खुल्या बाजारातील कमी दरांमुळे संत्रा उत्पादक अडचणीत

Orange
Orange

वाशीम ः जिल्ह्यात फळप्रक्रिया उद्योग तसेच हक्काची बाजारपेठ नसल्याने या संत्रा उत्पादकांना दरवर्षी मोठी झळ सहन करावी लागते. या वर्षी खुल्या बाजारात तुलनेने दर कमी मिळत असल्याने संत्रा उत्पादक अडचणीत आले आहेत. सध्या संत्र्याला ३०० ते ४०० रुपये प्रतिक्रेट (प्रतिक्रेट सरासरी २२ किलो) दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  जिल्ह्यात सर्वाधिक ४०० हेक्टरपर्यंत संत्रा लागवड मुंगळा गाव शिवारात झाली आहे. मालेगाव, रिसोडसह अन्य तालुक्यांतही संत्र्याचे क्षेत्र आहे. मुंगळा गाव आॅरेंज व्हिलेज म्हणून ओळखले जाते. दहा वर्षांपूर्वी या भागात बंगळूर, कोलकाता येथील व्यापाऱ्यांमार्फत स्थानिक खरेदीदार संत्रा फुलावर खरेदी करीत. बोली प्रमाणे संत्रा तोड करून शेतकऱ्यांना मोबदला दिला जात होता. इतर पिकांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी या फळबाग लागवडीकडे वळाले होते. मात्र देशात नोटबंदीच्या घोषणेनंतर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. मागील वर्षी पाणीटंचाईमुळे व्यापाऱ्यांनी संत्रा फुलावर खरेदी केला नव्हता. आता व्यापारी कमी दरात मागणी करीत आहेत. या वर्षी अतिवृष्टीमुळे संत्रा गळ अधिक झाली. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला. मागील हंगामात ५०० ते ५५० रुपये प्रतिक्रेटपर्यंत संत्र्याचे दर गेले होते. यंदा मात्र दरांबाबत शेतकऱ्यांची अडवणूक सुरू झाली आहे. ३०० ते ४०० रुपये क्रेट प्रमाणे व्यापारी मागणी करीत असून, पर्याय नसल्याने संत्रा उत्पादकांना माल द्यावा लागत आहे.  प्रक्रिया उद्योगाची गरज संत्र्याचे दर दरवर्षी अस्थिर होत असल्याने या भागात प्रक्रिया उद्योग उभारणीची गरज आहे. या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न केले जावेत, अशी मागणी जिल्ह्यातील मुंगळा येथील जगदंबा संत्रा उत्पादक शेतकरी गटाचे अध्यक्ष अशोक  राऊत, प्रकाश राऊत, भागवत मोहळे, संतोष राऊत, देवानंद इंगळे, बाळू बेलोकर, आनंद नाईक, मनोज बेलोकर, रवी राऊत, गजानन महाजन, यांच्यासह संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य शासनाने विदर्भात तातडीने फळप्रक्रिया उद्योग सुरू करावा. संत्रा मार्केट यार्डच्या माध्यमातून बांधावर खरेदी करण्यात यावी, अशी मागणीदेखील शेतकऱ्यांमधून सातत्याने होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com