नांदेडला 'शेतकरी सन्मान'ची आलेली रक्कम परत मागितली

'शेतकरी सन्मान'ची आलेली रक्कम 'एनआयसी'ने परत मागितली
'शेतकरी सन्मान'ची आलेली रक्कम 'एनआयसी'ने परत मागितली

नांदेड : पंधप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गंत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या १ हजार २१ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट लाभ हस्तांतराद्वारे (डीबीटी) जमा करण्यात करण्यात आलेली प्रत्येकी २ हजार रुपयांची रक्कम परत (रिव्हर्स) करावी, असे निर्देश नॅशनल इंफोर्मेटीक सेंटर (एनआयसी)कडून जिल्हा बॅंकेला देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली अनुदानाची रक्कम रिव्हर्स करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु रक्कम परत करण्याचे कारण मात्र समजू शकले नाही, असे जिल्हा बँकेच्या सूत्रांनी सांगितले. या योजनेच्या मुहूर्तावरच खात्यावर जमा केलेली रक्कम परत घेतली जात असल्याच्या वृत्तामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांमध्ये या योजनेच्या लाभाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत अल्पभूधारक शेतक-यांसाठी सुरु केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम -किसान) योजनेचा जिल्हास्तरीय प्रारंभ रविवारी (ता.२४) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील एकूण ७ लाख ९५ हजार ८०० शेतकरी खातेदारांपैकी २ लाख ८९ हजार ३५१ शेतकरी कुटूंब या योजनेसाठी पात्र आहेत. पात्र कुटूंबांपैकी २ लाख ६० हजार ३०४ शेतकरी कुटूंबांची माहिती एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. रविवारी (ता.२४) पासून या योजनेअंतर्गंत विविध बॅंकाच्या खातेदार शेतकऱ्यांच्या नावावर अनुदानाच्या  पहिल्या हप्त्याची दोन हजार रुपये एवढी रक्कम जमा करण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांचे खातेदार असलेल्या शेतकऱ्यांना खात्यावर रक्कम जमा झाल्याचे एसएमएस आले आहे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंके चे खातेदार असलेल्या जिल्ह्यातील ८ हजार १८२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट लाभ हस्तांतरणाव्दारे (डिबिटी) प्रत्येकी २ हजार रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली. परंतु यापैकी १ हजार २१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम परत (रिव्हर्स) करावी असे निर्देश ‘एनआयसी’कडून ई-मेलव्दारे जिल्हा बॅंकेला देण्यात आले. त्यानुसार रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु रक्कम परत करण्यामागचे कारण मात्र सांगितले नाही, असे जिल्हा बॅकेचे व्यवस्थापकीय संचालक अजय कदम यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com