सेंद्रिय शेती कृषी विज्ञान केंद्रास कणेरीत प्रारंभ

या केंद्राच्या स्थापनेमुळे सेंद्रिय शेती करणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची नवी दारे खुली होणार आहेत. अधिक माहिती तातडीने मिळाल्याने शेतकरी सेंद्रीय शेतीकडे निश्‍चित वळतील. - श्री काडसिद्धेश्‍वर महाराज, मठाधिपती, कणेरी मठ, जि. कोल्हापूर
सेंद्रिय शेती कृषी विज्ञान केंद्रास कणेरीत प्रारंभ
सेंद्रिय शेती कृषी विज्ञान केंद्रास कणेरीत प्रारंभ

कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर केवळ सेंद्रिय शेतीवर संशोधन आणि विस्तार करणाऱ्या देशातील पहिल्या कृषी विज्ञान केंद्राची सुरवात करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातनू सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी फायदेशीर स्वरूपात सेंद्रिय शेतीवर संशोधन करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे संघटन करण्याचे काम केंद्राने सुरू केले आहे. काही महिन्यांपूर्वीच हे केंद्र मंजूर झाले होते. आता प्रत्यक्ष कामकाजास सुरवात झाली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात या पूर्वीच तळसंदे येथे एक कृषी विज्ञान केंद्र आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन कणेरी मठावर या नवीन केंद्रास मान्यता देण्यात आली. या केंद्रांतर्गत करवीर, कागल, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांसाठी खास करून काम करण्यात येणार आहे. या तालुक्‍यात सेंद्रिय चळवळ वाढविण्याचे काम या केंद्रामार्फत करण्यात येईल. 

शेतकऱ्यांशी साधणार संवाद  केंद्राकडे सध्या ६५ एकरांची जमीन आहे. तिथे सेंद्रिय पद्धतीने पिके घेऊन प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. या प्रात्यक्षिकांच्या द्वारे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या बाबतीत नवी माहिती दिली जाइल. सध्या मठाच्या वतीने लखपती शेती हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू आहे. याला आणखी तांत्रिक पद्धतीची जोड देऊन असे प्रयोग अनेक ठिकाणी व्हावेत, अशा योजना आखण्यात येणार आहेत. 

गावे दत्तक घेणार  सूत्रबद्ध काम करण्याकरिता केंद्राच्या वतीने प्रत्येक तालुक्‍यातील एक गाव दत्तक घेऊन तिथे सेंद्रिय शेतीचे उपक्रम घेण्याचे केंद्राचे पहिल्या टप्प्यातील नियोजन आहे. पुढील तीन वर्षे या गावात सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करून शेती पिकविण्यात येणार आहे. यासाठी गाव निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.  सात शास्त्रज्ञांची नियुक्ती  सध्या केंद्रप्रमुखासह विविध विभागांतील सहा युवा शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एका महिला शास्त्रज्ञाचाही समावेश आहे. गृहशास्त्र, पीक संरक्षक, मृदाशास्त्र, पशुविज्ञान, कृषी विस्तारक आदी क्षेत्रांतील शास्त्रज्ञ काम करणार आहेत. त्यांच्या मार्फत तंत्रज्ञान प्रसाराचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या सेंद्रिय निविष्ठा तिथेच तयार करून त्याचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. तसेच या निविष्ठा कशा करायच्या याबाबतचे मार्गदर्शनही करण्यात येईल. भविष्यात जैविक कीटकनाशके, बुरशीनाशके आदींची निर्मितीही करण्यात येईल. याच बरोबर देशी बियाण्यांची बॅंकही तयार करण्यात येणार आहे. अमृतपाणी, जीवामृत, व्हर्मिवॉश, चिकटसापळे, ब्रह्मास्त्र आदी निविष्ठांचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना केंद्रामार्फत देण्यात येईल. सध्या मठावर देशी गायीच्या बावीस प्रजाती उपलब्ध आहेत. त्याही वाढविण्याबाबत प्रयत्न सुरू राहतील.

प्रतिक्रिया केवळ सेंद्रिय शेतीवर काम करणारे हे देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र आहे. यामुळे सेंद्रिय शेतीवरील संपूर्ण संशोधन करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मठाच्या कामाचा आम्हालाही संशोधन करताना फायदा होईल. एकत्रित प्रयत्नामुळे सेंद्रिय शेतीचा विस्तार वाढण्यास मदत होणार आहे.  - डॉ. रवींद्र सिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र, कणेरी, जि. कोल्हापूर  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com