी शिवारातून पाणी आणण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे हा खर्च दोघांमध्ये विभागला जाणार आहे. 

शेतकऱ्यांसोबत करावा लागतो करार १९९८ पूर्वी खोदलेल्या भेंबळी शिवारातील बोअरवेलला काही प्रमाणात पाणी आहे. यातील काही बंद आहेत. संबंधित बोअरवेलच्या मालकाशी पाणी उपशाबाबत बोलणी करून करार केला जातो. बंद बोअरवेलची दुरुस्ती निशुल्क करून देण्याच्या सबबीवर मग पाणी मिळते. 

भेंबळी प्रकल्प ठरला निरुपयोगी भेंबळी प्रकल्प यावर्षी झाला आहे. त्यात एक थेंबही जलसंचय झाला नाही. त्यामुळे हा प्रकल्पदेखील शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी ठरला आहे.

विजेमुळे शेतकरी वैतागले रात्री १ वाजून दहा मिनिटांनी वीजपुरवठा सुरू केला जातो. सकाळी ९ वाजता हा वीजपुरवठा बंद केला जातो. याप्रमाणे चार दिवस शेड्युल ठरवून देण्यात आले आहे. त्यानंतर तीन दिवस दिवसा वीजपुरवठा होतो. सकाळी साडेनऊ ते पाच या वेळात वीजपुरवठा केला जातो.  गुरुवारी किंवा सोमवारी एक दिवस २४ तासांचा ब्रेक  घेतला जातो. देवेंद्र खेरडे यांनी वीज कंपनीच्या भूमिकेविषयी तीव्र संताप व्यक्‍त केला. आम्ही लाखो   रुपये खर्चून काही किलोमीटरवरुन पाणी आणले पण   लाइन नसल्याने पाणी देन बी शक्‍य होत नाई, असे देवेंद्र यांनी सांगितले. `माय जेऊ घालत नाही अन्‌ बाप भीक  मागू देत नाही,` अशी आमची अवस्था सरकारने केल्याचे देवेंद्र यांनी खिन्नपणे सांगितले.  संत्रा बागा जगविण्याचे आव्हान पुढच्या हंगामात आंबीया बहार घेण्याकरिता बागेचे पाणी व्यवस्थापन आतापासूनच करावे लागते. परंतु, यावर्षी पाण्याची उपलब्धता नसल्याने २०१८-१९ यावर्षीच्या हंगामात आंबीया बहार घेताच येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. आंबीया बहार घेणे तर दूरच संत्रा बागा कशा वाचविता येतील? हा प्रश्‍न आहे. ७० ते ७२ संत्रा लागवड ही हलक्‍या जमिनीवर आहे. चांगला निचरा होणारी जमीन असल्याने जमीनीची पाणी साठवण क्षमता राहत नाही.  संत्र्यासाठी योग्य असलेली जमीन म्हटली जाते. परंतु जमिनीची पाणी साठवण क्षमता नाही. दरदिवशी प्रतिझाड कमीतकमी ७० लिटर पाण्याची गरज राहते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जूनचा अखेरचा आठवडा इतके महिने कडक उन्हाचे राहतात. या काळात तर आणखी भयावह परिस्थिती निर्माण होण्याची भीती अमडापूर येथील गजानन निंबोरकर यांनी व्यक्‍त केली. सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेल्या भिवकुंडी, लिंगा व इतर गावांमध्ये मृग बहाराची फळे घेतली जातात. त्या भागात देखील जलसंकट निर्माण झाल्याने संत्रा फळच नाही तर बागांचे अस्तित्वदेखील धोक्‍यात आल्याचे ते सांगतात. 

संत्राचोरांचा धुमाकूळ दुष्काळामुळे बागा जगविण्याच्या आव्हानाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता संत्रा फळे चोरट्यांनी नव्या समस्येची भर टाकली आहे. नायगाव ते चमक खुर्द मार्गावरील छोटू ऊर्फ प्रवीण डोके यांच्या शेतातील ५० कॅरेटहून अधिक संत्री तोडून रस्त्यावर टाकून पळ काढण्यात आला. कोणीतरी आल्याच्या भीतीतून चोरट्यांनी फळे तोडल्यानंतर ती रस्त्यावर फेकत पळ काढल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाईस सुरवात केली आहे. दरम्यान संत्रा फळ चोरीच्या वाढत्या घटनांची दखल घेत या भागात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी चमक येथील बबलू चरोडे या शेतकऱ्याने केली आहे.  सुधारित पैसेवारीने वाढला संभ्रम बुधवारी (३१ ऑक्‍टोंबर) जिल्ह्याची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार सात तालुक्‍यांत पैसेवारी ५० पैशाच्या आत आहे. यामध्ये दुष्काळ यादीत नसलेल्या चार तालुक्‍यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दुष्काळ जाहीर झालेल्या पाच पैकी दोन तालुक्‍यांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक असल्याचे यात दर्शविण्यात आल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे. दुष्काळ व पैसेवारी याचा संबंध नसून सोयाबीन, मूग व उडीद या पिकांचे उत्पन्न व कपाशी व तुरीचे नजरअंदाज उत्पन्न दुष्काळाकरिता गृहीत धरण्यात आल्याचा खुलासा या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. परंतु, दुष्काळ यादीत असलेल्या तालुक्‍यात जास्त पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अचलपूर, अंजनगावसूर्जी, चिखलदरा, मोर्शी व वरुड तालुक्‍यांचा समावेश आहे. दरम्यान प्रशासनाने संयुक्‍त सर्व्हेक्षण अहवालात दोन लाख हेक्‍टरवरील पिके दुष्काळामुळे बाधित झाल्याचे शासनाला कळविले आहे. शेकदरी प्रकल्पात उरला केवळ २० टक्‍के साठा सिंचनाची गरज भागविण्यासाठी शेकदरी प्रकल्प पूरक ठरला असता. परंतु या प्रकल्पात केवळ २० टक्‍के जलसाठा उरल्याने सिंचनाऐवजी पिण्याकरिता ते आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरुड ग्रामपंचायतीला हे पाणी दिले जाणार असून त्याकरिता पाइपलाइन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. पिण्याकरिताच पाणी नसल्याने माणसे जगवायची की पीक अशा दुहेरी विवंचनेत शेतकरी आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com