नागपुरात संत्रा दरात तेजी

आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच आता संत्रा दरात तेजी अनुभवली जात आहे. सुरुवातीला ८०० ते १००० रुपये क्‍विंटल असलेल्या संत्र्याचे व्यवहार २००० ते २४०० रुपये क्‍विंटलवर पोचल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
Orange prices rise in Nagpur
Orange prices rise in Nagpur

नागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच आता संत्रा दरात तेजी अनुभवली जात आहे. सुरुवातीला ८०० ते १००० रुपये क्‍विंटल असलेल्या संत्र्याचे व्यवहार २००० ते २४०० रुपये क्‍विंटलवर पोचल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना हा दर मिळत आहे. बाजारातील संत्र्याची आवक १२०० क्‍विंटलची आहे. बाजारात मोसंबीची देखील आवक होत असून त्याचे दर ३००० ते ३५०० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत.

विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहारातील आवक सध्या होत आहे. त्यासोबतच काही शेतकरी मृगातील संत्रा देखील विक्रीसाठी आणत आहेत. आंबिया बहारातील संत्र्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दरात तेजी आली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला संत्रा दर १२०० ते १४०० रुपये होते. हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना त्यात टप्याटप्याने वाढ होत गेली. १६०० ते २१०० रुपये आणि आता २००० ते २४००० रुपयांचा पल्ला संत्रा दराने गाठला आहे. ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून संत्रा झाडावर ठेवला त्यांना या दरातील तेजीचा फायदा होत आहे.

बाजारात मोसंबीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात २५०० ते ३००० रुपये दर होता. मोसंबीची आवक १००० क्‍विंटलची होती. त्यानंतरच्या काळात मोसंबीचे दर ३००० ते ३८०० रुपयांवर पोचले. आता ३००० ते ४००० रुपयांवर मोसंबी दर स्थिर आहेत. बाजारात केळीची आवक २२ क्‍विंटलच्या घरात आहे. केळीला कमीत कमी ४५० तर जास्तीत जास्त ५५० रुपये इतका दर मिळत असून हाच दर पंधरा दिवसांपासून स्थिर आहे. द्राक्षाचे व्यवहार ४००० ते ६००० रुपये क्‍विंटलने होत असून आवक १८९ क्‍विंटलची आहे.

डाळिंब ५००० ते १२ हजार रुपये क्‍विंटल असून आवक ४१२ क्‍विंटलची होती. बाजारात बटाट्याची आवक ३००० क्‍विंटलवर आहे. भंडारा तसेच लगतच्या मध्यप्रदेशातून बटाटा आवक होते. बटाटा दर १२०० ते २००० रुपये असे राहिले. बाजारात पांढऱ्या कांद्याची आवक १५०२ क्‍विंटल आणि दर २८०० ते ३५०० रुपये होते. लाल कांदा आवक १५०० आणि दर २८०० ते ३५०० रुपये मिळाले. बाजारात लसूण आवक सरासरी ४०० क्‍विंटल होती. लसूणाला ४००० ते ८५०० रुपयांचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com