दोन हजार कोटींची भरपाई देण्याचा मोन्सॅन्टोला आदेश

दोन हजार कोटींची भरपाई देण्याचा मोन्सॅन्टोला आदेश
दोन हजार कोटींची भरपाई देण्याचा मोन्सॅन्टोला आदेश

नवी दिल्ली : मोन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीने अमेरिकेतील एका कर्करोग (कॅन्सर) पीडित शेतकऱ्याला दंड आणि नुकसानभरपाई मिळून तब्बल २८९ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे दोन हजार कोटी रुपये) द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मोन्सॅन्टोचे उत्पादन असलेल्या राऊंडअप (ग्लायफोसेट) तणनाशकाच्या वापरामुळे कॅन्सर झाल्याचा त्या शेतकऱ्याचा दावा मान्य करत कॅलिफोर्निया येथील न्यायालयाने हा निकाल दिला. ड्वेन जॉन्सन (वय ४६) असे या शेतकऱ्याचे नाव असून ते कीड नियंत्रण व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. त्यांनी दरवर्षी ३० वेळा या प्रमाणात राऊंडअप तणनाशकाचा वापर केला. या तणनाशकाच्या वापरामुळे आपल्याला कॅन्सर झाला असल्याचे सांगत त्यांनी मोन्सॅन्टो कंपनीविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. जॉन्सन यांचा आजार शेवटच्या अवस्थेत असून २०२० नंतर ते जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे या खटल्याची चार आठवड्यांत फास्ट्र ट्रॅक सुनावणी पूर्ण करण्यात आली. ग्लायफोसेट विशेषतः राऊंडअपमुळे कॅन्सर होतो हे माहीत असूनही मोन्सॅन्टोने ग्राहकांच्या सुरक्षिततेपेक्षा नफ्याला प्राधान्य दिल्याचा आरोप जॉन्सन यांच्या वकिलांनी केला. मोन्सॅन्टोने आपल्या उत्पादनामुळे कॅन्सर होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा जॉन्सन आणि आपल्या इतर ग्राहकांना दिलेला नव्हता, असे न्यायालयाला आढळून आले.   मोन्सॅन्टोने या निकालाला वरच्या न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. सुमारे आठशेहून अधिक शास्त्रीय अभ्यास आणि परीक्षणांमधून ग्लायफोसेट कर्करोग होण्यास कारणीभूत नाही, हे सिद्ध झालेले असून या निकालामुळे ती वस्तुस्थिती बदलत नाही, असेही कंपनीने म्हटले आहे.  दरम्यान, अमेरिकेत जॉन्सन यांच्याप्रमाणे आणखी पाच हजार जणांनी मोन्सॅन्टोच्या विरोधात अशाच स्वरूपाच्या याचिका दाखल केलेल्या आहेत. कर्करोग हाेत असल्याची ‘डब्ल्यूएचओ’कडून पुष्टी यूनायटेड स्टेट्स एन्व्हायर्न्मेंट प्रोटेक्शन एजन्सीने सप्टेंबर २०१७ मध्ये ग्लायफोसेटमुळे कर्करोग होत नसल्याचा अहवाल दिला होता. परंतु ग्लायफोसेट कर्करोग होण्यास कारणीभूत असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) २०१५ मध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकणाऱ्या घटकांच्या यादीमध्ये ग्लायफोसेटचा समावेश केलेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com