बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
अॅग्रो विशेष
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री; गोविंद जोशी यांचा प्रयोग
जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी तथा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गोविंद जोशी यांनी स्वतःच्या शेतातील संत्री बाजारपेठेत विक्रीसाठी न नेता शेतामध्येच लिलाव पद्धतीने संपूर्ण फळबागेची विक्री केली.
परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी तथा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गोविंद जोशी यांनी स्वतःच्या शेतातील संत्री बाजारपेठेत विक्रीसाठी न नेता शेतामध्येच लिलाव पद्धतीने संपूर्ण फळबागेची विक्री केली. शेतामध्ये आयोजित लिलाव बोलीमध्ये स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यांतील व्यापारी सहभागी झाले होते. साडेतीन एकरांवरील संत्र्याचा २० लाख २१ हजार रुपयांत सौदा झाला.
गोविंद जोशी यांची ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू, जि. परभणी) येथे साडेतीन एकर क्षेत्रावर ५२५ झाडांची संत्रा बाग आहे. बागेतील झाडांवर मृग बहराचे उत्पादन घेतले आहे. उभ्या झाडांवरील फळांचे गुत्ता पद्धतीने किंवा वजनावर विक्री व्यवहाराचे सौदे करण्याची पद्धत सर्वत्र प्रचलित आहे. जून-जुलैपासून ते फेब्रुवारी, मार्चपर्यंत असे सौदे देण्याची प्रक्रिया चालू असते. हा सौदा व्यवहार शेतकरी आणि खरेदीदार व्यापारी या दोघांमध्ये होत असतो. फेब्रुवार-मार्चमधील संभाव्य बाजार किमतीचा अंदाज लावणे शेतकऱ्यांसाठी कठीण असल्यामुळे हे सौदे योग्य किमतीत होण्याची शक्यता खूप कमी असते.
या वर्षी संत्र्याच्या मृग बहराची फूट महाराष्ट्रात (मुख्यतः विदर्भात) खूप कमी असल्यामुळे सर्वत्र तेजीची धारणा आहे. या पार्श्वभूमीवर गोविंद जोशी यांनी २० ते ५० व्यापाऱ्यांना निमंत्रण देऊन लिलाव पद्धतीने संत्रा बागेच्या झाडावरील फळांचा गुत्ता पद्धतीने विक्री सौदा दिला. लिलावामधे वीस व्यापाऱ्यांनी भाग घेतला. त्यासाठी व्यापाऱ्यास लिलाव बोलीसाठी १ लाख रुपये अनामत रक्कम घेतली होती. तसेच एक आठवड्याच्या आत ४० टक्के रक्कम देण्याची अट होती.
मेहकर (जि. बुलडाणा) येथील बागवान हाजी सय्यद रफिकभाई यांनी सर्वांत जास्त २० लाख २१ हजार रुपये एवढी बोली लावून सौदा केला. बोलीनुसार जोशी यांना ४० टक्के रक्कम अदा केली. उर्वरित रक्कम टप्प्याटप्याने अदा केली जाणार आहे. या वेळी परिसरातील अनेक फळबागायतदार शेतकरी, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सेलू येथील मोंढ्यातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा प्रयत्न
शेतकरी संघटनेच्या ‘स्पर्धा आणि खुल्या बाजाराच्या’ तत्त्वाशी सुसंगत असा हा व्यवहार झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. जिल्ह्यातील संत्रा उत्पादक गावातील शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी शेतामध्ये लिलाव पद्धतीने संत्र्याची विक्री केली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे, असे जोशी यांनी सांगितले
- गोविंद जोशी, ९४२२१७५४६१
- 1 of 655
- ››