कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी फौजदारीचे आदेश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने पाणी योजनेची १ लाख २४ हजार रुपयांची रक्‍कम परस्पर काढून घेतली आहे. यामुळे गावात पुरेसे पाणी मिळू शकले नाही. शिवाय, विस्तार अधिकारी हे चुकीचा रिपोर्ट सादर करून समितीने कोणतेही काम न केल्याने समिती बरखास्त करण्याबाबत नियमबाह्य ग्रामसभा घेऊन नियमबाह्य ठराव केला आहे. हा प्रकार आजच्या जलव्यवस्थापन सभेत उपस्थित झाल्यानंतर कंडारी येथील समिती अध्यक्ष व सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर पाटील, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, सदस्य प्रभाकर सोनवणे, पल्लवी सावकारे, लालचंद पाटील, मीना पाटील आदी उपस्थित होते. शासनाच्या स्वच्छ महोत्सवात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांचे सेमिनार घ्यावयाचे आहे. हे सेमिनार जिल्हास्तरावर न घेता तालुकास्तरावर घेण्याची मागणी प्रभाकर सोनवणे यांनी केली.

कंडारी येथील समितीकडून झालेल्या गैरप्रकाराबाबत पल्लवी सावकारे यांनी मुद्दा उपस्थित केला. यात प्रामुख्याने समितीने काम न करता २२ मे २०१८ ला १ लाख २४ हजार इतकी रक्‍कम काढून घेतली आहे. या समिती अध्यक्ष व सचिवांवर कारवाईची मागणी केली. तसेच, विस्तार अधिकारी पाटणकर यांनी देखील चुकीचा रिपोर्ट सादर केल्याने त्यांच्यावरसुद्धा कारवाईची मागणी सावकारे यांनी केली होती. या प्रकाराबाबत अन्य तालुक्‍यांतील अधिकारी नेमून चौकशी करण्याची मागणी प्रभाकर सोनवणे यांनी  केली आहे.

मारूळ येथेही काम अपूर्ण  मारूळ (ता. यावल) येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत ६० लाख ९६ हजार रुपयांचे काम मंजूर आहे. परंतु, संबंधित ठेकेदार मनोरे हे काम करीत नसून पाणी योजनेचे काम अपूर्ण असल्याची तक्रार प्रभाकर सोनवणे यांनी केली. गावात तीन किलोमीटरची पाइपलाइन टाकणे असताना केवळ दीड किलोमीटर पाइपलाइन टाकली तसेच पंपहाउसचे काम देखील अपूर्ण आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी सोनवणे यांनी केली. यावर सीईओंनी काम पूर्ण झाल्याशिवाय बिल अदा न करण्याचे आदेश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com