राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेश

मार्च, एप्रिल व मे या महिन्यात गुरांच्या बाजारात मोठी उलाढाल होत असते. याच काळात बाजार बंद राहिल्याने बाजार समितीचे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. या बाजार समितीच्या अखत्यारीत असलेल्या वरवट बकाल येथील बाजारात गुरांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असते. - संदीप माटे, प्रतवारीकार, बाजार समिती संग्रामपूर जि. बुलडाणा
cattle market
cattle market

अकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील गुरांचे बाजार बंद करण्यात आले होते. खरीप हंगामाच्या तोंडावर हे बाजार बंद केल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. याबाबत शेतकऱ्यांची अडचण ‘ॲग्रोवन’ने प्रसिद्ध करताच आता पणन संचालनालयाने खबरदारीची उपाययोजना करीत बाजार समित्यांनी गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. खरीप हंगामाला सुरुवात होत असतानाच राज्यातील गुरांचे बाजार बंद झाल्याने पशुपालकांसमोर पेच तयार झाला होता. दरवर्षी हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी बैलजोड्यांची खरेदी करीत असतात. यंदा नेमके मार्च महिन्याच्या मध्यापासून लॉकडाऊनमुळे गुरांचे बाजार बंद करण्यात आले. याचा फटका पशुपालकांना बसत होता. जनावरांची खरेदी-विक्री ठप्प झाल्याने अनेकांना महागड्या दराने बैलांची खरेदी करावी लागली. त्यातही अनेकांना अपेक्षित असलेले बैल मिळत नव्हते.  बैलांची आवश्‍यकता असलेले शेतकरी वैयक्तीक स्तरावरून शोध घेत होते. अनेकांनी शेतकऱ्यांची गरज पाहून जनावरांचे दर वाढविले. ४० ते ५० हजारात मिळणारी साधारण बैलजोडी ६० ते ७५ हजार रुपये देऊनही मिळत नसल्याचे शेतकरी सांगत होते. प्रत्येक जिल्ह्यातील छोटे-मोठे गुरांचे बाजार बंद केल्याने सर्वाधिक कोंडी तयार झाली होती. सोबतच बाजार समित्यांच्या कक्षेत असलेले हे बाजार बंद असल्याने उत्पन्नाचा स्त्रोतही बंद झाला होता. खरेदी-विक्रीच्या माध्यमातून बाजार समित्यांना कर मिळत असतो.  अखेरीस शेतकऱ्यांची गरज लक्षात घेत पणन संचालनालयाने  राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना तातडीचे पत्र काढून गुरांचे बाजार सुरु करण्याचे निर्देश दिले. हे बाजार सुरु करताना त्या-त्या भागातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत बाजार समित्यांनी व्यवहार सुरु ठेवताना उपाययोजनांची अंमलबजावणी होईल याची खात्री घेण्याचे सांगण्यात आले. गर्दी होणार नाही, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चित केलेले प्रतिबंधात्मक उपाय पाळले जातील याची खबरदारी घेण्याचे सांगितले आहे.  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली जिल्हाधिकाऱ्यांनी गुरांचे बाजार बंद ठेवण्याबाबत विशिष्‍ट आदेश असल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने बाजार समितीने बाजार सुरु करण्याबाबत पुढील कार्यवाही करावी, असेही सुचविण्यात आले आहे. बाजार समित्यांकडून अंमलबजावणी या आदेशानुसार काही बाजार समित्यांनी गुरांचे बाजार पुर्ववत सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव बाजार समितीने जाहीर सूचना काढत गुरे व शेळीमेंढी बाजार सुरु करीत असल्याचे सांगितले. यानुसार जनुना उपबाजार भरविण्यात आला. या ठिकाणी वावरताना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तोंडाला मास्क किंवा रुमाल वापरण्याचे, वेळोवेळी हात धुण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र अद्यापही काही ठिकाणी गुरांचे बाजार सुरु होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. याबाबत स्थानिक स्तरावरील प्रशासनाकडून हिरवी झेंडी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com