सांगलीत लिलाव थांबविण्यासाठी संस्थांची धावाधाव

Organizations run for stop auction in Sangli
Organizations run for stop auction in Sangli

 सांगली : बड्या थकबाकीदार संस्थांकडील वसुलीसाठी जिल्हा बॅंकेने लिलाव जाहीर केल्यानंतर संस्था चालकांची धावपळ उडाली आहे. बॅंकेने लिलावाची कारवाई थांबवावी, यासाठी सात सहकारी संस्थांच्या चालकांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना विनंती केली आहे. पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी (ता.६) सायंकाळी मुंबईतील निवासस्थानी बॅंकेचे संचालक मंडळ, अधिकारी व थकबाकीदार संस्थांचे पदाधिकारी, संचालक यांची बैठक बोलवली आहे. त्यामुळे बैठकीतील चर्चेकडे लक्ष लागले आहे. 

जिल्हा बॅंकेने थकबाकीदार संस्थांवर कारवाईचा धडाका लावला आहे. बिगर शेती कर्जाची थकबाकी वाढली आहे. त्यामुळे एनपीए वाढला आहे. तो कमी करण्यासाठी कडक कारवाईचे निर्देश नाबार्डने दिले आहेत. संचालक मंडळाने कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांना अधिकार दिले आहेत. थकबाकी जवळपास एक हजार कोटी आहे. त्यातील बिगर शेती संस्थांकडे ६०० कोटीहून अधिक थकबाकी आहे. तर ‘टॉप टेन' संस्थांकडील थकबाकी ४५० कोटींची आहे. 

माणगंगा साखर कारखाना, महांकाली साखर कारखाना, विजयालक्ष्मी गारमेंट, डिवाईन फूडस्‌, प्रतिबिंब गारमेट, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी, रामानंद भारती सहकारी सूतगिरणी यासह गणपती संघ व अन्य काही संस्थांचा बड्या थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. यातील सात संस्थांवर बॅंकेने सिक्‍युरिटायझेशन ऍक्‍टनुसार कारवाई केली आहे. 

बॅंकेने माणगंगा कारखाना, महांकाली कारखाना, शेतकरी विणकरी सूतगिरणी, प्रतिबिंब गारमेंट, डिवाईन फूडस्‌ व विजयालक्ष्मी कॉटन मिल या संस्थांचा ताबा घेतला आहे. त्यांचा लिलाव जाहीर केला आहे. लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संस्थाचालकांनी पालकमंत्री पाटील यांना साकडे घातले आहे. पाटील यांनी संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि बॅंक संचालक व अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ६ मार्चला सायंकाळी सात वाजता मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी बैठक होईल. 

बॅंकेचा कठोर पवित्रा

थकबाकीदारांना बॅंकेने कायदेशीर नोटिसा बजावून थकबाकी भरण्यास सांगितले होते. त्यासाठी मुदतही दिली होती. मात्र या काळात संस्थांनी थकबाकी न भरल्याने मालमत्तेचा ताबा घेऊन बॅंकेने लिलाव जाहीर केला. लिलावाच्या भूमिकेवर बॅंक प्रशासन ठाम आहे. 

...तर विजयालक्ष्मीचा ताबा

थकबाकीदार विजयालक्ष्मी कॉटन मिलचा लिलाव ६ मार्चला होईल. अद्याप लिलावासाठी निविदा अर्ज विक्री झाला नाही. मुदतीत निविदा न आल्यास जिल्हा बॅंक स्वत: ‘अपसेट प्राईस'' ला संस्थेची खरेदी करून ताबा घेणार आहे. त्यानंतर ताबा घेतलेल्या मालमत्तेबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com